Nagpur News : सौरऊर्जा पॅनेलच्या स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेने (निरी) यांत्रिकी हात तयार केला आहे. त्यामुळे शेकडो लिटर पाण्याची बचत आणि क्षमतेतही वाढ होणार आहे. सध्या या प्रयोगाचे परीक्षण सुरू असून, त्याचे पेटंट घेण्यात आले आहे. वाहनावरील वायफरच्या धर्तीवर या यांत्रिक हाताची कार्यपद्धती असल्याचे ‘निरी’चे तज्ज्ञ डॉ. सुशांत बी. वाठ यांनी सांगितले.
एकट्या ‘निरी’ परिसरात सुमारे ५५० सौर पॅनेल्स आहेत. महिन्यातून दोन वेळा सौर पॅनेल्सची स्वच्छता होते. याकरिता प्रति पॅनेल सरासरी पाच ते सात लिटर इतक्या पाण्याची गरज लागते. पॅनेलच्या आकारानुसार पाणी वापर कमी जास्त होतो. हा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी निरी तज्ज्ञांनी यांत्रिक हात तयार केला आहे. पॅनेल्सच्या दोन्ही बाजूंना याकरिता जी यंत्रणा बसवण्यात आली आहे.
त्यात मऊ ब्रश किंवा स्पंज रोलर यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश आहे. त्याचे टायमिंग फिक्स केले की दोन वेळा सौर पॅनेल धुतले जाते. यात फक्त ५०० ते ७०० मिलि पाणी लागते. सौर पॅनेलवर जमा होणारी पक्ष्यांची विष्ठा, धुळीने सूर्यप्रकाश सौर पॅनेलच्या आत पोहोचण्यास अडथळा येतो आणि हळूहळू ऊर्जा उत्पादन कमी होते. हे दूषित घटक काढून टाकण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी वेळोवेळी स्वच्छता आवश्यक असते.
पाऊस, वारा आणि तापमानातील चढउतार यामुळे सौर पॅनेल असुरक्षित असतात. कालांतराने नुकसान आणि ऱ्हास होत असतो. त्याकरिता नियमित स्वच्छता आवश्यक असते. स्वच्छतेसाठी पाणी खूप लागते. सौर पॅनेल स्वच्छतेसाठी काही ठिकाणी रोबोटचाही उपयोग केला जातो.
हा सर्व कालापव्यय आणि पाण्याचा वापर टाळण्यासाठी येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था, ‘निरी’तील प्रमुख वैज्ञानिक डॉ. सुशांत बी. वाठ, अभियंता पीयूष कोकाटे यांनी निरीचे संचालक डॉ. अतुल नारायण वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सौर पॅनेल स्वच्छतेसाठी यांत्रिक हात तयार केला आहे. सध्या निरीत त्याचे परीक्षण सुरू आहे. मात्र त्यापूर्वी संशोधन आणि विकास तसेच प्रक्षेत्र चाचण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. या तंत्रज्ञानाचे पेटंट घेण्यात आले असून, व्यावसायिक निर्मितीसाठी काही कंपन्या याचा वापर करण्यास उत्सुक असल्याचे डॉ. वाठ यांनी सांगितले.
नेमके काय होते?
व्यावसायिक सौर पॅनेलची सूर्यप्रकाशापासून ऊर्जा निर्माण करण्याची कार्यक्षमता सुमारे २३ टक्के आहे. सरासरी कार्यक्षमता १५ ते २० टक्के राहते. ही कार्यक्षमता नियमित स्वच्छते अभावी कमी होऊ शकते. सर्वसाधारणपणे एक सौर पॅनेल स्वच्छ करण्यासाठी ५ ते ७ लिटर पाणी लागते. या शिवाय मजुरी वेगळी द्यावी लागते. ‘निरी’ने बनविलेला हात मानवी हस्तक्षेपाशिवाय पाण्याची बचत करून स्वच्छता करणार आहे. साधारणपणे, सोलर पॅनेल वर्षातून दोन वेळा स्वच्छ केले पाहिजे, असेही डॉ. वाठ यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.