Pune News : ‘‘साखर उद्योगाने ऊर्जा निर्मितीच्या किफायतशीर व्यवसायात वेगाने उतरण्याची गरज आहे. सौर उर्जेला भविष्यात मोठे भवितव्य असल्यामुळे भरपूर जागा उपलब्ध असलेल्या साखर कारखान्यांनी आता सौर उद्याने उभारावीत,’’ असा सल्ला केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या सौर विभागाचे सहसचिव दिनेश जगदाळे यांनी दिला.
‘कोजन असोसिएशन ऑफ इंडिया’ने पुण्यात एका हॉटेलमध्ये शुक्रवारी (ता. ३०) आयोजित केलेल्या ‘सोलर पॉवर सिम्पोझियम-२०२४’मध्ये ते बोलत होते. माजी सहकारमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी सहकार राज्यमंत्री प्रकाश सोळंके, साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राज्याचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, इंडियन शुगर एक्सिम कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ बसाक, ‘कोजन’चे विश्वस्त सूर्यकांत पाटील व यश बोरावके, साखर संचालक राजेश सुरवसे, साखर संघाचे उपाध्यक्ष प्रताप ओहोळ, विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले तसेच कोजन असोसिएशनचे महासंचालक संजय खताळ व्यासपीठावर होते.
या परिसंवादाला दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना केंद्रीय सहसचिव श्री. जगदाळे म्हणाले, ‘‘जगाच्या अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षेत्रात भारत झपाट्याने वाटचाल करीत असून ५०० गिगावॉटच्या उद्दिष्टांपैकी आतापर्यंत २०० पेक्षा अधिक गिगावॉट साखर उद्योग कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीकडे वळाला आहे. मात्र, जागेची कमतरता नसल्याने सौर उद्याने (सोलर पार्क) उभारण्याची मोठी संधी साखर उद्योगाकडे आहे. भविष्यात महासौर (मेगा) आणि छोटेसौर (मिनी) अशा दोन्ही श्रेणीतील प्रकल्पांना संधी असेल. केंद्राने सौर कुसुम योजना व्यापक प्रमाणात लागू केली आहे.’’
साखर उद्योगाच्या ऊर्जा निर्मिती उपक्रमांमधील अडचणींबाबत लवकरच एक बैठक होणार असल्याचे संकेत साखर आयुक्तांनी दिले. आयुक्त म्हणाले, ‘‘कारखान्यांनी केलेल्या प्रकल्प उभारणी खर्चाची परतफेड केवळ चार वर्षांत होणे शक्य झाले. सौर प्रकल्प उभारणीतील अडचणींबाबत आम्ही शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. या बाबत पुढील महिन्यात साखर उद्योगातील निर्मितीशी संलग्न घटकांसोबत एक बैठक होण्याची शक्यता आहे. यामुळे सौर ऊर्जा क्षेत्रात कारखान्यांना वेगाने पुढे जाण्यास मदत मिळेल.’’
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.