
ऋषिराज तायडे
ESA Space Research: अमेरिकेची ‘नासा’, भारताची ‘इस्रो’, युरोपची ‘ईएसए’, चीनची ‘सीएनएसए’, रशियाची ‘रॉस्कोमॉस’, जपानची ‘जॅक्सा’, आदी प्रमुख देशांच्या अवकाश संशोधन संस्थांनी अवकाश संशोधनामध्ये अतुलनीय काम केले आहे. युरोपीय अवकाश संशोधकांनी दोन उपग्रहाच्या माध्यमातून केवळ निसर्गतः घडणारे सूर्यग्रहणही कृत्रिम पद्धतीने करून दाखविले आहे. नुकत्याच पॅरिस येथे झालेल्या एका कार्यक्रमात संशोधकांनी या कृत्रिम सूर्यग्रहणाबाबत सादरीकरण केले.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये उपग्रह प्रक्षेपित केल्यानंतर कृत्रिम सूर्यग्रहणाच्या प्रत्यक्ष प्रयोगासाठी मार्च २०२५ पासून त्यांना सूर्यापुढे आणण्याचा अनेक वेळा प्रयत्न करण्यात आला. ज्या प्रकारे पृथ्वी आणि सूर्यादरम्यान चंद्र आल्यास नैसर्गिक सूर्यग्रहण होते, अगदी त्याचप्रमाणे दोन उपग्रहांच्या मदतीने कृत्रिम सूर्यग्रहणाचा हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगास ‘प्रोबा-३’ असे नाव देण्यात आले.
त्यामध्ये दोन उपग्रह पृथ्वीपासून हजारो किलोमीटर दूरवर एकमेकांपासून ४९२ फुटांवरून उडत होते. त्यापैकी एक उपग्रह चंद्राप्रमाणे सूर्याला अडवण्याचा प्रयत्न करतो, तर दुसरा उपग्रह दुर्बिणीच्या साह्याने सूर्याच्या बाह्यवातावरणात तयार झालेल्या प्रभामंडळाचा (कोरोना) अभ्यास करतो. ही प्रक्रिया अंत्यक गुंतागुंतीची आणि किचकट मानली जाते. जवळपास पाच फूट आकाराचे हे दोन्ही उपग्रह उडताना, त्यांच्यातील अंतरही अगदी अचूक असावे लागते.
अगदी नखाच्या आकारापेक्षा अधिक अंतर कमी-जास्त झाल्यास, अपेक्षित निकाल मिळत नाही. त्यासाठी जीपीएस नेव्हिगेशन, स्टार ट्रॅकर्स, लेझर आणि रेडिओ लहरींचा खुबीने वापर करण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले. त्यानंतर दोन्ही उपग्रहांच्या मदतीने कृत्रिम सूर्यग्रहणाचा प्रयोग यशस्वी करण्यात आला.
सौरघडामोडींचा अभ्यास
तब्बल २१ कोटी डॉलरच्या या मोहिमेत आतापर्यंत १० कृत्रिम सूर्यग्रहणांचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. त्यापैकी सर्वात मोठे सूर्यग्रहण हे पाच तास चालले होते. त्या माध्यमातून सूर्यग्रहणावेळी होणारे अवकाशीय बदल, प्रभामंडळातील हालचाली, सौरस्फोटांचा अभ्यास करण्यात आला. नैसर्गिक सूर्यग्रहण हे सरासरी १८ महिन्यांतून एकदा होते, तेही अगदी काही मिनिटांचे असते, त्यामुळे या घडामोडींचा योग्य तो अभ्यास करता येत नाही; परंतु कृत्रिम सूर्यग्रहणाच्या माध्यमातून हा अभ्यास सहज शक्य होणार असल्याचे रॉयल ऑब्झर्व्हेटरी ऑफ बेल्जियमचे प्रमुख शास्त्रज्ञ आंद्रेई झुकोव्ह यांनी पॅरिस येथील कार्यक्रमात सांगितले.
२०० सूर्यग्रहणांचे उद्दिष्ट
पुढील काळात आठवड्यातून सरासरी दोन सूर्यग्रहणे करण्याचे नियोजित आहेत. आगामी दोन वर्षांच्या कालावधीत एकूण २०० सूर्यग्रहणे होतील. त्यामुळे एक हजार तासांपेक्षा अधिक सूर्यग्रहणांच्या कालावधीतील अवकाशीय घडामोडींचा सखोल अभ्यास केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. जुलै महिन्यात वैज्ञानिक निरीक्षणे सुरू झाल्यानंतर जवळपास सहा तासांचे सलग एक सूर्यग्रहण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केल्याचेही ते म्हणाले.
...म्हणून हा अट्टहास
अवकाशातील या उपग्रहांची स्थिती पृथ्वीपासून सुमारे ६०,००० किलोमीटर अंतरावर असलेल्या लंबवर्तुळाकार कक्षेच्या सर्वांत
बाहेरील भागात आहे. तेथे गुरुत्वाकर्षण कमी असल्याने प्रभामंडळाचे निरीक्षण करणे तुलनेने सोपे जाते. तीव्र प्रकाशलहरीमुळे
नैसर्गिक सूर्यग्रहणावेळी दुर्बिणी क्षतिग्रस्त होण्याची भीती असल्याने संशोधक कृत्रिम
सूर्यग्रहणाचा अभ्यास करीत असल्याचे झुकोव्ह यांनी सांगितले.
सूर्याच्या पृष्ठभागापेक्षाही उष्ण असलेल्या प्रभामंडळाबाबत (कोरोना) संशोधकांना अद्यापही कुतुहूल आहे. त्यातील उत्सर्जित केले जाणारे अब्जावधी प्लाझ्मा आणि लहरींमुळे भूचुंबकीय वादळे निर्माण होऊ शकतात. या वादळांमुळे अनेकदा रात्रीच्या वेळी अवकाळात प्रकाशकिरणे दिसतात. मागील महिन्यात अनेक देशातून हे विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले. काही वेळा त्याचा परिणाम पृथ्वीवरील वीज आणि दूरसंचार प्रणालीवरही होण्याची शक्यता असते. त्याचाही कृत्रिम सूर्यग्रहण आणि या उपग्रहांच्या माध्यमातून संशोधक अभ्यास करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.