
Biological Materials Laboratory Story : अमरावती जिल्ह्यात दुर्गापूर येथे कृषी विज्ञान केंद्र (Agriculture Science Center) (केव्हीके) प्रसिद्ध आहे. केंद्राने आत्तापर्यंतच्या काळात विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांसाठी जैविक निविष्ठा निर्मितीसह विविध तंत्रज्ञानाचा प्रसार केला आहे.
त्याचबरोबर शेतकऱ्यांत विश्वासार्हता निर्माण करून वेगळी ओळख तयार केली आहे.
केव्हीकेची प्रयोगशाळा (KVK Laboratory)
केव्हीकेची जैविक निविष्ठा निर्मिती प्रयोगशाळा प्रसिद्ध आहे. दिल्ली येथील जैवतंत्रज्ञान विभागाकडून सुरवातीला १२ लाख रुपयांचे अनुदान प्रयोगशाळा उभारणीसाठी केव्हीकेला मिळाले. त्यानंतर राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातूनही निधीची तरतूद झाली.
यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळांवरील खर्चासाठीही रक्कम व यंत्रसामुग्रीवरील खर्चाची तरतूद झाली. ही सारी यंत्रणा उभी झाल्यानंतर २००६ मध्ये उत्पादनांच्या चाचण्या व प्रयोगांना सुरवात झाली.
सुरवातीच्या काळात अमेरिकेतील एका जीवाणूखताच्या चाचण्या व अभ्यास केव्हीके स्तरावर करण्यात आला. हे उत्पादन रायझोबियम, पीएसबी आदी जीवाणूंवर आधारित होते. त्यामध्ये माध्यम म्हणून चारकोल पावडरचा वापर व्हायचा.
त्यामुळे हाताळताना हात काळे व्हायचे. परिणामी शेतकऱ्यांकडून वापरावर मर्यादा येऊ लागल्या. केव्हीकेने बीप्रक्रियेला प्रोत्साहन मिळावे याकरिता द्रव्य स्वरूपात हा घटक उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
केव्हीकेचे प्रमुख डॉ. के.पी. सिंग यांनीच हे संशोधन व अभ्यास करून उत्पादन तयारही केले. केव्हीके प्रक्षेत्र तसेच शेतकऱ्यांच्या शेतावर त्याच्या चाचण्या घेतल्या.
त्या माध्यमातून भुईमूग उत्पादनात १० ते १२ टक्के वाढ झाल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला. पुढे मग केव्हीकेने त्याचे उत्पादन नियमित करण्याचा निर्णय घेतला.
जैविक निविष्ठांचे उत्पादन
केव्हीकेतर्फे रायझोबियम, पीएसबी, ॲझेटोबॅक्टर, केएसबी आदी जिवाणू खते तर जैविक बुरशीनाशकांमध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बिव्हेरिया बॅसियाना, व्हर्टीसिलीयम लेकॅनी आदींची निर्मिती केली जाते. त्यासाठी डॉ. सिंग यांच्या नेतृत्वाखाली चार तंत्रज्ञांचा समावेश आहे.
डॉ. सिंग अनेक वर्षांपासून येथे कार्यरत असून त्यांनी भागातील पीक पद्धती, शेतकऱ्यांच्या समस्या यांचा अभ्यास केला. त्यानुसार केव्हीकेच्या कार्याला दिशा दिली.
शेतकऱ्यांना वाजवी दरात थेट विक्री
उत्पादित सर्व जैविक निविष्ठांची विक्री थेट शेतकऱ्यांना होते. यात कृषी सेवा केंद्रे मध्यस्थ नसतात. त्यामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात म्हणजे कोणतेही उत्पादन घेतले तरी ते ३७० रुपये प्रति लिटर या दरात उपलब्ध होते. केव्हीकेने त्याबाबत जाणीवजागृतीवरही भर दिला आहे.
सुरवातीच्या काळात सहा ते ७ लाख रुपयांच्या निविष्ठांची विक्री व्हायची. परंतु ही उत्पादने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरल्याने विक्री वाढून वार्षिक उलाढाल तब्बल ५० ते ६० लाख रुपयांपर्यंत पोचली आहे. यातून केव्हीकेच्या उत्पन्नातही भर पडली आहे.
मागील पाच वर्षातील एकूण विक्री दृष्टीक्षेपात
ट्रायकोडर्मा- ७० हजार ३५४ किलो.
(वर्षाला सध्या १० हजार किलो प्रमाणात त्यास मागणी आहे.)
रायझोबियम- ९८ हजार ४५१ लिटर
पीएसबी- एक लाख ६ हजार ६१६ लिटर
ॲझेटोबॅक्टर- १३ हजार ४४० लिटर
द्रवरूप कॉनसॉर्शिया (एकत्रित सूक्ष्मजीव)- १२ हजार ६३८ लिटर
केएसबी- ११ हजार लिटर
निविष्ठांचा वापर
विदर्भात संत्रा पट्ट्यात फायटोप्थोरा रोगाची मोठी समस्या आहे. शिवाय खरीप व रब्बी हंगामातही सोयाबीन, हरभरा, तूर, मूग, उडीद आदी पिके घेतली जातात. या सर्व पिकांवरील रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा वा अन्य निविष्ठांची बीजप्रक्रिया, ड्रेंचिंग केले जाते.
त्यामुळे विदर्भासहित मराठवाड्यातील संत्रा, मोसंबी बागायतदार व अन्य शेतकरी या ठिकाणी येऊन खरेदी करतात. शासकीय योजनांमधून अनुदानावर उत्पादनांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे मागणीत वाढ नोंदविण्यात आली आहे.
तंत्रज्ञान प्रसार
केव्हीकेने केवळ उत्पादन निर्मितीवर न थांबता सुमारे ३५० एकरांवर खरीप व रब्बी हंगामात जैविक निविष्ठांचे प्रात्यक्षिक दिले आहे. भातकुली, नांदगाव खंडेश्वर, अमरावती, दर्यापूर, मोर्शी आदी तालुक्यांतील गावांचा त्यामध्ये समावेश आहे.
या निविष्ठांच्या वापरामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन उत्पादन खर्च कमी झाला आहे. जमिनीची सुपीकता वाढली आहे. पूर्वी केव्हीकेतर्फे १० हजारांपर्यंत ट्रायकोकार्डसे उत्पादन व्हायचे.
आता मात्र मागणीएवढा पुरवठा या न्यायाने त्याचे उत्पादन दोन हजारांवर आणले आहे. नव्या वाणंच्या प्रचारातही केव्हीकेने आघाडी घेतली आहे. त्यामध्ये राज्यातील विविध कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी आद्य रेषा
प्रात्यक्षिके घेतली जातात. सोयाबीन, हरभरा, मूग, तूर आदी पिकांचा बीजोत्पादन कार्यक्रम रब्बी व खरीप हंगामात सुमारे ४०० एकरांवर राबविला जातो.
सुमारे एकहजार क्विंटल प्रमाणित बियाणे दरवर्षी तयार करून विक्री करण्यावर भर दिला जातो. ही विक्री देखील थेट होत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होतो.
अन्य उपक्रम
-केव्हीकेतर्फे गायी, म्हशी मिळून सुमारे ३१ जनावरांचे व्यवस्थापन होते. त्या माध्यमातून दिवसाला १२५ लिटर दूध संकलन होते. दुधाची विक्री ६५ रुपये प्रति लिटरप्रमाणे होते.
-बटन मशरुमचेही दररोज १२५ किलो उत्पादन घेतले जाते. त्याची १५० रुपये प्रति किलो दराने विक्री होते.
-उमेद अंतर्गत महिला समूहांना प्रक्रियाजन्य उत्पादनांचे प्रशिक्षण दिले जाते.
- सुमारे ७० हजार ८७७ माती नमुन्यांची पाच वर्षांत तपासणी करण्यात आली.
- केव्हीके कार्यक्षेत्रातील चौदा ब्लॉक्समध्ये मंगळवारी आणि शुक्रवारी हवामान सल्ला दिला जातो. सुमारे १६७ व्हॉटस ॲप ग्रुप तयार केले असून ३८ हजार ३२० शेतकरी या माध्यमातून जुळले आहेत.
-कम्युनिटी रेडिओ सेंटरच्या माध्यमातून तंत्रज्ञान प्रसारावर भर देण्यात आला आहे. सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी तीन तास या माध्यमातून सल्ले दिले जातात.
-रोपवाटिकेच्या माध्यमातून सीताफळ, लिंबू, जांभूळ, संत्रा, मोसंबी आदी रोपांची विक्री होते.
- महिला उद्योजक घडविण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्या माध्यमातून अनेक महिलांनी गृह उद्योगांची उभारणी केली आहे. नीता सावदे, कल्पना दिवे, जयश्री गुंबळे, मनीषा टवलारे, किरण लोहकरे, विद्या वाट, शोभा डवरे, वंदना सवाई, प्रतिभा तायडे आदी यातील यशस्वी महिला आहेत. त्यांना सिफेटसह अनेक संस्थांनी गौरविले आहे.
-ॲग्री क्लिनिक, ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ आदी उपक्रमांमधून सुमारे १०० प्रशिक्षणार्थी घडविले जातात. त्यातील ५० टक्के युवकांनी उद्योग उभारला आहे. त्यामध्ये रश्मी रंगारी या युवतीने कुरुम (मूर्तिजापूर) येथे कृषी सेवा केंद्र उभारले आहे.
-अन्न परिक्षण प्रयोगशाळा देखील केव्हीके परिसरात आहे. यामध्ये अन्नघटकांत असलेल्या गुणधर्मांचे पृथ्थकरण केले जाते.
संपर्क- डॉ. के.पी. सिंग- ९६३७७१७८१८, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर, बडनेरा (अमरावती)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.