
कृषी अभियांत्रिकी (Agriculture Engineering) शाखेमध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित अन्न विज्ञान (Food Science), यांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering), रासायनिक अभियांत्रिकी आणि विद्यूत अभियांत्रिकी यांची सांगड घालण्यात येते. अन्य क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाची (Agriculture Mechanization) प्रक्रिया वेगाने होत असताना शेतीमध्येही त्याने चांगलाच वेग पकडलेला आहे. बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित घेतलेल्या विद्यार्थ्यांनी कृषी अभियांत्रिकीला प्रवेश घेता येतो. हा चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे. हे विद्यार्थी संशोधन, विकास आणि व्यवस्थापन क्षेत्रामध्ये चांगले काम करू शकतात.
कृषी अभियांत्रिकीचे महत्त्व :
१) शेतीसंबंधी यंत्रे, अवजारे : यामध्ये शेतीसंबंधित यंत्रे, अवजारे यांचे उत्पादन, सुधारणा करून अचूकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यासाठी आवश्यक ते संशोधन व विकास यामध्ये काम करता येते. उदा. विविध शेती कामांसाठी लागणारी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, यंत्रे, अवजारे, प्रतवारी आणि प्रक्रियेसाठीची यंत्रे इ.
२) प्रक्रिया व अन्न विज्ञान ः
उत्पादित झालेल्या शेतमालाची प्रतवारी, प्रक्रिया, बियाणे वर्गीकरण, अन्नधान्य साठवण इ. बाबतचे तंत्रज्ञान, यंत्रे यांचा अभ्यास केला जातो.
३) जलसंधारण अभियांत्रिकी : माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजना केल्या जातात, त्यामागील तंत्रज्ञान या विषयामध्ये अभ्यासले जाते.
४) अन्न सुरक्षेतील अभियांत्रिकी : यात तयार झालेल्या अन्नधान्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातील कार्यवाही केली जाते. उदा. सुरक्षितता साठा प्रणाली, उत्पादन प्रक्रियेचे विश्लेषण, निरोगी वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न केले जातात.
५) वन संरक्षण : एक संवर्धन तज्ञ आणि वनपाल एक विशेषज्ञ म्हणून संसाधने व्यवस्थापनाचे काम करता येते.
६) विविध कृषी आराखडे तयार करणे, बांधण्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीशी संबंधित विषय उपयोगी ठरतात. उदा. गोदाम, मृदा व जल संवर्धनाचे उपाययोजना, जलसाठे, धरणे बांधकाम इ.
कृषी अभियांत्रिकीचे महत्त्व :
भारत हा कृषी प्रधान देश आहे. मात्र त्यामध्ये यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात अद्यापही मोठे काम करावे लागणार आहे. कृषी अर्थव्यवस्था साधारणपणे चार टक्क्याने वाढत आहे. तिला एकूण अर्थव्यवस्थेच्या वेगाने वाढण्यासाठी आधुनिक यंत्रे, तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे पुढील पाच ५ ते १० वर्षांमध्ये कृषी अभियंत्यांची मागणी सुमारे ८ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. कृषी अभियांत्रिकीमध्ये अन्य अभियांत्रिकी क्षेत्रासाठी संबंधित काही अभ्यासक्रम असल्याने विविधांगी अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो. त्यामुळे या अभियांत्रिकी क्षेत्रातही संधी मिळू शकते. ग्रामीण भागातील हुशार मुलांनी या अभ्यासक्रमाबाबत नक्कीच विचार केला पाहिजे.
मंगेश राऊत, ९५०३९०९२०९
(कृषी सहायक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.