
यवतमाळ : जागतिक कापूस दिनाच्या (World Cotton Day) निमित्ताने घाटंजी येथील तिरुपती अॅग्रो इंडस्ट्रीज येथे सेंद्रिय कापूस उत्पादक (Cotton Farmers) शेतकऱ्यांच्या सभेत कापूसतज्ज्ञांनी (Cotton Experts) मार्गदर्शन करीत शेतकऱ्यांना सेंद्रिय कापूस उत्पादनाचे (Organic Cotton Production) महत्त्व पटवून दिले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपुष्टात याव्यात याकरिता ऑल इंडिया कॉटन फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असोसिएशनतर्फे मागील वर्षीपासून घाटंजी तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय कापूस उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात आला.
यामध्ये सध्या ५०० शेतकऱ्यांचा सहभाग आहे. या सर्व शेतकऱ्यांना सेंद्रिय कापूस उत्पादनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. सामूहिक बीज खरेदी, नैसर्गिक खत, निंबोळी अर्क निर्मिती यासह आवश्यक प्रशिक्षण दिले गेले. इतर शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी तसेच समजावून सांगण्यासाठी डेमो प्लॉट तयार करण्यात आला आहे.
सर्व कामे नियोजित व्हावी करिता व्हिलेज व्हॉलेंटिअर नियुक्त करण्यात आले आहे. या प्रकल्पाला विश्वमान्य संस्थेकडून सर्टिफिकेशन दिले जात आहे. यावर्षी दिवाळी दरम्यान प्रकल्पाला दुसरे सर्टिफिकेशन मिळेल. तीन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर जगभरातील कंपन्या याठिकाणी येऊन सेंद्रिय कापूस नेतील. या वर्षी सुद्धा प्रकल्पातील शेतकऱ्यांचा कापूस विक्री करून दिला जाणार आहे.
कापूस वेचणी बॅगचे मोफत वाटप
घाटंजी येथे जागतिक कापूस दिन साजरा करण्यात आला. येथे तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय कापूस शेतीचे महत्त्व पटवून दिले. शेतकऱ्यांना ५० किलो कापूस वेचणी बॅगचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्य वक्ते कॉटनगुरू मनीष डागा, नीरज कुमार (भारतीय कपास निगम), अजय शर्मा (रेमंड), विवेक रुंगटा (तिरुपती अग्रो इंडस्ट्रीज), अभिषेक ठाकरे (कृ. उ. बा. स.), कपिल चन्नावार (कृ. उ. बा. स.), अंकुल गेडाम (राशी सीड्स) उपस्थित होते. सूत्रसंचालन समर्थ तुपकर यांनी केले. मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.