Agriculture AI : ‘एआय’द्वारे घडेल सदाहरित कृषिक्रांती

Green Revolution : हरितक्रांतीतून देशाने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त केली असली तरी कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका या शेती तंत्रांच्या पलीकडे विस्तारत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता कृषी संसाधनांच्या पर्याप्त वापराबरोबरच पर्यावरणीय परिस्थितीचे आरोग्य सुस्थितीत राखण्यास मदतदायी ठरू शकते.
Agriculture AI
Agriculture AIAgrowon
Published on
Updated on

Agriculture Technology : जगभर कृषी तंत्रज्ञानामध्ये जलद गतीने बदल होत आहेत. हवामान बदल, लोकसंख्येची वाढ आणि संसाधनांची कमतरता यासारख्या जागतिक आव्हानांमुळे नवकल्पनांसह नवनवी कृषीतंत्रे आवश्यक होत आहेत. जगभर जसजशी उद्योग व्यवस्था बदलते आहे तशीच शेती क्षेत्रातही स्थित्यंतरे घडून येताहेत, ही निश्चितपणे जमेची बाजू आहे.

अर्थात काटेकोर शेती - पाण्याचे व्यवस्थापन, पीकबदल, पोषण व्यवस्थापन, काढणी व काढणीपश्चात नियोजन आणि शेतीमाल बाजारपेठेचे विश्लेषण आदींबाबत डिजिटल तंत्रज्ञान शेतकऱ्यांना शेती अधिक स्मार्ट, कार्यक्षम आणि शाश्वत करण्यास मदतीचे ठरणारे आहे.

अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ जॉन मॅकार्थी यांनी १९५५ मध्ये एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. बुद्धिमान यंत्रे बनवण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीचा वापर अशी या तंत्रज्ञानाची व्याख्या त्यांनी केली होती. अर्थात, माणसाप्रमाणे कार्यान्वित होणारी बुद्धिमत्ता संगणकीय प्रणालीद्वारे तयार करून अपेक्षित कार्य साध्य केले जाते, त्याला बुद्धिमत्ता म्हणून विचारात घेतले जाते.

कृत्रिम बुद्धिमत्ता रिमोट सेन्सिंग, ब्लॉक चेन, जीआयएस तंत्रज्ञान, रोबोटिक्स, ड्रोन, आदींतून शेतकऱ्यांसाठी अचूक हवामान अंदाज, माती आणि पीक आरोग्याचे विश्लेषण आणि भविष्यसूचक विश्लेषणातून अचूक शेती आदी बाबींतून कृषी परिसंस्थेचे स्वरूप बदलते आहे. याचा पिकावरील रोग ओळखणे, स्वयंचलित तण नियंत्रण प्रणाली, पशुधन आरोग्य निरीक्षण, पीक उत्पन्नासाठी अंदाजात्मक विश्लेषण, अचूक सिंचन प्रणाली, ड्रोनद्वारे हवाई पाळत ठेवणे, पुरवठा साखळी सक्षमतेसह आणि मागणी अंदाज आदी बाबींतून शेती पद्धतींमध्ये क्रांती घडत आहे. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता कृषी संसाधनांच्या पर्याप्त वापराबरोबरच पर्यावरणीय परिस्थितीचे आरोग्य देखील सुस्थितीत राखण्यास मदतदायी ठरू शकते.

Agriculture AI
Agriculture AI : शेती क्षेत्रात ‘एआय’चा वापर लाभदायी

कृषी परिसंस्थेतील बदल

जगभरातील वाढत्या लोकसंख्येसोबतच वाढती अन्न उत्पादनाची मागणी विचारात घेता पारंपरिक शेती पद्धतीच्या पलीकडे एआय सारख्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानातून कृषी परिसंस्थेमध्ये जलद बदल होताहेत.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अग्रीस्टीक (AgriStack) तयार करण्याची योजना आखली आहे. डिजिटल कृषी मिशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉक चेन, रिमोट सेन्सिंग आणि GIS तंत्रज्ञान, ड्रोन आणि रोबोट्सचा वापर इत्यादी नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांसाठी सरकारने सार्वजनिक आणि खाजगी सहभागातून २०२१-२०२५ साठी ही सुरुवात केली आहे.

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरात उत्तर अमेरिका आघाडीवर आहे. या देशातील शेतकरी लागवड आणि सिंचनापासून ते कीटक व्यवस्थापन आणि कापणीचे नियोजन, उत्पादतावाढ आणि पर्यावरणावरील बदलांचा प्रभाव कमी करण्यासाठी या तंत्राचा पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. हाँगकाँग, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाने या क्षेत्रात आघाडी घेतलेली आहे. भारत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत जगात १४ व्या क्रमांकावर आहे. जागतिक नवप्रर्वतक देशाच्या निर्देशांकामध्ये १३२ देशांच्या यादीत आपल्या देशाचा ५० वा क्रमांक आहे.

शेती करिअरचा मार्ग नव्हे!

कृषी क्षेत्राचे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केवळ एक पंचमांशापेक्षा कमी योगदान असूनही सुमारे ४६ टक्के कामगार अद्यापही या क्षेत्रात कार्यरत आहेत. हवामानातील बदलामुळे भारतीय शेतीला धोके निर्माण होत आहेत. सातत्याने बदलते हवामान, मजुरांची-निविष्ठांची कमतरता, यांत्रिकीकरण तसेच आधुनिक व नावीन्यपूर्ण शेतीच्या माहितीचा अभाव, मार्केटिंग आदी समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत.

दिवसेंदिवस शेतीखालील वाढते क्षेत्र, शेतजमिनींचे घटते आकारमान, वाढते अल्पभूधारकांचे प्रमाण, जंगलतोड, बदलते हवामान, रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या असंतुलित वापरामुळे एका बाजूला जमिनीची सुपीकता घटतेय, तर दुसरीकडे शेतजमिनीची उत्पादकता कमी होऊन पिकांची दरहेक्टरी उत्पादकता घटतेय.

या साऱ्यांचे प्रतिबिंब नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) २०२४ च्या अहवालात उमटले आहे. २०१६-१७ ते २०२१-२२ या काळात शेतकऱ्यांचे कर्ज ४७.४ टक्क्यांवरून ५२ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे हा अहवाल सांगतो. अनेक तरुण शेतीकडे करिअरचा महत्त्वाकांक्षी मार्ग म्हणून पाहत नाहीत, ही निश्चितच खेदाची बाब आहे.

अल्पभूधारकांना परवडणारे हवे तंत्रज्ञान

कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीतील बहुतांश आव्हाने कमी करू शकते. भारतामध्ये लहान आणि सीमांत शेतकरी सुमारे ८६ टक्के आहेत, ज्यामुळे शेतीचे उत्पन्न शाश्वत नाही. शेतीमध्ये एआयचे बरेच फायदे असूनही, अनेक घटकांमुळे शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा पूर्णपणे स्वीकार करता येत नाही. अशा तंत्रज्ञानासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज भासते. लहान शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा अडथळा ठरतोय.

याचे कारण असे की अशा शेतकऱ्यांकडे अनेकदा मर्यादित संसाधने असतात. तसेच विकसनशील देशातील अल्पभूधारक शेतकऱ्याकडे एआय प्रणाली खरेदी आणि देखरेख करण्यासाठी पुरेशी आर्थिक कुवत नसल्याने या तंत्राच्या वापरावर मर्यादा येतात. याखेरीज या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांच्या तुलनेत अल्पभूधारकांना हे तंत्रज्ञान परवडणारे नाही. याबाबी विचारात घेता परवडणारे तंत्रज्ञान, सक्षम पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणात लक्षणीय गुंतवणूक आवश्यक आहे.

Agriculture AI
Agriculture Ai : ‘एआय’ तंत्रज्ञानाने ऊस शेतीमध्ये क्रांतिकारक बदल

सदाहरित कृषिक्रांतीची पहाट

हरितक्रांतीतून देशाने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त केली असली तरी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका या शेती तंत्रांच्या पलीकडे विस्तारत आहे. सन २०२३ मध्ये कृषी बाजारातील जागतिक कृत्रिम बुद्धिमत्तेचे मूल्य १.८२ अब्ज डॉलर होते आणि २०३४ पर्यंत १२.४७ अब्ज डॉलर वाढण्याचा अंदाज आहे.

भारताचे २०२४ मधील कृत्रिम बुद्धिमत्तेचे बाजारमूल्य ५५.१७ दशलक्ष डॉलर असल्याचे दिसते. संसाधनांचे संरक्षण आणि हवामान बदल कमी करणे, शेतीला भविष्यासाठी अधिक अनुकूल आणि लवचीक बनवणे यासारख्या नव तंत्रज्ञानाने सध्याच्या शेती व्यवस्थेत आमूलाग्र बदलाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका निभावेल. या डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतीसाठी द्यावा लागणारा वेळ, पैसा, पाण्याची आणि खतांची बचत होईल तसेच मनुष्यबळ कमी लागेल.

शेतीबाजारपेठेचे विश्लेषण करून, पीक उत्पादनाचा अंदाज लावून योग्य किंमत धोरण निश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. ज्यामुळे शेतकऱ्यांना माहितीपूर्ण व्यवसाय निर्णय घेण्यास मदत होईल. आज कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडण्यासाठी आणि ग्राहकांना त्यांची उत्पादने थेट विकण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील.

याशिवाय कृषी पर्यटनासारख्या मूल्यवर्धित सेवांच्या विकासामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नव -नव्या संधी निर्माण होतील. या बाबी विचारात घेता माहिती, गोपनीयता आणि सुरक्षितता कृषी माहितीचे सुरक्षित संकलन, साठवण आणि सामायिकरण सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

यासाठी मजबूत सायबर सुरक्षा उपाय आणि माहिती व्यवस्थापन पद्धती आवश्यक आहेत. एकंदरीत डिजिटल पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानानाविषयी जागरूकता आणि प्रशिक्षणाला चालना यासह संशोधन आणि विकासावर भर देऊन पुरेशा गुंतवणुकीतून सदाहरित कृषिक्रांतीची पहाट उजाडेल.

(लेखक कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com