Python Rearing : वेगवान, उच्च प्रथिनयुक्त मांस उत्पादनासाठी अजगरपालन!

Meat Production : कमी आहारामध्ये अधिक मांसाचे पर्यावरणपूरक उत्पादन घेण्यासाठी अजगर (पायथॉन)पालन भविष्यात महत्त्वाचे ठरू शकते, असा निष्कर्ष त्यांनी ‘सायंटिफिक रिपोर्टस’मध्ये प्रकाशित संशोधनामध्ये मांडला आहे.
Python Rearing
Python RearingAgrowon

Environmentally Friendly Production of Meat : वेगवान, उच्च प्रथिनयुक्त मांस उत्पादनासाठी अजगरपालन!पारंपरिक पशुपालनाच्या पर्यायांचा शोध गेल्या काही वर्षांत सातत्याने घेतला जात आहे. कारण वातावरण बदलाच्या समस्येमध्ये सध्याच्या गाय, म्हशी, कोंबड्या यांसारख्या पाळीव पशुपक्ष्यांच्या खाद्य ते मांस या परिवर्तनाची कार्यक्षमता ही तुलनेने कमी आहे.

या संदर्भात मॅक्वॅरेई विद्यापीठाच्या नैसर्गिक शास्त्र विद्यालयातील संशोधक डॉ. डॅनिअल नॅटूश्‍च यांनी ईशान्य आशियातील दोन व्यावसायिक अजगर (पायथॉन)पालन फार्ममध्ये केलेल्या अभ्यासातून आश्‍चर्यकारक निष्कर्ष हाती आले आहेत. कमी आहारामध्ये अधिक मांसाचे पर्यावरणपूरक उत्पादन घेण्यासाठी अजगर (पायथॉन)पालन भविष्यात महत्त्वाचे ठरू शकते, असा निष्कर्ष त्यांनी ‘सायंटिफिक रिपोर्टस’मध्ये प्रकाशित संशोधनामध्ये मांडला आहे.

आपल्या संशोधनाविषयी बोलताना डॉ. नॅटूश्‍च म्हणाले, की अन्न आणि प्रथिनांच्या परिवर्तनाचे गुणोत्तराचा विचार केला असता पायथॉन हे अन्य कोणत्याही पाळीव प्राण्यांच्या तुलनेमध्ये फारच पुढे असल्याचे दिसून येते. अगदी अंड्यातून बाहेर पडल्यानंतर वेगाने वाढून एका वर्षाच्या आतच ते कत्तलीयोग्य वजनाचे होत असल्याचे दिसून आले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सापांचे मांस हे पांढरे आणि उच्च प्रथिनमूल्ययुक्त आहे.

या संशोधनामध्ये ऑस्ट्रेलियातील मॅक्वॅरेई विद्यापीठासोबतच अॅडलेड विद्यापीठ, इंग्लंड येथील ऑक्स्फोर्ड विद्यापीठ, दक्षिण अमेरिकेतील विटवॉटर्सरॅंड आणि व्हिएतनाम येथील शास्त्र आणि तंत्रज्ञान अॅकेडमी येथील शास्त्रज्ञांचा समावेश होता. त्यांनी थायलंड आणि व्हिएतनाम येथील व्यावसायिकरीत्या पाळल्या जात असलेल्या रेटिक्युलेटेड पायथॉन (शा. नाव - Malayopython reticulatus) आणि बर्मिज पायथॉन (शा. नाव - Python bivittatus) या अजगराच्या जातींचा तुलनात्मक अभ्यास केला.

Python Rearing
Meat Waste : मांसाच्या ‘वेस्ट’पासून तयार होणार पौष्टिक पशुखाद्य

भविष्यातील वाढत्या लोकसंख्येला उच्च प्रथिनयुक्त अन्नाचा पुरवठा करण्यासाठी पारंपरिक पशुपक्षिपालन आणि वनस्पतिजन्य पदार्थ हे पुरेसे ठरणार नाहीत. मुळात आत्ताच कमी उत्पन्न गटातील देशांमध्ये प्रथिनांची तीव्र कमतरता दिसून येत असल्याचे डॉ. नॅटूश्‍च यांनी सांगितले. आपल्या पारंपरिक पाळीव प्राण्यांमध्ये उष्ण रक्ताचे प्राणी हे आहार ते प्रथिने या परिवर्तनामध्ये थंड रक्ताच्या सरीसृपाइतके कार्यक्षम ठरत नाही.

आग्नेय आशिया आणि चीन सारख्या देशांमध्ये सापांचे मांस पूर्वीपासूनच खाल्ले जाते. उच्च प्रथिनयुक्त आणि कमी संपृक्त मेदयुक्त असे हे सापांचे मांस पर्यावरणपूरक आणि शाश्‍वत मानले जाते. त्यामुळे आशियातील या भागामध्ये मोठमोठे व्यावसायिक अजगर फार्म दिसून येतात. त्या तुलनेमध्ये या मांसाकडे अन्य जगातील मुख्य प्रवाहातील शास्त्रज्ञांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. सापांना फारच कमी पाणी लागते. काही साप तर सकाळी त्यांच्या खवल्यांवर पडणाऱ्या दवबिंदूवर जगतात. त्याच प्रमाणे बहुतांश साप हे पिकांसाठी त्रासदायक ठरणाऱ्या उंदीरवर्गीय प्राण्यांवर जगतात.

खर्च - फायद्याचे गणित

मॅक्वॅरेई विद्यापीठातील प्रो. रिक शाईन यांनी या अजगरांच्या संगोपनाचा, खाद्य आणि मिळणाऱ्या व्यावसायिक फायद्यांचा अभ्यास केला. त्यांच्या मते, वराहपालनापेक्षाही अजगराचे पालन हे आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरते. अजगरांचे फार्म हे एखाद्या मोठ्या उघड्या गोदामाप्रमाणे असून, वरून सूर्यप्रकाश येण्याची सोय ठेवलेली असते. मध्ये

पक्षी किंवा सस्तन प्राणी खात असलेल्या अन्नातून मिळणाऱ्या ऊर्जेपैकी सुमारे ९० टक्के ऊर्जा शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी वापरत असतात. मात्र थंड रक्ताच्या प्राण्यांमध्ये शरीराचे तापमान योग्य ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर केला जातो. त्यामुळे ते खात असलेल्या अन्नाचा मोठा भाग हा मांसामध्ये रूपांतरित होत असतो. त्यामुळे कमी आहारामध्येही ते वेगाने वाढू शकतात.

Python Rearing
Food Labeling Standards : लेबलिंग मानकांचे महत्त्व

भविष्यवेधी व्यवसाय

आग्नेय आशियातील काही अजगर फार्म परिसरातील गावकऱ्यांना पाळण्यासाठी लहान अजगर देतात. या अजगरांना उंदीर आणि अन्य छोटे प्राणी खाऊ घालून वाढविल्यानंतर एका वर्षाने त्याची चांगली रक्कम गावकऱ्यांना दिली जाते. या प्रारूपातून दोघांनाही चांगले उत्पन्न मिळते.

भविष्यातील प्रथिनांची पूर्तता करण्यासाठी अजगराचे पालन हा एक किफायतशीर उद्योग ठरू शकतो. आग्नेय आशियातील देशांप्रमाणेच ऑस्ट्रेलिया किंवा युरोपातील देशांमध्ये स्नेक फार्म हळूहळू रुजत जातील, असा विश्वास डॉ. डॅनिअल नॅटूश्‍च यांनी व्यक्त केला.

अजगरपालनाचा किफायतशीरपणा...

या प्रयोगामध्ये पायथॉनच्या एका गटाला मांस आणि माशांच्या टाकाऊ घटकांपासून तयार केलेल्या सॉसेस वर वाढविण्यात आले. त्यात अजगराची पिले कोणत्याही विपरीत परिणामाशिवाय वेगाने वाढल्याचे दिसून आले.

सामान्यतः नैसर्गिक स्थितीमध्ये अजगर हे मांसाहारी असले तरी त्यांच्या एक गटाला सोयाबीन आणि अन्य भाज्यांपासून मिळवलेल्या प्रथिने आणि १० टक्के टाकाऊ मांसाच्या सॉसेसवर वाढवले. सॉसेसच्या आवरणाखाली असलेल्या भाज्याही हे अजगर चांगल्या प्रकारे पचवू शकतात. म्हणजेच कृषी क्षेत्रातील टाकाऊ घटकांचे रूपांतरही उच्च प्रथिनांमध्ये करणे शक्य आहे.

एखाद्या जिवंत अजगराच्या वजनाच्या सुमारे ८२ टक्के इतके वापरण्यायोग्य मांस उपलब्ध होते. त्वचेपासून उच्च दर्जाची कातडी उपलब्ध होते, तर त्यांचे मेद (तेल) आणि पित्त मूत्राशयातील अनेक रसायने ही वेगवेगळ्या औषधांच्या निर्मितीमध्ये वापरली जातात.

सरीसृपांच्या पालनामध्ये सस्तन प्राण्याच्या तुलनेमध्ये फारच कमी हरितगृह वायू बाहेर पडतात.

त्यांची पचनसंस्था खाल्लेल्या प्राण्यांची हाडेही पचवू शकते. त्यामुळे सस्तन प्राण्याच्या तुलनेत फारच कमी घनविष्ठा, जवळपास शून्य इतके द्रवपदार्थ निर्माण होतात.

या अजगरांना सुमारे चार महिन्यांपर्यंत काही खायला मिळाले नाही, तरी त्यांचे वजन कमी होत नाही. पुन्हा आहार सुरू केल्यानंतर त्यांची वाढ वेगाने सुरू होते. म्हणजेच आहाराची कमतरता असलेल्या स्थितीमध्येही चांगले उत्पादन देण्याची क्षमता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com