Agriculture Spraying Technology : फवारणीचे प्रकार, पद्धती अन् तंत्रज्ञान

Agriculture Technology : विविध जैविक किंवा वनस्पतिजन्य कीडनाशकांचा वापर ही तितकाच महत्त्वाचा असतो. कीडनाशक कोणतेही असो, त्याची फवारणी पद्धती ही प्रामुख्याने प्रति हेक्टरी किती द्रावण फवारायचे आहे, यावर ठरवली जाते.
Agriculture Spraying Technology
Agriculture Spraying TechnologyAgrowon

डॉ. सचिन नलावडे

Indian Agriculture : एकात्मिक पीक संरक्षणामध्ये रासायनिक घटकांची फवारणी हा अंतिम उपचार मानला जातो. मात्र त्यापूर्वी विविध जैविक किंवा वनस्पतिजन्य कीडनाशकांचा वापर ही तितकाच महत्त्वाचा असतो. कीडनाशक कोणतेही असो, त्याची फवारणी पद्धती ही प्रामुख्याने प्रति हेक्टरी किती द्रावण फवारायचे आहे, यावर ठरवली जाते. यामध्ये कीडनाशकातील कार्यकारी घटकाचे (मुख्य मूलद्रव्याचे) प्रमाण किंवा त्याचे प्रति हेक्टरी माप तितकेच ठेवले जाणे आवश्यक असते.

आपले लक्ष्य नेमके कोणते?

आपल्याला ज्या किडीसाठी, रोगासाठी किंवा तणाच्या निर्मूलनासाठी फवारणी करायची आहे, त्याचा नेमका प्रकार कोणता हे जाणून घेतले पाहिजे. उदा. कीड पाने खाणारी आहे, की रसशोषक आहे. हा रोग बुरशी, जिवाणू किंवा विषाणूजन्य आहे. तोच प्रकार तणांचा. तण मोठ्या पानांचे आहे की गवतवर्गीय इ. आपले नेमके लक्ष्य कोणते, हे माहिती असले की कीडनाशक कार्यक्षमपणे आणि काटकसरीने वापरता येते.

त्यातही किडीचा जीवनक्रम व त्यातही नुकसानकारक आणि संवेदनशील अवस्था कोणती, हे माहिती करून घ्यावे. अनेक किडीमध्ये या दोन्ही अवस्था वेगवेगळ्या असतात. त्यातील नेमक्या संवेदनशील अवस्थेमध्ये फवारणी केल्यास किडीचे प्रभावीपणे नियंत्रण करणे शक्य होते. त्यासाठी कीडनाशकाच्या निवडीइतकीच ते फवारण्याची योग्य यंत्रणा निवड महत्त्वाची ठरते. त्यासाठी -

लक्ष्याची योग्य माहिती.

कुठे, कधी आणि किती कीटकनाशक फवारायचे, याची नेमकी शिफारस.

फवारणीच्या थेंबांचा योग्य आकार, द्रावणाची घनता आणि वितरण.

Agriculture Spraying Technology
Agriculture Technology : कृषी पर्यटन, शेती-प्रक्रिया उद्योगाचे प्रेरणादायी मॉडेल

कीडनाशक फवारणीचे प्रकार

पानांवरील फवारणी - झाडांच्या जमिनीवरील भागावर, वरून आणि खालून सर्वत्र एकाच वेळी योग्य दाबाने फवारणी करावी लागते. त्यात पाने ओली झाली पाहिजेत. पण द्रावण वाहून जाणार नाही, याची काळजी घ्यावी.

रोखून (डायरेक्टेड) फवारणी - उदा. पिकाजवळील फक्त तणांच्या दिशेने केली जाणारी फवारणी.

नेमक्या बिंदूवर फवारणी (स्पॉट) - शेतातील एखादे विशिष्ट झाड किंवा त्याच्या ठरावीक भागावरील फवारणी.

पट्टा फवारणी - एखाद्या विशिष्ट पट्ट्यामध्ये एकापेक्षा जास्त झाडांवर किंवा ओळींवर फवारणी.

स्प्रे शील्ड (फवारणी कवच) - उभ्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करण्यासाठी विशिष्ट प्लॅस्टिकचे कवच वापरून केली जाणारी फवारणी.

फवारणी साधने निवडताना...

फवारणी साधनांची निवड करताना आपले क्षेत्र, पिके व त्यांची गरज यांचा विचार करणे आवश्यक असते. केवळ अपुऱ्या माहितीवर विक्रेत्यांच्या भूलथापांना बळी पडून यंत्र खरेदी करणे टाळावे. फवारणी साधनांची खरेदी ही दीर्घ मुदतीची गुंतवणूक आहे. त्यामुळे खरेदीवेळी आपणही दीर्घकालीन विचार करावा. आपले भविष्यातील नियोजन व त्यातील बदल यांचाही विचार करावा. साधनांची खालील बाबतीत तपासणी करावी.

नेमकी कोणती कामे करतो किंवा विशिष्ट कामासाठी उपयुक्त आहे का?

वापरण्यास आणि देखभालीस सोपे आहे का?

जास्त काळ करण्याची क्षमता आहे का?

कार्यक्षमता किती?

आसपास दुरुस्तीची सुविधा आहे का?

सुट्टे भाग सहज उपलब्ध होतात का?

मजबूत आणि दणकट संरचना आहे का? (जास्त आयुष्य.)

एखादे यंत्रे किंवा साधन हे खरेदी करण्यापूर्वी चोखंदळपणा दाखवणे किंवा चिकित्सा करणे कधीही चांगले. त्यातून चांगली कार्यक्षम यंत्र आपल्याकडे येईल, अन्यथा घरी आलेल्या यंत्राला उगीचच चांगले म्हणत काम रेटावे लागेल. हे कायम लक्षात ठेवा.

Agriculture Spraying Technology
Modern Agriculture Technology : भाजीपाला पिकातील आधुनिक तंत्रज्ञान

फवारणी यंत्राचा परिचलन सिद्धांत -

द्रव + ऊर्जा = बारीक थेंब

म्हणजेच द्रव पदार्थांवर वेगवेगळ्या गतीज ऊर्जेची प्रक्रिया करून द्रवाचे अतिशय लहान थेंबामध्ये रूपांतर केले जाते. तयार झालेले हे लहान थेंब आपल्या लक्ष्यापर्यंत (झाड, पाने, तण इ.) पोहोचविण्यासाठीही ऊर्जेची मदत होते. त्यासाठी सामान्यतः पुढील ऊर्जा वापरल्या जातात.

हायड्रॉलिक (द्रव) : द्रवावर हवेचा दाब वाढवून उच्च दाबाखाली हा द्रव बारीक नोझल (छिद्र)मधून बाहेर फेकला जातो.

गॅसिअस (वायू): द्रव हवेच्या झोतामध्ये / प्रवाहामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात सोडला जातो. हवेबरोबर लक्ष्यापर्यंत बारीक थेंबात पोहोचवला जातो.

केंद्रोत्सारी बल : एका वेगाने फिरणाऱ्या तबकडीवर द्रव बारीक धारेने सोडला जातो. जो केंद्रोत्सारी बलामुळे तबकडीवरून वेगाने अतिबारीक थेंबात बाहेर पडतो.

फवारणीच्या थेंबाच्या आकारमानानुसार पद्धती :

फवारणीसाठी द्रावणाच्या थेंबाचे आकारमान हा महत्त्वाचा विषय आहे. पूर्वी द्रावणाच्या फवारणीचे थेंब जास्त आकारमानाचे असत. मात्र आता तंत्रज्ञानामध्ये झालेल्या संशोधनामुळे अतिलहान थेंब मिळविण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. आता कमीत कमी पाणी वाहक म्हणून वापरण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे LV आणि ULV तंत्रज्ञानाचा उपयोग जास्त होत आहे.

१) जास्त आकारमान (HVvolume) ः यासाठी कमी संहत द्रावण वापरतात. उदा. एका हेक्टरला २०० लि.पेक्षा जास्त फवारणी करावी लागते. थेंबांचा आकार ३५० मायक्रॉनपेक्षा जास्त असतो. हे कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशक फवारणीसाठी उपयुक्त असून, त्यासाठी पाठीवरचे हात पंपाचे स्प्रेअर किंवा ट्रॅक्टरचलित बूम स्प्रेअर वापरता येतात.

२) कमी आकारमान (LV) ः या तंत्रामध्ये थेंबाचा आकार ५० ते ३५० मायक्रॉन इतका असतो. यामध्ये थोडे जास्त संहत द्रावण वापरावे लागते. हेक्टरी १० ते १५० लिटर द्रावणाची फवारणी केली जाते. याचा उपयोग कीटकनाशक आणि बुरशीनाशक फवारण्यासाठी. यासाठी अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे मोटरयुक्त पाठीवरील स्प्रेअर, कमी वेगाने फिरणाऱ्या डिस्कचे स्प्रेअर, ड्रोन स्प्रेअर आणि विमानातील स्प्रेअर अशा प्रगत यंत्रणेची आवश्यकता भासते.

३) अत्यंत कमी आकारमान (ULV) फवारणी ः यामध्ये थेंबाचा आकार ०-५० मायक्रॉन असतो. फवारणीसाठी अतिसंहत द्रावण वापरले जाते. हेक्टरी फक्त १ ते ५ लिटर द्रावणाची फवारणी करतात. कीटकनाशक फवारणीसाठी उपयुक्त आहेत. त्यासाठी जास्त वेगाने फिरणाऱ्या तबकडीचे स्प्रेअर, इंजिनवाले पाठीवरचे स्प्रेअर (विशिष्ट फिरणाऱ्या डिस्कची जोडणी असलेले) किंवा ट्रॅक्टरचलित मिस्ट ब्लोअर इ. अत्याधुनिक फवारणी साधने वापरावी लागतात.

डॉ. सचिन नलावडे ९४२२३८२०४९,

(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com