Chhatrapati Sambhajinagar News : जायकवाडीच्या दिशेने नाशिक, नगर भागातील विविध प्रकल्पांतून रविवारी (ता. २६) पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. वाढविलेला विसर्ग पाहता आधी सोमवारी दुपारनंतर व आता सोमवारी सायंकाळी उशिरा किंवा मंगळवारी (ता. २८) पहाटे जायकवाडी प्रकल्पात पाण्याची आवक सुरू होण्याची आशा आहे.
समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणानुसार जायकवाडी करिता ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ३० ऑक्टोबरला दिले. त्या आदेशाची अंमलबजावणी गतिमान होण्यासाठी २४ नोव्हेंबर उजाडावे लागले.
२५ नोव्हेंबरला दारणा प्रकल्पातून १९२ क्युसेकने तर निळवंडे प्रकल्पातून १०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. आदेशित ८.६ टीएमसी पाण्यापैकी मुळा धरण समूहातून २.१० टीएमसी, प्रवरा धरण समूहातून ३.३६ टीएमसी, गंगापूर धरण समूहातून ०.५ टीएमसी, गोदावरी दारणा धरण समूहातून २.६४३ टीएमसी पाणी सोडणे अपेक्षित आहे.
पाणी सोडण्याची प्रक्रिया रविवारी अधिक गतिमान झाली दारणा प्रकल्पातून सकाळी ८ वाजता ६४२ क्युसेकने सुरू असलेला पाण्याचा विसर्ग सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७००० क्युसेक करण्यात आला होता.
दुसरीकडे गंगापूर प्रकल्पातून सकाळी ७ वाजताच्या सुमारास ५०६ क्युसेकने सुरू असलेला विसर्ग सायंकाळी ५ वाजता २६१६ क्युसेक करण्यात आला होता.कडवा प्रकल्पातून सकाळी साडेसात वाजता ५०६ क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग दुपारी २ वाजता १६२४ क्युसेक करण्यात आला होता.
मुकणे प्रकल्पातून सकाळी साडेआठच्या सुमारास ५०७ क्युसेकने सुरू असलेला विसर्ग दुपारी २ वाजता ११०० क्युसेक करण्यात आला होता. याशिवाय मुळा प्रकल्पातून रविवारी दुपारी ३ वाजता ४००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
सोबतच भाम प्रकल्पातून १५० क्युसेकने सायंकाळी ५:३० वाजता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. निळवंडे धरणातून रविवारी सुरू असलेला ८ हजार क्युसेकने सुरू असलेला पाण्याचा विसर्ग त्याच दिवशी दुपारी २ नंतर १० हजार क्युसेक करण्यात आला होता.
मंगळवारी(ता. २७) दुपारी बारा वाजता हा विसर्ग १० हजार १ क्युसेकने सुरू होता. त्याचवेळी मुळा धरणातून ६ हजार क्युसेक, दारणा ७५५६ क्युसेक, मुकणे ९०० क्युसेक, कडवा ३२४८ क्युसेक तर गंगापूर प्रकल्पातून २६१६ क्युसेकने जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. माहितीनुसार, दारणा, गंगापूर, कडवा, मुकणे आदी प्रकल्पांतून सोडल्या जाणाऱ्या पाण्याला जवळपास २२५ ते २५० किलोमीटरचे अंतर कापून जायकवाडीत दाखल व्हावे लागते.
शिवाय मुळा प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याला जवळपास १२५ किलोमीटरचे अंतर कापून जायकवाडीत दाखल होता येते. सूत्रांच्या माहितीनुसार, मुळा धरणाचे पाणी प्रवरा नदीमार्गे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यापर्यंत आले होते. सोमवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ते कायगाव टोकाला दाखल होण्याचा अंदाज होता. शिवाय गोदावरी मार्गे येणारे पाणी पूलतांबा येथे आले होते. सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत कायगाव टोकाला पोहचण्याचा अंदाज होता.
पावसामुळे पाण्याची आवक सुरू
जायकवाडी लाभक्षेत्रात झालेल्या अति जोरदार पावसामुळे मंगळवारी (ता. २७) सकाळी ६ वाजता पासूनच जायकवाडीत पाण्याचे आवक सुरू झाली होती. जवळपास ६५०९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती जायकवाडी प्रकल्पाच्या प्रशासनाकडून देण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.