शेती कामासाठी दिवसेंदिवस मजुरांची कमतरता (Labour Shortage) जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी सुधारित कृषी अवजारे (Improve Agriculture Tools) आणि यंत्रांच्या वापरावर अधिक भर देणे गरजेचे आहे. यामुळे उत्पादन खर्च कमी करून पीक उत्पादन (Crop Production) आणि उत्पादकता वाढविणे शक्य होईल. सुधारित कृषी अवजारे (Agriculture Implements) आणि यंत्रावर संशोधन करण्याच्या अनुषंगाने नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत (ICAR) अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्र संशोधन प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. हे प्रकल्प भारतामध्ये २५ संशोधन केंद्रावर राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्रामध्ये १९७५ पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कृषी अवजारे आणि यंत्रे संशोधन केंद्र कार्यरत आहे. राज्यातील कृषी, सामाजिक आणि आर्थिक बाबींचा अभ्यास करून, तसेच विविध कृषी हवामान विभागातील यांत्रिकीकरणाची गरज ओळखून ‘सुधारित कृषी अवजारांचे संशोधन आणि विकास’ हे या केंद्राचे प्रमुख कार्य आहे.
प्रकल्पाचे कार्य ः
- सुधारित कृषी अवजारांचे संशोधन व विकास.
- सुधारित अवजारांचे उत्पादन.
- सुधारित अवजारांच्या प्रक्षेत्रीय पडताळणी चाचण्या.
- सुधारित अवजारांचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार करण्यासाठी प्रात्यक्षिक आयोजन.
- कृषी अवजारे उत्पादकांना तांत्रिक मार्गदर्शन करून अवजारांचे उत्पादन करणे.
- उत्पादकांनी तयार केलेल्या अवजारांची गुणवत्ता तपासून प्रमाणीकरण.
- सुधारित अवजारांच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी ‘शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे’ आयोजन करणे.
- फिरत्या निधीतून सुधारित कृषी अवजारांची निर्मिती व विक्री.
संशोधन आणि विकास कार्य ः
- राज्यातील वेगवेगळ्या कृषी हवामान विभागातील यांत्रिकीकरणाच्या तफावती तसेच प्रचलित पीक पद्धती अनुरूप सुधारित कृषी अवजारे विकसित करण्यात येतात. वेगवेगळ्या विभागातील शेतकऱ्यांची गरज पाहून त्यानुसार कृषी अवजारे प्रामुख्याने विकसित केली जातात.
- या संशोधन व विकास कार्यात शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ व कृषी अवजारे उत्पादक यांना सहभागी केले जाते. जेणेकरून शेतकऱ्यांना सद्यःस्थितीत आवश्यक असलेल्या अवजारांवर संशोधन करून ती विकसित केली जातील. याच अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्र संशोधन प्रकल्पामार्फत अनेक कृषी अवजारांची शिफारस करण्यात आली आहे.
सुधारित कृषी अवजारांचे उत्पादन करणे ः
या प्रकल्पामध्ये संशोधनावर आधारित सुधारित कृषी अवजारे व यंत्रे विकसित केली जातात. ही अवजारे देशातील व राज्यातील विविध संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे यांच्याकडे प्रक्षेत्रीय चाचणीसाठी पाठविली जातात. चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या अवजारांची उपलब्धता शेतकऱ्यांना लवकरात लवकर होण्याकरिता कृषी अवजारे उत्पादकांची मदत घेतली जाते. त्यासाठी त्यांना तांत्रिक मार्गदर्शन पुरविले जाते. प्रकल्पामार्फत आजपर्यंत १७, ३४१ सुधारित कृषी अवजारे विकसित करण्यात आली आहेत.
प्रक्षेत्रावरील पडताळणी चाचणी ः
विकसित केलेल्या सुधारित कृषी अवजारांच्या प्रक्षेत्रीय पडताळणी चाचण्या होतात. सदर चाचण्यांमधील निष्कर्षाच्या आधारावर कृषी अवजारांच्या संरचनेमध्ये सातत्याने सुधारणा केल्या जातात.
सुधारित कृषी अवजारांची प्रात्यक्षिके ः
सुधारित कृषी अवजारांच्या प्रसारासाठी कृषी विद्यापीठ प्रक्षेत्र, कृषी संशोधन केंद्रातील प्रक्षेत्र व शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिके आयोजित केली जातात. यामध्ये शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी विस्तार कार्यकर्ते इत्यादींना सहभागी केले जाते. जेणेकरून सदर कृषी अवजारांच्या उपयुक्ततेविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती होईल.
सुधारित कृषी अवजारांची गुणवत्ता तपासणी ः
शेतकऱ्यांना अवजारांचे वितरण करण्यापूर्वी अवजारे व यंत्राची प्रक्षेत्रीय कार्यक्षमता आणि गुणवत्ता तपासणी करणे आवश्यक असते. त्यासाठी भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे यांत्रिकी व तंत्रज्ञान विभागामार्फत या केंद्राला अवजारांच्या चाचणीसाठी परवाना दिला आहे. या अंतर्गत संशोधन केंद्राद्वारे अवजारांच्या विविध शास्त्रीय पडताळणी चाचण्या घेऊन त्यांचे प्रमाणीकरण केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी अवजारे उत्पादकांना ही अवजारे अनुदानावर उपलब्ध होतात. प्रकल्पामध्ये आजपर्यंत सुमारे ३५८ कृषी अवजारांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
फिरत्या निधीतून अवजारांची निर्मिती व विक्री ः
- अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे योजनेअंतर्गत कार्यान्वित फिरत्या निधीतून विविध सुधारित अवजारांची निर्मिती केली जाते.
- प्रकल्पाद्वारे मनुष्यचलित नारळ सोलणी यंत्र, मनुष्यचलीत भुईमूग शेंगा फोडणी यंत्र, बैलचलित व ट्रॅक्टरचलित बहुपीक टोकण यंत्र, मका सोलणी यंत्र, भेंडी कात्री, आंबा व चिकू काढणीसाठी झेला, दातेरी विळे, खुरपी, सायकल कोळपे इत्यादी अवजारे विकसित करण्यात आली आहेत.
कृषी विस्तार कार्य ः
सुधारित कृषी अवजारांचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार करण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कृषी यांत्रिकीकरण विषयक माहिती शेतकऱ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी दूरचित्र वाहिन्या, आकाशवाणी आणि मुद्रित माध्यमांमध्ये विविध मासिके, साप्ताहिके आणि दैनिकांची मदत घेतली जाते. सोबतच शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शने आणि शिवार फेरी यामध्ये ही यंत्रे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जातात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.