
कोणतेही यंत्र (Agriculture Machinery) किंवा अवजार (Agriculture Tools) विकत घेतल्यानंतर अधिक काळ चालण्यासाठी त्याची देखभाल आवश्यक असते. देखभालीविना अवजारांची उपयुक्तता, कार्यक्षमता कमी होत जाते. कामही चांगले होत नाही, तसेच ते चालण्यासाठी अधिक ऊर्जाही लागते. अवजारांची देखभाल (Agriculture Tools Maintenance) आणि निगा कशी घ्यावी, याची माहिती या लेखातून घेऊ.
१) तव्याच्या नांगराची देखभाल ः
-सर्व बेअरिंग्जना नियमित ग्रीस लावावे.
- चालकास ट्रॅक्टरचा स्टिअरिंग जड जात असेल तर नांगराच्या सर्व जुळवण्या तपासून पाहाव्यात.
- तव्यांच्या कडा बोथट झाल्या असल्यास धारदार करून घ्याव्यात.
-तव्यांचा कोन योग्य प्रमाणात ठेवल्यास तव्यांच्या कडा धारदार करण्याची गरज नसते.
- तव्यांचे सर्व नट - बोल्ट वरचेवर तपासून घट्ट करावेत.
- ट्रॅक्टरच्या पुढील चाकांवर पुरेसे वजन (बॅलेस्टींग) द्यावे, त्यामुळे ट्रॅक्टरचा समतोल राहण्यास मदत होते.
- मार्गदर्शक पुस्तिकेत प्रमाणित केलेल्या खोलीवरच हायड्रॉलिक सिस्टीम कार्यान्वित करावी.
- जर नवीन नांगर असल्यास दोन तास काम केल्यानंतर सर्व नट बोल्ट तपासून घट्ट करावेत.
२) कल्टिव्हेटर यंत्राची देखभाल ः
- यंत्र वापरानंतर व्यवस्थित धुवून तसेच पुसून ठेवावे.
-पात्यांना गंज प्रतिबंधक रसायन किंवा खराब झालेले इंजिन ऑइल लावावे. अन्य भागांना ऑइल पेंट द्यावा.
-वापरण्यापूवी सर्व नटबोल्टस तपासून घ्यावेत. आवश्यकतेनुसार घट्ट करावेत.
- वापरानंतर यंत्र शेडमध्ये ठेवावे. पाऊस आणि ओलाव्यापासून संरक्षण केल्यास यंत्राचे भाग गंजणार नाहीत.
- पाते डबल पॉइंट असल्यास व पाते घासले गेलेले असल्यास पुढील वापरासाठी त्याचे टोक वरती उलटवून बसवावे.
कडबा कुट्टी यंत्राची काळजी व दक्षता ः
-यंत्राला लागणारे व्होल्टेज योग्य असल्याचे तपासून यंत्र सुरू करावे.
-यंत्राची पाती ब्लेड व्यवस्थित लावावीत. यंत्राची दाढ व पाती ब्लेड मधील अंतर योग्य राखावे.
- पात्यांची धार चांगली असावी.
-यंत्राच्या कटिंग व्हील व पुली यांचे बोल्ट काढून चाक हाताने फिरवून खात्री करावी.
-कमी वैरण घालून म्हणजेच साधारण एक पेंढीपेक्षा कमी वैरण घालून यंत्र चालविल्यास वैरण व्हीलच्या मध्यभागी व दोन्ही बाजूला गुंडाळून यंत्रावर लोड येतो.
- मद्यपान किंवा धूम्रपान करत मशिनवर काम करू नये.
-लहान मुलांना यंत्रापासून दूर ठेवावे.
- यंत्र चालू केल्यानंतर मध्येच लाइट गेल्यास स्वीच बंद करावा. मशिनचे चाक उलट्या गतीने फिरवून घ्यावे.
- यंत्राला जनावरांचा धक्का लागणार नाही, अशा ठिकाणी यंत्र ठेवावे.
- यंत्र दररोज स्वच्छ करावी.
-यंत्र व्यवस्थित फाउंडेशनवर फिटिंग करावे.
- वापर झाल्यानंतर मशिन कोरड्या व हवेशीर जागी ठेवावी.
-यंत्राच्या फिरत्या भागावर संरक्षक जाळी असावी. म्हणजे अपघाताची किंवा धोक्याची शक्यता कमी होते.
-बेल्टवरील ताण योग्य तितका असावा. अतिघट्ट अथवा सैल नसावा.
----------------------
डॉ. तुळशीदास बास्टेवाड
(प्राध्यापक व प्रमुख संशोधक, अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.