
मुंबई : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात शेतकरी सन्मान योजना (State Sheatkari Snman Yojana) राबविण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत कुठलीही अंतिम तयारी झाली नसताना त्याची केवळ माध्यमांतून चर्चा सुरू आहे. भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने शिंदे गटाचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी ही माहिती बाहेर फोडल्याने भाजपच्या गोटात धूसफूस सुरू आहे.
२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यस्तरावर ही योजना राबविण्याची तयारी सुरू झाली. मात्र प्रचंड खर्चिक असलेली ही योजना मागे ठेवण्यात आली. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही योजना मागे पडली. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यात नवी सन्मान योजना आणण्याची हालचाल सुरू आहे. यासाठी अर्थ विभाग आणि कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांच्या काही बैठकाही झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजनेत राज्य सरकारचा वाटा समाविष्ट करून वार्षिक मदत करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र त्यासाठी अंतिम स्वरुप देण्यात आलेले नाही.
या योजनेसाठी मोठी वित्तीय तरतूद हवी असल्याने त्याबाबत मतमतांतरे आहेत. कृषी विभागाचा प्रस्ताव आल्यानंतर वित्त आणि विधी व न्याय विभागाचा अभिप्राय आल्यानंतर या प्रस्तावाला अंतिम स्वरुप येणार आहे. वित्त विभागाचा हिरवा कंदील मिळाल्याशिवाय ही योजना राबविणे शक्य नाही हे माहीत असूनही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. त्यामुळे राज्यभरात संभ्रम निर्माण झाला.
फडणवीस यांनी विचारला जाब
राज्यात शिंदे सरकार आल्यापासून अनेक मंत्री घोषणा करत आहेत. यात शिंदे गट आघाडीवर आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी सन्मान योजनेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना जाब विचारला. फडणवीस यांच्या पवित्र्यामुळे सत्तार यांची कोंडी झाली. कोणत्या माहितीच्या आधारे या योजनेची माहिती माध्यमांना दिली असा प्रश्न फडणवीस यांनी केला. यावर, सत्तार यांनी या योजनेवर विचार सुरू असल्याचे आपण सांगितच्याचा खुलासा केला. मात्र त्यावर फडणवीस यांचे समाधान झाले नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.