
जळगाव : राज्यात पुन्हा जलयुक्त शिवार अभियानाचा (Jalyukt Shiwar Abhiyan) दुसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना अद्याप कृषी विभागाला (Agriculture Department) मिळालेल्या नाहीत.
जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातून कामे झालेली गावे, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, आदर्श गाव, इतर पाणलोट क्षेत्र विकास योजनेंतर्गत कामे पूर्ण झालेल्या गावांना वगळण्यात येणार आहे. अवर्षणग्रस्त गावांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
यामुळे पहिल्या टप्प्यातील गावांची यादी, वरील विविध योजनांमध्ये असलेल्या गावांची यादी तयार करण्यासाठी वेळ लागेल. ती यादी अंतिम झाल्यानंतरच जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीने दुसऱ्या टप्प्यातील गावांची यादी अंतिम करण्यात येणार आहे. यामुळे किमान महिनाभराचा कालावधी कामाच्या प्रारूप आराखड्यासाठी लागणार आहे.
निकृष्ट कामे, कामाअधीच पेमेंट
दुसरीकडे मात्र या योजनेच्या अनेक गावांच्या ठिकाणी केलेली कामे निकृष्ट दर्जाची होती. त्यांची चौकशी होऊन त्यातून त्या बाबी पुढे आल्या होत्या. यामुळे एका कंत्राटदाराला काळ्या यादीतही टाकण्यात आले आहे. अनेक ठिकाणी कामे सुरू होण्यापूर्वीच संबंधित ठेकेदाराचे पेमेंट काढण्यात आले होते. याच्या चौकशा लागल्या होत्या. यामुळे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीने ही योजना बंद केली होती. आता ती पुन्हा सुरू होणार आहे. ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी शासनाने नियमावली करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांना वाटते.
अनेक गावे पाणीदार
जलयुक्त शिवार अभियानामुळे अनेक गावे ‘पाणीदार’ झाली होती. ऐन उन्हाळ्यात त्या गावात या योजनेच्या पाण्यावर शेती केली जात होती. शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना या योजनेचा मोठा दिलासा मिळाला होता.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.