
Buldana News : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आज (ता.३ सप्टेंबर) येथे होत असून या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी सुमारे १७ कोटी रुपयांची मदत वितरीत केली जाईल. यात पोकरा योजनेच्या लाभार्थ्यांना पाच कोटी ४१ लाख २७ हजारांचे वितरण होत आहे.
आजवर तीन ते चार वेळा पुढे ढकललेला हा कार्यक्रम रविवारी (ता. ३ सप्टेंबर) होऊ घातला आहे. कार्यक्रमात कृषी विभागातर्फे अपघातग्रस्त पाच शेतकऱ्यांच्या वारसांना दहा लाख रुपयांचा विमा संरक्षण निधी देण्यात येणार आहे. कृषी यांत्रिकीकरणात १९५ लाभार्थ्यांना एक कोटी २८ लाख ४७ हजार रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील एक हजार १९२ लाभार्थ्यांना पाच कोटी ४१ लाख २७ हजार रुपये देण्यात येतील. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत तीन हजार १३४ लाभार्थ्यांना तीन कोटी २४ लाख रुपयांचे वाटप करण्यात येतील. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) अंतर्गत एक कोटी ६४ लाख ७८ हजार रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे.
तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास योजना, ड्रोन, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन वैयक्तिक शेततळे योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. महसूल विभागातील नैसर्गिक आपत्ती पीक नुकसानीसाठी ७१ हजार ५४५ लाभार्थ्यांना मदत देण्यात येणार आहे.
यात डिसेंबर २०२१ मध्ये अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या खामगाव तालुक्यातील उर्वरित २२४ लाभार्थी, ऑक्टोबर २०२१ मधील मेहकर तालुक्यातील सात हजार ६४१लाभार्थी, जून ते ऑक्टोबर २०२२ मध्ये पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ६६हजार ९३१ लाभार्थ्यांच्या खात्यात लाभ जमा करण्यात आला आहे.
तसेच येत्या काळात ६२ हजार ८५४ लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. तसेच एप्रिल २०२३ मध्ये अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान झालेल्या ८२६ लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात येणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.