Organic Fertilizer : सेंद्रिय खतांना प्रोत्साहनाचे स्वागत, पण...

सेंद्रिय खतांना प्रोत्साहनाचे स्वागत करायला पाहिजेत. परंतु ही खते रासायनिक खते निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी पुरवायचा अट्टहास कशासाठी?
Organic Fertilizer
Organic FertilizerAgrowon

कोणत्याही मातीत (Soil) कोणतेही पीक येते, हा समजच मुळात चुकीचा आहे. खरे तर माती परीक्षण (Soil Test) करून मगदुराप्रमाणे पिकांची निवड केली पाहिजेत. शिवाय माती परीक्षण अहवालानुसार खतांच्या (Fertilizer) सर्व प्रकारांचा संतुलित वापर झाला पाहिजेत. परंतु आपल्याकडे दुर्दैवाने असे होत नाही. पिकांची निवड करून त्यात शिफारशीत मात्रेत नाहीतर ठरावीक मात्रेत बहुतांश शेतकरी केवळ रासायनिक खतांचा वापर करतात. पिकांसाठी पाण्याचा वापरही अनियंत्रित केला जातो. त्यामुळे माती-पाणी प्रदूषण वाढतेय. जमिनीची सुपीकताही धोक्यात येत आहे. दिवसेंदिवस सेंद्रिय खतांची उपलब्धता घटत आहे. त्यामुळे देखील वापर कमी होत चालला आहे. मातीचे आरोग्य बिघडण्याचे हेही एक कारण आहे.

जमीन सुपीकतेच्या समस्येवरील उपायांचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय, जैविक खते पुरवायला हवी, असे बंधन केंद्र सरकारने रासायनिक खते निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर टाकले आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाला प्रोत्साहनाकरिता असे पाऊल उचलले असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात येते. आज आपण पाहतोय एकतर रासायनिक शेती नाहीतर सेंद्रिय-नैसर्गिक शेती यावरच बोलले जाते. परंतु उत्पादकतेत सातत्य आणि जमिनीचा पोतही चांगला ठेवणाऱ्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत फारसे कोणी बोलत नाही. अशावेळी सेंद्रिय खतांना प्रोत्साहनाचे स्वागत करायला पाहिजेत. परंतु ही खते रासायनिक खते निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी पुरवायचा अट्टहास कशासाठी?

Organic Fertilizer
सेंद्रीय अन्न निर्यात पालटेल भारतीय अर्थव्यवस्थेचं रुपडं

सेंद्रिय, जैविक, रासायनिक आणि हिरवळीच्या खतांचा पीक उत्पादन वाढीसाठी संतुलित वापर करणे म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होय. सेंद्रिय खतांमध्ये प्रामुख्याने शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, फॉस्फो कंपोस्ट, पेंडी खत, पीक-प्राण्यांच्या अवशेषापासूनचे खत यांचा समावेश होतो. तर जैविक खतांमध्ये रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, फॉस्फोबॅक्टर, ॲझोस्पिरीलम आदींचा समावेश होतो. सध्या काही शेतकरी तसेच कंपन्या सेंद्रिय खते तयार करतात. या खतांच्या दर्जावर कोणाचेही नियंत्रण दिसत नाही. त्यामुळे सेंद्रिय खतांच्या नावाखाली काही कंपन्या माती-वाळू विकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा तर खर्च होतोय, परंतु या खतांच्या वापराचे अपेक्षित परिणाम शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाहीत.

Organic Fertilizer
'अमूल' आता सेंद्रीय उत्पादने विकणार
Organic Fertilizer
गुजरातमध्ये विद्यार्थी गिरवणार सेंद्रीय शेतीचे धडे

सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचे प्रमाण, अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. मातीची घडण चांगली होते. जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म चांगले राहिल्याने जमिनीची सुपीकता आणि उत्पादनक्षमता चांगली राहते. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर हा वाढायलाच हवा. परंतु अशा प्रकारची खते निर्मितीसाठी कंपन्यांना नाहीतर शेतकरी, शेतकऱ्यांचे गट, उत्पादक कंपन्या यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. रासायनिक खते कंपन्यांना अशी खते तयार करायला लावून ती शेतकऱ्यांनी विकत घेऊन वापरायची म्हणजे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे. सेंद्रिय खते निर्माण करण्यासाठी लागणारा बहुतांश कच्चा माल हा शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतो. त्यामुळे ही खते नेमकी कशी तयार करायची याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन वाढवून, प्रात्यक्षिके-प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवून, शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करून गावपातळीवरच मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जाऊ शकतात.

असे केल्याने शेतकरी आपल्या शेतात सेंद्रिय खतांचा वापर करण्याबरोबर काही खते गावपातळीवरच विकून चार पैसे कमावू शकतात. जैविक खते प्रामुख्याने प्रयोगशाळेत तयार केली जातात. जैविक खते कमी प्रमाणात लागत असल्याने कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन संस्था यांनी तयार करून ती शेतकऱ्यांना पुरवायला हवीत. शिवाय गावातील काही सुशिक्षित तरुण प्रशिक्षण घेऊन जैविक खते तयार करून विकू शकतात. यातून अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात. शेतीसंबंधी कोणताही निर्णय घेताना केंद्र सरकारने कंपन्यांचा नाही तर शेतकऱ्यांचा गावातील तरुणांचा विचार आधी केला पाहिजेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com