
महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात शेती विषयाचा समावेश करावा, या मागणीचं घोंगडं गेले अनेक वर्षे भिजत पडलं आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक समिती नेमली होती. शेती विषयचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी एकमुखी शिफारस या समितीने केली होती. परंतु या विषयावर अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रात या विषयाबद्दल प्रचंड अनास्था असताना तिकडे गुजरातमध्ये मात्र शालेय अभ्यासक्रमात नैसर्गिक शेतीचा समावेश करण्याचा निर्णय झाला आहे.
रासायनिक खते-किडनाशकांच्या अतिरेकीत वापरामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर नैसर्गिक, सेंद्रिय शेतीचा पुरस्कार केला जात आहे. त्याचाच कित्ता अनेक राज्यांनी गिरवला आहे. गुजरात सरकारने रसायनमुक्त शेतीच्या प्रसारासाठी औपचारिक शिक्षणाचे माध्यम वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीबद्दल जनजागृती करण्यासाठी गुजरात सरकारने या विषयाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.
इयत्ता नववी ते बारावी या वर्गांच्या अभ्यासक्रमात सेंद्रिय शेतीवर एक स्वतंत्र प्रकरण समाविष्ट करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने त्यासाठी नैसर्गिक शेती या विषयातील अभ्यासकांशी बोलणी सुरु केली आहेत. नैसर्गिक शेती आणि तिचे फायदे यांचे महत्व विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही समजावे, या उद्देशाने असा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
२०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता नववीच्या पाठयपुस्तकात 'भारतीय शेतीचा इतिहास आणि नैसर्गिक शेतीची ओळख' हे प्रकरण समाविष्ट करण्यात येणार आहे. इयत्ता दहावी, अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमातही नैसर्गिक शेतीबद्दलची प्रकरणे समाविष्ट करण्यात येणार आहेत.
नववीच्या क्रमिक पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेल्या प्रकरणात प्राचीन भारतीय शेतीबद्दल, हरितक्रांती आणि तिचे फायदे याबाबत माहिती देण्यात आली आहे. नैसर्गिक शेती म्हणजे काय? नैसर्गिक शेती हा शेतीतला उत्कृष्ट पर्याय कसा काय होऊ शकतो? यावरही प्रकरणात चर्चा करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना नैसर्गिक, सेंद्रिय शेतीबद्दलची पायाभूत माहिती देण्यात आली आहे.
रसायनमुक्त शेतीचा सक्षम पर्याय म्हणून गुजरात सरकार नैसर्गिक, सेंद्रिय शेतीचा प्रसार करत आहे. औपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना नैसर्गिक शेतीची माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे शिक्षण मंत्री जितू वाघानी यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात रसायनमुक्त शेतीची माहिती आणि सेंद्रिय शेतीची माहिती समाजात पोहचवली जाईल, असा विश्वास वाघानी यांनी व्यक्त केला.
दरम्यान केंद्र सरकारच्या आवाहनानंतर गुजरात सरकारने नैसर्गिक शेतीच्या प्रचार आणि प्रचारासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या गुजरात दौऱ्यात शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती पद्धतीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले होते. दुग्ध विकास क्षेत्रातील प्रसिद्ध सहकारी संस्था असलेल्या 'अमूल'ने सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीच्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अमूलने नुकतेच सेंद्रिय गव्हाचे पीठ बाजारात आणले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.