Ashadhi Wari 2024 : वारीची वाटुली सोपी होय

Pandharpur Wari : वारी ही वारकऱ्यांची तपश्चर्या आहे, भक्तीचा महासागर आहे. वारी समानता, एकतेचे तत्त्व शिकविते.
Ashadhi Wari
Ashadhi WariAgrowon

Ashadhi Ekadashi 2024 : वैष्णवांना ओढ पांडुरंग दर्शनाची पंढरपुराकडे पाऊले पडतात भक्तांची संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दोन दिवसांच्या पुण्यनगरीतील मुक्कामानंतर आज पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. आषाढी वारी ही महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती आहे, तर विठ्ठल हे आराध्य दैवत!

वारीत मोठ्या संख्येने राज्यभरातून शेतकरी सहभागी होत असतात. यावर्षी जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती. परंतु देहू आणि आळंदी येथून पालख्यांचे प्रस्थान होताच वरुणराजाने देखील दमदार हजेरी लावल्याने वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. वर्षानुवर्षे वृद्धिंगत होणाऱ्या वारीला आता भक्तिमय महासोहळ्याचे स्वरूप आले आहे.

नाही कष्ट, काटे पंढरीच्या वाटे, माउलीच्या हाती सोपविता

बोट धरुनिया चालवे माउली, वारीची वाटुली सोपी होय

Ashadhi Wari
Ashadhi Wari 2024 : संत तुकोबा आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालखींचा पुणे शहरात प्रवेश; वाहतुकीत मोठे बदल

वारकरी देहभान विसरून ‘ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम’ असा जयघोष करीत चालतात. वारीमध्ये कुठेही श्रेष्ठ-कनिष्ठ, जात-पात-धर्म असा भेद नसतो. स्त्री-पुरुष भेदही वारकरी विसरून जातात. वारी ही वारकऱ्यांची तपश्चर्या आहे, भक्तीचा महासागर आहे. वारी कायम समानता, एकतेचे तत्त्व शिकविते. त्यामुळेच वारकऱ्यांच्या विचाराचे अनुकरण सर्व समाजाने करायला हवे. वारकऱ्यांची शिस्त समाजातील सर्व घटकांनी शिकली पाहिजे. एवढे केले तरी आपल्या दैनंदिन जीवनातल्या अनेक समस्या कमी होतील.

पंढरपूरची वारी महाराष्ट्राची आध्यात्मिक, सांस्कृतिक, गौरवशाली परंपरा असल्याने वारीच्या जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने केली, त्याचे स्वागतच करायला पाहिजे. मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपयांचे अर्थसाह्य जाहीर केल्याने मात्र राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे.

वारकरी हा काही मागायला वारीत येत नाही, तर त्यांना केवळ विठू माउलीच्या दर्शनाची ओढ असते. सरकारच्या अर्थसाह्याने त्यांच्या या निःस्वार्थी भक्तीला एकप्रकारे ठोस पोहोचली, असे काही वारकऱ्यांना वाटत आहे. वारीतल्या ज्या सात मुख्य मानाच्या पालख्या आहेत, त्यांच्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणांसाठी २५ एकर तर दुपारच्या थांब्यासाठी पाच एकर जागा त्यांना हव्या आहेत.

Ashadhi Wari
Ashadhi Wari 2024 : इंद्रायणी नदी प्रदुषणमुक्त करण्याचे सरकारचे धोरण; मुख्यमंत्री शिंदे 

हा प्रस्ताव शासन दरबारी मागील १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांची एक-दोन वर्षांनी बदली होत असल्याने ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, असे दिसून आले आहे. या जागा त्यांना कायमस्वरूपी पण नको आहेत. केवळ वारी पालखीपुरत्या ते ह्या जागा वापरतील, इतर वेळी वर्षभर गावकऱ्यांनाच त्या जागा वापरता येतील, अशी स्थळे त्यांना हवी आहेत.

रास्त अशा या मागणीचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. राज्यात ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथाप्रमाणे अन्य संतांनी लिहिलेले साहित्य, अभंग आहेत. हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. यांचे पुनर्रप्रकाशन, संवर्धन आणि ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद शासनाने करायला हवी. जेणेकरून अनुदानावर सवलतीच्या दरात हे संतसाहित्य सर्वसामान्यांना उपलब्ध होईल.

वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी चालत असतात. अलीकडे वारीदरम्यान अपघाताच्या काही घटना घडत आहेत. अशावेळी वारी मार्गाबरोबरच ठिकठिकाणी वाहनांसाठी काढण्यात आलेले बायपास रस्ते देखील विकसित झाले पाहिजेत. तसेच कोणाच्याही निष्काळजीपणाने वारीत अपघातासारख्या घटना घडू नयेत, ही दक्षता सर्वांनी घ्यायला हवी. वारी काळात स्वच्छतेची खबरदारी घेतली जातेच.

परंतु ही यंत्रणा अजून सक्षम करायला हवी. यावर्षी निर्मल वारी अंतर्गत निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे. अशावेळी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे आहेत का, ते वापरण्याजोगे आहेत का, हे स्थानिक प्रशासनाने पाहायला हवे. वारीत कायिक, वाचिक आणि मानसिक या तीनही प्रकारच्या सेवा साध्य होत असताना शासन-प्रशासनाने देखील सुरक्षितता, स्वच्छता, आरोग्याच्या दृष्टीने परिपूर्ण सेवा वारकऱ्यांना मिळतील हे पाहावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com