
Vamnicom vs Irma: सुमारे वर्षभरापूर्वी देशात पहिले सहकार विद्यापीठ स्थापन करण्याचे स्पष्ट संकेत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी ‘व्हॅम्निकॉम’मध्ये (वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था) दिले होते. एवढेच नव्हे तर याच संस्थेला सहकार विद्यापीठाचा दर्जा दिला जाणार असल्याचे त्यानंतरच्या एका बैठकीत त्यांनी घोषितही केले होते. त्यामुळे व्हॅम्निकॉमला सहकार विद्यापीठाचे डोहाळे लागणे साहजिकच आहे. असे असताना गुजरातच्या ‘इर्मा’ला (राष्ट्रीय ग्रामीण संस्था) अचानकच त्रिभुवन सहकार विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे.
या निर्णयाने राज्यातील सहकार लॉबीचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळेच उद्योगापाठोपाठ आता संस्थाही गुजरातमध्ये पळविल्या जात असल्याचा आरोप केंद्र सरकारवर होत आहे. विद्यापीठासाठी आवश्यक तेवढी जागा व्हॅम्निकॉमकडे नसल्याचे वरवर सांगितले जात असले तरी आनंद गुजरातमधील सहकार लॉबीचा रेटा आणि त्यास अमित शहा यांचे झुकते माप यामुळेच इर्माला त्रिभुवन सहकार विद्यापीठाचा दर्जा मिळाला, अशीच चर्चा सर्वत्र आहे.
इर्माला विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर व्हॅम्निकॉम आणि इर्माची तुलना सुरू आहे, हे योग्य नसून या दोन्ही संस्था चांगल्या आहेत. थोर अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ यांच्या प्रयत्नातून व्हॅम्निकॉम, तर ‘अमूल’चे संस्थापक त्रिभुवनदास पटेल आणि व्हर्गिस कुरियन यांच्या पुढाकारातून इर्माची स्थापना झाली आहे.
देशात सहकारी संस्थांचे जाळे उभे करण्यापासून त्यांचे बळकटीकरण ते नव्या राष्ट्रीय सहकार धोरण निर्मितीत व्हॅम्निकॉमची महत्त्वाची भूमिका राहिली आहे, तर इर्मा संस्थेचे ग्रामीण सहकार विकास आणि व्यवस्थापनात मोलाचे योगदान आहे. अशावेळी देशात सहकार क्षेत्राची आणि विद्यापीठांच्या एकंदरीत कामकाजाची व्याप्ती पाहता या दोन्ही संस्थांना सहकार विद्यापीठाचा दर्जा द्यायला हवा होता.
सहकार क्षेत्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्र तसेच गुजरातमध्ये फुलले असले तरी ते कमी-अधिक प्रमाणात सर्वच राज्यांत आहे. सहकार विद्यापीठ देशभरातील सहकारी संस्थांना तांत्रिक तसेच व्यवस्थापनाचे धडे देणार आहे. सहकारात संशोधन, विकास आणि संस्थात्मक जाळे उभे करण्यासाठी देखील हे विद्यापीठ काम करणार आहे. या विद्यापीठाने पहिल्याच वर्षी सहकारी क्षेत्रातील आठ लाख लोकांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. देशातील लघू-मध्यम उद्योगांना सहकार क्षेत्राच्या माध्यमातून बळकट करणे आणि त्याद्वारे रोजगार निर्मिती हा या प्रशिक्षणाचा हेतू आहे.
या विद्यापीठात सहकार क्षेत्रासंबंधी पदविका, पदवी, पदव्युत्तर-डॉक्टरेटपर्यंत शिक्षणाची सोय असणार आहे. या विद्यापीठांतर्गत देशभरातील सर्वच जिल्ह्यांत सहकार महाविद्यालये उघडण्याचेही नियोजित आहे. सहकारी सोसायटी कायद्यांतर्गत सर्व सहकारी संस्थांची नोंदणी ते लेखापरीक्षण करण्यापर्यंतची सुविधाही सहकार विद्यापीठात असणार आहे. अशावेळी एका सहकारी विद्यापीठावर कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे.
इर्मामध्ये सुद्धा जागेपासून ते मनुष्यबळ तसेच इतर संसाधनावर ताण वाढेल. त्यातून हे विद्यापीठ प्रभावी काम करू शकणार नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन त्रिभुवन सहकार विद्यापीठाच्या जोडीला व्हॅम्निकॉमही असायला हवे, असे मत सहकार क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. व्हॅम्निकॉम ही संस्था मागील अनेक वर्षांपासून एका विद्यापीठाप्रमाणे काम करीत असून विद्यापीठासाठीची आवश्यक पार्श्वभूमीदेखील या संस्थेकडे आहे. राज्य सरकार तसेच सहकार क्षेत्राने याच दिशेने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करायला हवा.
इर्माबरोबर व्हॅम्निकॉमलाही सहकार विद्यापीठाचा दर्जा दिल्यास विभागनिहाय आणि कामकाजनिहाय पण विभागणी करता येऊ शकते. मागील अनेक वर्षांपासून देशभर सहकार क्षेत्राला मरगळ आलेली आहे. सहकारने ज्या ग्रामीण भागाला समृद्ध केले तेथेच ही मरगळ अधिक आहे. सहकार विद्यापीठाच्या माध्यमातून सहकारी संस्थांचा विकास आणि त्यातून समृद्धीचे स्वप्न आपण पाहत आहोत. हे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर सहकार विद्यापीठ पूर्णपणे स्वायत्त असायला हवे, त्यात सरकारचा हस्तक्षेप नको
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.