Kesar Mango Market : ‘केसर क्रांती’चा समुद्रमार्ग

Kesar Mango Production : राज्यात केसर आंब्याचे क्षेत्र तसेच घन, अतिघन लागवड पद्धतीने उत्पादन वाढत असताना देश-विदेशातील नवनव्या बाजारपेठा शोधाव्याच लागणार आहेत.
Kesar Mango
Kesar MangoAgrowon

Management of Mango Export : आज दोन वर्षांपूर्वी (२०२२ मध्ये) भारतातून पहिल्यांदा समुद्रमार्गे आंब्याची निर्यात अमेरिकेला झाली होती. बीएआरसी (भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर), पणन मंडळ, अपेडा, आंबा उत्पादक तसेच खासगी निर्यातदार यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले होते. त्यावेळी आंबा निर्यातीमधील ही ऐतिहासिक कामगिरी असून हा बदल क्रांतिकारक ठरणारा आहे, असा विश्वास ॲग्रोवनने व्यक्त केला होता.

तो आता सार्थ ठरताना दिसतो. कारण समुद्रमार्गे अमेरिकेपाठोपाठ आता जपानला केसर आंब्याची निर्यात नुकतीच करण्यात आली आहे. या पूर्वी १९९७-९८ ला देखील समुद्रमार्गे लंडन तसेच अमेरिकेला आंबा निर्यातीचे प्रयोग करण्यात आले होते. परंतु नंतर त्यात आपल्याला सातत्य ठेवता आले नाही. संपूर्ण जगच आता आरोग्याच्याबाबतीत जागरूक झाले आहे.

त्यामुळे बहुतांश देशांचे निर्यातीचे मापदंड किचकट झाले आहेत. जपान ही फळे-भाजीपाल्यासाठी त्यातल्या त्यात अतिसंवेदनशील बाजारपेठ मानली जाते. या देशाचे निर्यातीचे मापदंड तर अजूनच क्लिष्ट आहेत. परंतु या सर्वांची पूर्तता करीत साडे सात टन केसर आंबा जपानला समुद्रमार्गे पाठविण्यात उत्पादक शेतकरी, पणन मंडळासह निर्यातीसंबंधातील इतर घटकांना यश आले आहे.

समुद्रमार्गे होत असलेली निर्यात ही स्वस्त पडत असली तरी याला खूप वेळ लागतो. या दरम्यान आंबा टिकवायचा कसा, हा खरा पेच सर्वांसमोर होता. परंतु काढणीनंतरच्या विविध प्रक्रियांद्वारे केसर आंब्याची टिकवण क्षमता ४५ दिवस वाढविण्यात यश आल्याने समुद्रमार्गे निर्यातीचा मार्ग सुकर झाला आहे. हवाईमार्गाच्या तुलनेत समुद्रमार्गे आंबा निर्यातीला निम्म्याहून कमी खर्च येतो. त्यामुळे उत्पादक, निर्यातदार आणि ग्राहक अशा सर्वांना ही निर्यात किफायतशीर ठरते.

Kesar Mango
Kesar Mango Farming : संघर्षातून कुटुंबाने साधली उन्नती

हापूसबरोबर देश-विदेशातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला आंबा म्हणजे केसर. केसरच्या गोडव्याने लहान मुलांपासून ते वयोवृद्धांना भुरळ घातली आहे. सर्वसाधारणपणे हापूसनंतर केसर बाजारात दाखल होत असल्याने याला दरही चांगला मिळतोय. परंतु बदलत्या हवामानाचा फटका केसरलाही बसत आहे.

मागील पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अशा तिन्ही हंगामातील प्रतिकूल परिस्थितीचा विपरीत परिणाम केसर आंब्यावर झाला. केसरला ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत मोहोर येत राहिला. त्यामुळे हंगामाची सुरुवात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून झाली ती आता शेवटपर्यंत संथगतीने सुरूच आहे.

Kesar Mango
Kesar Mango Export : समुद्रमार्गे जपानला केसर आंबा निर्यात

चालू हंगामात केसर आंब्याचे उत्पादन सरासरी १० टक्क्यांनी घटले आहे. दर मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगले मिळताहेत. राज्यात एकीकडे केसर आंब्याचे क्षेत्र वाढत आहे. घन, सघन पद्धतीने लागवड आणि बागेचे काटेकोर व्यवस्थापन याद्वारे केसरचे उत्पादन वाढत आहे. अशावेळी देशांतर्गत तसेच विदेशातील नवनव्या बाजारपेठा आपल्याला शोधाव्याच लागणार आहेत. तसे पाहिले तर निर्यातीच्या बाबतीत आत्तापर्यंत केसर थोडा दुर्लक्षितच म्हणावा लागेल.

परंतु आता जगभरातून केसरला मागणी होत असताना निर्यातवृद्धीसाठी आणि त्यात सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न वाढवावेच लागणार आहेत. त्यात आता समुद्रमार्गे निर्यातीचा पर्याय पुढे आल्याने अमेरिका, जपानसह इतर कोणकोणत्या देशांत आपण केसर आंबा पाठवू शकतो, हे पणन तसेच विदेश व्यापार-वाणिज्य मंत्रालयाने पाहावे.

अपेडाने आंबा निर्यात होऊ शकणाऱ्या देशांच्या बदलत्या मापदंडाबाबत उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन वाढवायला पाहिजेत. कृषी-फलोत्पादन विभागाने विविध देशांच्या मापदंडाप्रमाणे निर्यातक्षम केसर आंब्याचे उत्पादन कसे घ्यायचे, आंबा रसायन तसेच कीड-रोगअंशमुक्त कसा राहील, याबाबत उत्पादकांना मार्गदर्शन करायला हवे.

वैयक्तिक आंबा उत्पादक तसेच शेतकऱ्यांच्या कंपन्या यांनी मध्यस्थांशिवाय स्वतः थेट आंबा निर्यात केली तर त्यांना ती अधिक किफायतशीर ठरणार आहे. त्यामुळे यासाठी उत्पादकांसह त्यांच्या कंपन्यांनी प्रयत्न वाढवायला हवेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com