Amul Dairy Industry: ‘अमूल’चा आदर्श

Amul Milk Success: अधिक दूध उत्पादकतेबरोबर संकलन, प्रक्रिया ते ग्राहकांपर्यंत दूध पोहोचेपर्यंत स्वच्छ, पारदर्शक आणि निर्भेळ कारभाराचा ‘अमूल’चा आदर्श महाराष्ट्रासह इतर राज्यांनी घेतला तरच श्‍वेतक्रांती २.० यशस्वी होईल.
Amul Dairy Success
Amul Dairy SuccessAgrowon
Published on
Updated on

White Revolution: जगात सर्वाधिक दूध उत्पादन भारतात घेतले जाते. जागतिक दूध उत्पादनात आपला वाटा तब्बल २५ टक्के असून, २०३३ पर्यंत तो ३० टक्क्यांवर पोहोचणार आहे. श्‍वेतक्रांतीने आपले दूध उत्पादन वाढले. परंतु आता श्‍वेतक्रांती २.० ला पुढे नेण्याची गरज ‘गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ’चे (अमूल) व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी व्यक्त केले आहे.

अमूलच्या सहकारचे मॉडेल आदर्शवत असे आहे. अमेरिका चीनसह जगभरातील सुमारे ६० राष्ट्रांना ‘अमूल’ची उत्पादने निर्यात होतात. जागतिकीकरण, खासगीकरण या काळात अनेक जणांनी धसका घेतला असताना अमूल उत्पादनांच्या विक्रीचा आलेख मात्र दरवर्षी चढताच आहे.

दूध, दह्यापासून चॉकलेट, आइस्क्रीम आणि आता मिठाईपर्यंत डझनाहून अधिक प्रक्रियायुक्त पदार्थांत अमूलने गुणवत्तेच्या आधारे आपले स्थान टिकवून ठेवले आहे. संशोधन व अभ्यास, तंत्रज्ञानाचा अवलंब, उत्कृष्ट विस्तार शिक्षण, पारदर्शक सहकार आणि उत्तम व्यवस्थापन या पंचसूत्रीवर अमूल प्रगतीच्या शिखरावर जाऊन पोहोचला आहे.

Amul Dairy Success
Dairy Revolution : शेतकऱ्यांनी बनासकंठाच्या वाळवंटात घडवली ‘दूधक्रांती’

गुजरातमध्ये १८ हजारांवर सोसायट्यांत दूध उत्पादन होऊन त्यावर प्रक्रिया व विक्रीचे कार्य अमूल करतो. अमूलच्या सोसायट्यांत लाखो शेतकरी दूध पोहोचवतात. दूध उत्पादकांच्या जनावरांची काळजी घेत त्यांचे दूध उत्पादन कसे वाढेल, हे अमूल पाहतो. तिथे दुधाचा एकच ब्रॅण्ड आहे.

शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकतेत वाढीबरोबर नफ्यातील वाटा दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम अमूल चोखपणे पार पाडतो. यामुळे दुधात भेसळही होत नाही. अमूल म्हणजे गुणवत्ता हा विश्‍वास निर्माण करून त्या विश्‍वासार्हतेला त्यांनी टिकवून ठेवले आहे. अमूलने आपल्या कारभारात राजकारण घुसू दिले नाही, त्यामुळे अमूलचे यश टिकून आहे.

Amul Dairy Success
Dairy Farming : जिरायती पट्ट्यात दुग्धव्यवसायातून समृद्धी

महाराष्ट्रात नेमकी याच्या उलट परिस्थिती पाहावयास मिळते. राज्यात दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांना आतबट्ट्याचा ठरत आहे. वाढता उत्पादन खर्च आणि दुधाला मिळणारा कमी दर हे त्याचे मुख्य कारण आहे. एकीकडे उत्पादकांना दुधाचे दर कमी तर ग्राहकांना मात्र अधिक दर मोजावे लागत आहेत. अनेकदा घोषणा करूनही दुधाचा एक ब्रॅण्ड आपल्याला करता आलेला नाही. खासगी दूध कंपन्या आणि सहकारी दूध संघ यांनी आपापले ४००च्या वर स्वतंत्र ब्रॅण्ड निर्माण करून ते वर्चस्वासाठी आपसांत भांडताहेत.

काही अपवादात्मक संघ सोडले, तर उर्वरित सर्वांना दूध उत्पादकांचे काही देणे-घेणे दिसत नाही. मध्यस्थांच्या साखळीमुळे दूध संघांकडून खरेदी ते ग्राहकांना विक्रीदरम्यान दुधाचे दर दुपटीने वाढत आहेत. दूध भेसळीलाही राज्यात ऊत आला आहे. आपण प्रामुख्याने दूध विक्रीवर अवलंबून राहिलो आणि उप-उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले नाही.

सहकारातून पैसा, प्रसिद्धी आणि पैसा प्रसिद्धीतून राजकारण हे बहुतांश दूध संघांचे समीकरणच बनले आहे. गैरकारभार आणि अत्यंत खराब व्यवस्थापनाने ‘महानंद’ दिवाळखोरीत गेले. राज्यातील या अनागोंदीमुळे अमूल आपले पाय महाराष्ट्रातही पसरत आहे. आधी धुळे, नंदुरबार या शेजारील जिल्ह्यांतून दूध संकलनानंतर गुजरातने आता महाराष्ट्रातील दूध उत्पादनात प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यांमध्ये संकलन केंद्रे उभारली आहेत.

त्यामुळे राज्यात अस्तित्वात असलेल्या दूध संस्था, संघांपुढे अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशावेळी दूध संकलन, प्रक्रिया ते ग्राहकांपर्यंत दूध पोहोचेपर्यंत स्वच्छ, पारदर्शक आणि निर्भेळ कारभाराचा अमूलचा आदर्श महाराष्ट्रासह इतर राज्यांनी घेतला तरच या देशात श्‍वेतक्रांती २.० यशस्वी होईल, अन्यथा नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com