Bird Flu : योग्य काळजी घ्या, चिंता करू नका

Poultry Disease : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार बर्ड फ्ल्यू रोगाच्या प्रसाराची सहा भागात विभागणी केली असून सद्यःस्थितीत मानवातील हा आजार तिसऱ्या श्रेणीत अस्तित्वात आहे. ज्यामध्ये कोंबड्यातून कमी प्रमाणात हा रोग मानवात संक्रमित होताना दिसत आहे.
Bird Flu
Bird Flu Agrowon
Published on
Updated on

Bird Flue Disease : मागील दोन दिवसांत देशातील सर्व माध्यमातून बर्ड फ्ल्युची लागण झालेल्या पश्चिम बंगालमधील चार वर्षांच्या मुलाची बातमी सगळीकडे मोठ्या प्रमाणात चर्चिली गेली. मुळातच बर्ड फ्ल्यू हा पक्षी, कोंबड्यातील घातक रोग आहे. त्याच्या नियंत्रणासाठी ज्या भागात लागण होते त्या भागातील एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या या नष्ट केल्या जातात.

कुक्कुट पक्षी, अंडी, पक्षीखाद्य हे सर्व नष्ट करण्याबरोबरच दहा किमी परिसरात कुक्कुटपालन व्यवसाय हा तीन महिन्यांपर्यंत करता येत नाही. अशा प्रकारचे निर्देश बर्ड फ्ल्यू रोगाच्या साथीमध्ये दिले जातात. त्यामुळे अशा नियंत्रण प्रक्रियेचा विचार केला आणि तो जर मानवात संक्रमित झाला तर एकंदरीतच मानवी आरोग्य धोक्यात येऊ शकते.

पश्चिम बंगालमधील एका चार वर्षांच्या मुलाला फेब्रुवारी २०२४ मध्ये बर्ड फ्ल्यू लागण झाली. तीन महिन्यांच्या उपचारानंतर तो बरा होऊन घरी गेल्याचे देखील बातमीत नमूद करण्यात आले आहे. याचा अर्थ तो उपचाराअंती बरा झालेला आहे हे निश्चित. जगात साधारण २००४-०५ पासून कोंबड्यांमधून एच५एन१ या पोट जातीच्या विषाणूमुळे मानवात इन्फ्लुएंजा रोगाची लागण होत असल्याचे आढळून आले आहे.

जवळपास १७ देशांतील ८३२ माणसांना या रोगाची लागण झाली होती. त्यांपैकी ५३ टक्के माणसं ही मृत्युमुखी पडली असे २५ जून २०२१ च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालात नमूद करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार या रोगाच्या प्रसाराची सहा भागात विभागणी केली असून सद्यःस्थितीत मानवातील हा आजार तिसऱ्या श्रेणीत अस्तित्वात आहे. ज्यामध्ये कोंबड्यातून कमी प्रमाणात हा रोग मानवात संक्रमित होताना दिसत आहे.

Bird Flu
Bird Flue : टेक्सासमध्ये जनावरे, मानवात ‘बर्ड फ्लू’

महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे १८ फेब्रुवारी २००६ रोजी भारतातील सर्वप्रथम बर्ड फ्ल्यू रोगाच्या प्रादुर्भावाची नोंद झाली. त्यानंतर २०२१ मध्ये राज्यातील २५ जिल्ह्यांत ६४ ठिकाणी पंधरा वर्षांनंतर बर्ड फ्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा आढळून आला. या रोगाचे निदान हे भोपाळ येथील उच्च सुरक्षा पशुरोग निदान प्रयोगशाळेत होते. रोग निदान झाल्यानंतर केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाला ते कळवले जाते.

मग राज्य शासनाला कळवून नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याबाबत आदेश दिले जातात. नवापूर येथे ज्यावेळी या रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यावेळी राज्यातील पशुसंवर्धन विभागाने शीघ्र कृतिदल स्थापून उपाययोजना केल्याने हा रोग पूर्णपणे आटोक्यात आणला होता. याची नोंद वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली होती. या रोगाच्या विषाणूचे एच चे १८ आणि एन चे ११ उपप्रकार आहेत.

Bird Flu
Bird Flu : भारतात ४ वर्षाच्या मुलाला बर्ड फ्लूची लागण; जागतिक आरोग्य संघटनेची पुष्टी

ते एकमेकांशी जुळवून घेऊन १९८ उपप्रकार होऊ शकतात. त्यापैकीच एच९एन२ या उपप्रकाराची लागण पश्चिम बंगालमधील मुलाला झाल्याचे आढळून येते. हे सर्व उपप्रकार कमी जास्त प्रमाणात मानवास अपाय करू शकतात.

मृत पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, रोग आलेल्या भागातील कुक्कुट पक्षी, अंडी, खाद्य व पक्षी खत याची इतरत्र वाहतूक न करणे, प्रक्षेत्रावर काम करणाऱ्या माणसाने इतर प्रक्षेत्रात न जाणे अशा प्रकारच्या उपायांनी या रोगाचा प्रसार रोखता येऊ शकतो.

माणसाने देखील नियमित सॅनिटायझर चा वापर करणे, साबणाने हात धुणे, परिसर स्वच्छता, चिकन व अंडी हाताळताना मास्कचा वापर, रबरी हातमोजांचा वापर, आजारी पक्ष्यांचा संपर्क टाळणे, तलावाजवळ स्थलांतरित पक्षी येत असतील व ते जर मृत्युमुखी पडलेले आढळले तर ते तात्काळ पशुसंवर्धन विभागाला कळवायला हवे. या सोबत स्वतःचेही आरोग्य आणि प्रतिकारशक्ती अबाधित ठेवली तर बर्ड प्ल्यू बाबत चिंता करण्याचे कारण नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com