सोयाबीन बाजारात मोठी तेजी येईल, अशी आस लावून बसलेले शेतकरी गोत्यात येण्याची शक्यता अधिक आहे.Soybean market analysis for farmers: दीर्घकाळ दबावात असलेला सोयाबीन बाजार सध्या काहीसा सावरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात लक्षणीय वाढ झाली. त्यास आवक, मागणी आणि धोरणात्मक घटक कारणीभूत आहेत. सोयाबीनच्या कमाल भावाने पाच हजारांचा टप्पा ओलांडला असला, तरी अजूनही किमान आधारभूत किमतीची, म्हणजे हमीभावाची पातळी गाठता आलेली नाही. .सोयाबीनचा हमीभाव प्रति क्विंटल ५३२८ रूपये आहे. यंदा पावसाची अनियमितता, अतिवृष्टी, पूरस्थिती याचा जबर फटका सोयाबीनला बसला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही पट्ट्यांमध्ये उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचे प्राथमिक अंदाज सांगतात. परिणामी, बाजारात आवक मर्यादित राहिली. देशपातळीवर विचार करता राजस्थानमध्ये उत्पादन कमी असल्यामुळे आवक कमीच राहिली..Soybean Market: सोयाबीन बाजारातील सारीपाट.परंतु सोयाबीन उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या मध्य प्रदेशात आवक सुरूवातीपासूनच चांगली राहिली. त्याचे कारण म्हणजे तिथे राज्य सरकारने राबविलेली भावांतर भुगतान योजना.या योजनेच्या माध्यमातून सोयाबीनचा बाजारभाव आणि हमीभाव यातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तिथे आवकेत सातत्य राहिले. महाराष्ट्रात सोयाबीनचे दर पडल्यामुळे हमीभावाने खरेदीची घोषणा करण्यात आली..परंतु प्रत्यक्षात खरेदी उशिरा आणि अनेक अडथळ्यांचा सामना करत रडत-खडत सुरू झाली. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात बाजारात आपला माल विकावा लागला. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत देशभरात सोयाबीनचा सरासरी दर प्रति क्विंटल ४,१९७ रुपये राहिला.याचा अर्थ हमीभावापेक्षा तब्बल २१ टक्के कमी दर मिळाला. विशेष म्हणजे सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वात कमी म्हणजे सरासरी ४,१८६ रुपये दर मिळाला..Soybean Market: सोयाबीनचे ७ कोटी ७१ लाख ७० हजार रुपयांचे चुकारे अदा .यंदा सोयाबीन उत्पादन कमी असूनही दर हंगामाच्या सुरुवातीपासूनच दबावात राहिले. त्याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात असलेली नरमाई. चीन हा अमेरिकेच्या सोयाबीनचा सर्वाधिक मोठा खरेदीदार देश.परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तिरक्या चालीमुळे चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध पेटले. चीनने अमेरिकेऐवजी ब्राझीलकडून सोयाबीन खरेदीला पसंती दिली..नंतरच्या काळात ब्राझीलने दराच्या मुद्यावरून ताणून धरल्यामुळे अर्जेन्टिनाने संधी साधली. या सगळ्यात अमेरिकेच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे जबर नुकसान झाले. अमेरिकेत सोयाबीन गडगडल्यामुळे साहजिकच जगभरात सोयाबीनच्या बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला. भारतातही त्याचे पडसाद उमटले. एकेकाळी दहा हजारांची मनसबदारी मिरवणारे सोयाबीन पाच हजाराचा तरी टप्पा गाठेल की नाही, अशी चिंताजनक स्थिती उत्पन्न झाली..या पार्श्वभूमीवर सध्या सोयाबीन वधारल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोयाीबन आगामी काळात जोरदार उसळी घेईल आणि बाजारात मोठी तेजी येईल, अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे सोयाबीन शिल्लक आहे, त्यातील अनेक शेतकरी भाव आणखी वाढेल, या आशेने माल विकणे लांबणीवर टाकत आहेत..परंतु एकूण मागणी-पुरवठ्याचे गणित, खाद्यतेल आयात, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार या सगळ्या मुलभूत घटकांचा विचार करता सोयाबीनमध्ये खूप मोठी तेजी येण्याची शक्यता नाही, असे अभ्यासकांचे मत आहे. खूप काळ सोयाबीन साठवून ठेवले तर वजनात घट येणार.त्यामुळे हमीभावाची बेंचमार्क पातळी लक्षात घेऊन सोयाबीन कधी विकायचे, याचा निर्णय घेणे योग्य ठरेल. अन्यथा, मोठ्या तेजीची आस धरून दीर्घकाळ माल साठवून ठेवला तर फसगत होण्याचीच शक्यता जास्त दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यावहारिक आणि सावध पवित्रा घ्यायला हवा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.