
Kharif Crop : सोयाबीन महाराष्ट्रातील खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. राज्यात जवळपास ४५ लाख हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी होते. मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. कमी कालावधीच्या सोयाबीन या पिकाकडे राज्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून पाहतात. सोयाबीनला आधी अतिवृष्टी तर आता पावसातील मोठ्या खंडाचा चांगलाच फटका बसला आहे. यातून सावरलेल्या सोयाबीनवर आता फुले, शेंगा लागताना, त्या परिपक्व होताना रोगांचा विळखा पडला आहे.
मराठवाड्यातील शेतकरी पिवळा मोझॅक, तर विदर्भातील शेतकरी सोयाबीनवरील मूळकुज या रोगाने त्रस्त आहेत. विदर्भात मूळकुज रोगाने दोन लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले, तर मराठवाड्यात येलो मोझॅकची लागण होऊन हा रोग झपाट्याने पसरतोय. आपल्या राज्यात मुळातच सोयाबीनची उत्पादकता कमी मिळते. त्यात या रोगांच्या प्रादुर्भावाने पीक व्यवस्थापन खर्च तर वाढेल, शिवाय उत्पादन कमी मिळून उत्पादकांना दुहेरी फटका बसणार आहे. मूळकुज हा बुरशीजन्य तर पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग आहे. या दोन्ही रोगांचा पिकावर प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रणात्मक उपाय फारसे प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळे रोगप्रतिबंधात्मक उपायांतून या दोन्ही रोगांना दूर ठेवणेच अधिक हितकारक ठरते. उत्तम पीक व्यवस्थापनातून या दोन्ही रोगांचा प्रादुर्भाव रोखता येतो. हवामानातील बदलही रोगांची लागण तसेच प्रसारास कारणीभूत असते. परंतु सोयाबीन असो की इतर कोणतेही पीक, बदलत्या हवामानासार त्यांच्या व्यवस्थापनाचे धडे शेतकऱ्यांना अजूनही मिळताना दिसत नाहीत. परिणामी, रोगांचा प्रादुर्भाव वाढून नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे.
पावासाच्या मोठ्या खंडाने जमिनीचे तापमान वाढत आहे. शिवाय पाण्याच्या ताणामुळे सोयाबीनला अन्नद्रव्ये घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे झाडांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे. अशी पिकांची अवस्था कीड-रोग बाधा होण्यास पोषक असते. त्यामुळे जमिनीतील बुरशी सक्रिय होऊन मूळकुज तर रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या सोयाबीनवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढून मोझॅक रोगाची लागण होत आहे. मागील अनेक वर्षांपासून मर-मूळकुज या रोगांचा सोयाबीनसह इतरही अनेक पिकांवर प्रादुर्भाव होतो. तर २०१५ च्या हंगामात ‘येलो मोझॅक’ने राज्यात थैमान घातल्यानंतर हा रोग कृषी विभागाच्या पटलावर आला आहे. मूळकुज असो की मोझॅक, या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यावर नियंत्रण करायचे म्हटले, तर बऱ्याचशा बाबी हातातून गेलेल्या असतात.
जमिनीची उत्तम मशागत, रोगप्रतिकारक जातींची निवड, बीजप्रक्रिया, पिकांची फेरपालट, आंतरपीक-मिश्रपीक पद्धतींचा अवलंब, सापळा पिकांचा वापर या पीक रोगमुक्त राहण्यासाठी पेरणीपूर्वी, तसेच पेरणी करतानाच्या उपाययोजना आहेत. परंतु किती शेतकरी समंजसपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने या उपायांचा अवलंब करतात, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. तर पिकांची पेरणी झाल्यावर वाढीच्या अवस्थेत योग्य खतमात्रा दिली, शेत तणमुक्त ठेवले, पाण्याचा ताण पडल्यास संरक्षित सिंचन केले तरी बऱ्याच कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. शिवाय मूळकुज असो की मोझॅक प्रादुर्भाव झाल्यावर नियंत्रणात्मक उपायांत योग्य कीडनाशकांची फवारणी किती जण करतात? हा प्रश्नही उपस्थित होतो. ही सर्व परिस्थिती पाहता कीड-रोग व्यवस्थापनातील बहुतांश सर्वच बाबींत शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रबोधनाची गरज आहे. प्रगत देशांत सोयाबीनसह इतरही पिकांत जनुकीय सुधारित, जनुक संपादन या तंत्राने अनेक घातक रोगांसह ताण सहनशील वाणांचा शोध लावण्यात आला आहे. शिवाय प्रभावी रोगनियंत्रणासाठी पण नॅनो तंत्रज्ञान, जैवधुरीचा वापर, रोगविरोधी सूक्ष्मजीवांचा वापर करण्यात येतो. आपल्याकडे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव बळावत असताना अशा उपायांचा वापर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.