Condition of Agriculture : या वर्षी जूनमध्ये पावसास उशिरा सुरुवात झाली, मध्ये दोन मोठे खंडही पडले. जुलै महिना लागताच राज्यभर दमदार पाऊस सुरू झाला. १५ ते २० जुलैदरम्यान कोकण, कोल्हापूर तसेच पूर्व विदर्भात मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली. ऑगस्टमध्ये पावसाची उघडझाप चालूच होती. पावसाच्या अशा असमान वितरणातही राज्यातील पीक परिस्थिती उत्तम होती.
परंतु ऑगस्टशेवटी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दोन दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. एक सप्टेंबरला सकाळी पाच ते सात आणि सायंकाळीही याचदरम्यान नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशीम या जिल्ह्यांतील काही मंडलांत जवळपास २०० मिलिमीटर अर्थात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला.
पावसाचा धुमाकूळ दुसऱ्या दिवशीही चालूच होता. त्यामुळे या भागांतील नदी-नाल्यांना पूर आला. या पुराचे पाणी शेतशिवारात घुसून मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कापसासह बहुतांश खरीप पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्या. सखल भागात पाणी साचून पिके पाण्याखाली बुडाली. घर-गोठे पडले. पशुधनही वाहून गेले. शेतकऱ्यांचे झालेले हे नुकसान मोठे आहे.
सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने खरिपातील पिकांचे नुकसान अजून वाढण्याचीच शक्यता आहे. शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा हंगाम उभा केला आहे. पीककर्जाचा आधार बहुतांश शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने त्यांनी उधारी-उसणवारी करून पेरणी केली. दामदुपटीने पैसे काढून आत्तापर्यंत पिके जोपासली आणि आता निसर्गाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याचे काम केले आहे.
मागील पाच वर्षांपासून खरिपात अतिवृष्टी, महापुराने पिकांचे नुकसान वाढले आहे. मॉन्सूनपश्चात पावसाचे प्रमाण वाढल्याने शाश्वत समजला जाणारा रब्बी हंगामही दरवर्षीच धोक्यात येतोय. तर उन्हाळ्यात मॉन्सूनपूर्व पावसाचे प्रमाण वाढल्याने उन्हाळी पिके शेतकऱ्यांच्या हाती लागताना दिसत नाहीत.
शिवाय जानेवारी ते एप्रिल-मेपर्यंत गारपिटीचा माराही होतोय. थंडीचा एकंदरीतच बदललेला काळ आणि उन्हाळ्यातील उष्ण लहरी या सर्वांच्या परिणामस्वरूप राज्यातील हंगामनिहाय बसलेले पीक पद्धतीचे चक्र विस्कळीत झालेले आहे. तिन्ही हंगामातील वाढत्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसानही वाढल्याने शेतकरी हतबल झालेले आहेत.
विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत रेड तसेच ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने वर्तविला असला तरी मंडलनिहाय ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज यावेळी देखील शेतकऱ्यांना मिळालेला नाही. नैसर्गिक आपत्ती वाढत असताना हवामान विभागाने गाव-मंडलनिहाय अधिक अचूक अंदाज वर्तविण्यावर भर द्यायला हवा.
कृषी, महसूल विभागांनी नुकसानग्रस्त भागाचे पाहणी-पंचनामे तत्काळ करावेत. शासनासह जिल्हा प्रशासनाने केवळ पाहणी-पंचनाम्याचे आदेश देऊन थांबू नये तर ते वेळेत होतील, ते पाहावे. राज्य शासनाने नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर आर्थिक मदत होईल, याची काळजी घेतली पाहिजे. नुकसानग्रस्त बहुतांश शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला आहे.
विमाधारक शेतकरी ठरावीक वेळेत नुकसानीची माहिती कृषी विभागासह विमा कंपनीला कळवतीलच. अशावेळी कृषी तसेच महसूल विभागाने सजग राहून सर्व नुकसानग्रस्तांना अग्रिम तसेच अंतिम भरपाई मिळेल, याची खबरदारी घेतली पाहिजे. राज्यभरातील अनेक विमाधारक शेतकरी मागील वर्षी झालेल्या नुकसानीच्या भरपाईपासून वंचित आहेत.
अशा सर्व शेतकऱ्यांची कृषी विभाग तसेच विमा कंपन्यांकडे नोंद असताना त्यांना मागील वर्षीच्या विमा पावतीसह इतरही कागदपत्रे मागून हैराण केले जात आहे. मागील वर्षीचे विमाधारक अन् नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई मिळायला हवी. असे झाल्यास नैसर्गिक आपत्तीत अल्पसा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.