Cotton Bollworm : ‘गुलाबी’ ग्रहण

Cotton Production Decrease : पांढऱ्या सोन्याला लागलेले ‘गुलाबी’ ग्रहण दूर करायचे असेल, तर संशोधनापासून ते कीड व्यवस्थापनापर्यंत व्यापक बदल करावा लागणार आहे.
Cotton Disease
Cotton DiseaseAgrowon
Published on
Updated on

Cotton Crop Disease : कापूस हे पीक उत्पादकांमध्ये पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु या पांढऱ्या सोन्याला ‘गुलाबी ग्रहण’ मागील अनेक वर्षांपासून लागलेले दिसते. गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावासह अन्य काही कारणांनी या वर्षी देशात कापसाचे उत्पादन १५० लाख गाठींनी कमी होईल, असे मत यातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

देशातील कापूस लागवडीनुसार ४५० लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित असताना या वर्षी ते ३०० लाख गाठींच्या आसपास असण्याची शक्यता आहे. अर्थात, गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने उत्पादनात होणाऱ्या या मोठ्या घटीने कुणाला आश्‍चर्याचा धक्का वगैरे बसण्याचे कारण नाही. कारण २०१३-१४ मध्ये देशात (गुजरातमध्ये) पहिल्यांदा गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता.

त्यानंतर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणासह देशभर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. ‘सीआयसीआर’चे माजी संचालक डॉ. केशव क्रांती यांनी २०१७ पूर्वीच देशभरातील बीटी कापसाचा अभ्यास करून केंद्र शासनाला एक अहवाल सादर केला होता. त्यात त्यांनी अनेक कापूस उत्पादक राज्यांमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे सप्रमाण दाखवून दिले होते.

२०१७ मध्ये गुलाबी बोंड अळीने देशाचे कापूस उत्पादन १०० लाख गाठींनी घटेल, असे मत उद्योग क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले होते अन् घडलेही तसेच. या सर्व इशाऱ्यांकडे शास्त्रज्ञ तसेच केंद्र-राज्य सरकार आत्तापर्यंत सोईस्कररीत्या दुर्लक्ष करीत आले आहे. त्याचे परिणाम आज सर्वांसमोर आहेत.

Cotton Disease
Cotton Disease : कपाशील लाल्या येण्याची कारणे काय आहेत?

वर्ष २००० अर्थात बीटीचे युग येण्यापूर्वी या देशात संकरित, सुधारित वाणांची लागवड होत होती. ही वाणं हिरव्या बोंड अळीला मोठ्या प्रमाणात बळी पडत असल्याने देशात २००२ नंतर बीटी कापूस वाणांच्या व्यावसायिक लागवडीला परवानगी दिली. त्या वेळी बीटीमध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव होणार नाही,

त्यामुळे शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाचेल, पहिल्या-दुसऱ्या वेचणीत चांगला कापूस निघेल, त्यामुळे उत्पादन वाढ होऊन कापसाची शेती उत्पादकांना किफायती ठरेल, असा दावा बीटी कंपन्यांनी केला होता. बीटी जनुकाचा असर झाडात १०० ते १२० दिवस राहतो. त्या वेळी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव उशिराने होऊन ही कीड जास्त नुकसानकारक ठरत नव्हती. त्यामुळे बीटी आगमनाच्या वेळी या गुलाबी बोंड अळीचा फारसा विचार झाला नाही.

Cotton Disease
Cotton Disease : बोंडसडवर लवकरच शोधणार उपाय

परंतु बीटी आगमनाच्या दशकभरापासून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव लवकरच (महिनाभरात) होऊन आता तर या किडीचा एक प्रकारे उद्रेकच पाहावयास मिळतो. गंभीर बाब म्हणजे कीटकनाशकांच्या अनेक फवारण्या घेऊनही ही कीड आटोक्यात येत नाही, असे शेतकऱ्यांना माहीत झाल्यामुळे प्रादुर्भाव दिसून येताच अनेक शेतकरी कापूस उपटून टाकत आहेत.

गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पूर्वहंगामी लागवड करू नका, फरदड ठेवू नका, अशी उत्पादकांवर बंधने आणली तरी (अर्थात, याचे काटेकोर पालन होताना दिसत नाही) गुलाबी बोंड अळी काही आटोक्यात येताना दिसत नाही. ब्राझील, अमेरिका हे देश बीजी-७ पर्यंत पोहोचले आहेत.

आपण मात्र अजूनही बीजी-२ वाणांवरच घुटमळत आहोत. बीजी-३ आणण्‍यात आपण मागेपुढे पाहत आहोत. हे असेच चालू राहिले, तर कापूस उत्पादक उद्‍ध्वस्त होतील. हिरव्या बोंड अळीप्रमाणे गुलाबी बोंड अळी प्रतिकारक्षम जनुकीय वाण शेतकऱ्यांना मिळायला हवीत. बीटीची लागवड करताना रेफ्युजीचे बियाणेही योग्य प्रमाणात लावून घ्यावे.

किडींचा प्रादुर्भाव झाल्यास थेट रासायनिक कीटकनाशके फवारण्या आधी त्यात एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करायला हवा. ‘पीबी नॉट’ तंत्रज्ञानामुळे देखील गुलाबी बोंड अळीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. असे काही उपाय केल्यास पांढऱ्या सोन्याला लागलेले गुलाबी ग्रहण सुटेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com