Agriculture Opportunity : संकटातील संधी

Awareness of Climate Change : वातावरण बदलाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये जागरूकता तर आवश्यकच आहे. परंतु त्याचबरोबर कृषी संशोधनात व्यापक बदलही करावे लागणार आहेत.
Climate Change
Climate ChangeAgrowon

Agriculture Opportunity in Climate Change Condition : वातावरण बदलाचे संकट ही एक संधी समजून कृषी पदवीधरांनी याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात केले. वातावरण बदलाचे खूप मोठे आव्हान हे संपूर्ण जगासमोर उभे ठाकलेले आहे.

परंतु त्याच्या सर्वाधिक झळा भारताला बसत आहेत. वातावरण बदलाच्या काळात नैसर्गिक आपत्तींची तीव्रता आणि वारंवारता या दोन्ही बाबी वाढल्या असून, त्यामुळे या देशातील शेती क्षेत्र उद्‍ध्वस्त होत आहे. वातावरण बदलामुळे या देशात २०५० पर्यंत गहू आणि तांदूळ उत्पादनात २० टक्के घट येण्याची शक्यता एका अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.

सर्व हंगामी पिके, फळे-फुले-भाजीपाला यांवरही हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम होऊन उत्पादन घट सुरु देखील झाली आहे. सध्या आपली अन्नसुरक्षा काठावर आहे, तर आपल्या दैनंदिन आहारातील दोन मुख्य घटक डाळी आणि खाद्यतेल आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो.

अशावेळी वातावरण बदलाने सर्व पिकांची उत्पादकता पर्यायाने उत्पादन घटले तर भविष्यात अन्नसुरक्षेचा मोठा धोका संभवतो. हवामान बदलाच्या काळात केवळ शेतपिकांची उत्पादकताच घटत नाही तर रोग-किडींच्या वाढत्या प्रादुर्भावाने उत्पादन खर्च वाढून शेतकऱ्यांचे अर्थकारणही कोलमडत आहे. अशावेळी याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता तर आवश्यकच आहे. परंतु त्याचबरोबर कृषी संशोधनात व्यापक बदल करावे लागणार आहेत.

Climate Change
Climate Change : तापमानातील बदलाचा पीक उत्पादनावर परिणाम

वातावरण बदलाच्या झळा कमी करण्यासाठी प्रथमतः यांस कारणीभूत घटकांवर नियंत्रण आणावे लागेल. वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे घातक वायू उत्सर्जनाने तापमानवाढ होतेय. त्यातच बेसुमार वृक्षतोड चालू आहे. त्यातूनच वातावरण बदलाचे चटके आपल्याला बसत आहेत.

अशावेळी झाडे लावून पर्यावरण संवर्धन करावे लागेल. शिवाय कर्ब उत्सर्जन कमी करण्यासाठी जीवाश्म इंधनाऐवजी जैवइंधनांचा वापर वाढवावा लागेल. हे करीत असताना कृषी संशोधनाची दिशाही बदलावी लागेल. कृषी विद्यापीठांचा नवीन वाण संशोधनात अजूनही भर हा कीड-रोगांना प्रतिकारक आणि उत्पादकता वाढीवरच आहे.

Climate Change
Climate Change : ‘एल निनो’ काळामध्ये हवामानातील बदल

वातावरण बदलाच्या अनुषंगाने प्रामुख्याने ताणविरहीत जाती विकसित करण्याकडे त्यांचा अजूनही फारसा कल दिसत नाही. खरे तर आता अवर्षण काळात पाण्याचा ताण सहनशील तसेच अतिवृष्टी काळात अधिक ओलाव्यावरही तग धरणाऱ्या जाती शेतकऱ्यांना मिळायला हव्यात. असे झाल्यास पाऊसमानाच्या अंदाजानुसार शेतकरी पीकनिहाय जातींची निवड करतील.

नवीन वाणांच्या संशोधनामध्ये त्यांच्या कालावधीवरही काम करावे लागेल. एकाच पिकात कमी अधिक कालावधीच्या जाती शेतकऱ्यांना मिळायला हव्यात. पिकांच्या वाणांमध्ये पोषणमूल्य वाढीवरही भर द्यावा लागेल. पिकांच्या लागवड पद्धतीमध्‍ये बदलाच्या अनुषंगाने देखील संशोधन वाढवावे लागेल. शून्य मशागत, रुंद-वरंबा सरी (बीबीएफ) या लागवड पद्धती अतिवृष्टी तसेच अनावृष्टीत शेतकऱ्यांना फायदेशीर ठरताहेत.

यांचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार-प्रचार करण्याबरोबर अशा काही अजून लागवड पद्धती विकसित करण्यावरही संशोधकांनी भर द्यायला हवा. वातावरण बदलामुळे माती, पाणी, जैवविविधता यांचा ऱ्हासही वाढला आहे. ही नैसर्गिक संसाधने सांभाळण्‍यासाठी सुद्धा प्रयत्न वाढवावे लागतील. आत्ताचे कृषी पदवीधर हे भविष्यातील संशोधक, प्रशासकीय अधिकारी, प्रगतिशील शेतकरी आहेत.

या सर्व क्षेत्रात त्यांनी शेतीबाबत घेतलेल्या ज्ञानाचा फायदा त्यांना होणारच आहे. अशावेळी कृषी पदवीधरांनी आपली मातीशी असलेली नाळ टिकवून ठेवत शेतकऱ्यांचा उद्धार हा विचार कायम डोक्यात ठेवायला हवा. असे झाले तर वातावरण बदलाच्या संकटाचे संधीत रूपांतर होण्यास हातभार लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com