.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होऊ लागली. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ, उष्णतेच्या लाटाने शेतकरी जेरीस आले. त्यामुळे हवामान बदलानुरूप शेती पद्धत स्वीकारण्याचा उपदेश केंद्र सरकार करत आहे. दुसरीकडे शेतमालाला किफायतशीर भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. केंद्र सरकारच्या धोरण लकव्याने शेती आतबट्टयाचा धंदा झाला आहे. त्यामुळे अस्मानी आणि सुलतानी संकटाला एकाचेवेळी तोंड शेतकरी कसाबसा तग धरून आहे. आता याच अस्मानी संकटाला झुंज देत स्मार्ट शेती करण्यासाठी केंद्र सरकारनं एक मिशन आखलं, त्याचं नाव मिशन मौसम.
मिशन मौसम काय आहे?
केंद्रीय मंत्रिमंडळाने ११ सप्टेंबर २०२४ रोजी पुढील दोन वर्षांसाठी मिशन मौसमसाठी २ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता दिली. या मिशनचा उद्दिष्ट हवामान बदलाचे अवलोकन करणं, त्यावर काम करणारे मॉडल्स निर्माण करून त्यातून अधिक अचूक हवामान अंदाज मिळवणं, असा आहे. त्यासाठी देशभरात ५० डॉपलर हवामान रडार, ६० रेडिओ विंड स्टेशन, १०० डीस्ड्रोमीटर. १० विंड प्रोफाइलर, २५ रेडीयोमीटर, १ शहर निरीक्षण केंद्र, १ प्रक्रिया निरीक्षण केंद्र, १ समुद्र संशोधन केंद्र तसेच १० समुद्र स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. २०२६ च्या मार्च महिन्यापर्यंत या सर्व केंद्रांची उभारणी करण्याचं केंद्र सरकारकडून उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
अचूक अंदाज मिळणार?
शेतकऱ्यांना हवामानाचे अंदाज अचूक मिळू शकतात. तेही अधिक बारकाव्यासहीत. हवामानाचे अचूक अंदाज मिळवण्यासाठी मोठ्या स्केलवर डेटाचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी संख्यात्मक मॉडेल आणि डेटाचं वर्गीकरण करण्यासाठी आर्टिफिशयल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा वापर करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. अर्थात त्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात आलेली तरतूद मात्र तुटपुंजी असल्याचं जाणकार सांगतात.
भारतातील भौगोलिक वैविध्य आणि मॉन्सूनचा प्रभाव या कारणांमुळं अचूक हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरतो. शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज मिळाला तर त्यातून शेती कामाचं नियोजन करता येऊ शकतं. एकप्रकारे शेतकऱ्यांची रिस्क कमी करता येऊ शकते. कारण पिकांना हवामान बदलाचा मोठा फटका बसत आहे. त्यातून शेतकऱ्यांचं उत्पादन घटू लागलं आहे. या मिशन मौसममधून मात्र या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प, मध्यम आणि दीर्घ असे हवामान अंदाज दिले जाणार आहेत. तर दुसरीकडे मॉन्सूनचे अंदाज अचूकही करण्यासाठी हाय रिझोल्युशन मॉडेल विकसित करण्यात येणार आहेत.
देशातील शेती पूर्णत: मॉन्सूनवर अवलंबून आहे. पण आजही या मॉन्सूनचे अचूक अंदाज बांधता येत नाहीत. त्यामुळं चुकीच्या हवामान अंदाजमुळे पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या सर्वच स्तरावर शेतकऱ्यांची जोखीम वाढते. हीच जोखीम कमी करण्यासाठी अधिक प्रगत असलेली रडार यंत्रणा, उपग्रह आणि स्वयंचलित हवामान केंद्राच्या मदतीने डेटा संकलित केला जाणार आहे. त्यातून होईल काय तर शेतकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी वेळेवर आणि योग्य सल्ला मिळू शकेल, असा केंद्र सरकारचा दावा आहे.
केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील ३७ ठिकाणी रिअल-टाइम मॉनिटरिंग करणारे डॉपलर वेदर रडार उभारले आहेत. तर मौसम मोबाईल अॅपच्या मदतीने ४५० शहरांसाठी हवामान अंदाज प्रसारित केले जातात. तसेच शहरी भागातील पुराचा अंदाज चक्रीवादळ यांच्या पूर्वसूचना दिल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनात गती आल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे. वास्तवात मात्र ग्रामीण भागात परिस्थिती अधिक बिकट आहे. अवकाळी पाऊस, गारपीटी, वादळ वारे यासारख्या आपत्ती सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. त्यावरही या मिशन मौसममधून लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. जेणेकरून शेतकऱ्यांची जोखीम कमी करता येईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.