Right to Vote : जागरूकतेने करूया मतदान

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला असून त्याचा वापर करून एका मताची ताकद मतदार राजाने दाखवून द्यायला हवी.
Right to Vote
Right to VoteAgrowon
Published on
Updated on

Democratic Responsibility : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी आज राज्यात मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. सायंकाळी ६ वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना टोकन देऊन मतदान करता येणार आहे. राज्यात एकूण नऊ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आहेत.

या मतदारांकडून ४१३६ उमेदवारांतून २८८ लोकप्रतिनिधी (आमदार) निवडले जाणार आहेत. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सर्वांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक आयोगाने राज्यातील मतदारांना केले आहे. खरेतर भारतीय संसदीय लोकशाही प्रणालीने जनतेला आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिला आहे.

त्यामुळे सर्वांनीच मताधिकाराचा वापर करून आपल्या एका मताची ताकद दाखवून देण्याची एक चांगली संधी आपल्याला लाभली आहे. असे असताना आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सरासरी केवळ ६२ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले आहे. याचा अर्थ ३८ टक्के मतदार मतदानापासून वंचित राहतात.

Right to Vote
Vidhansabha Election 2024 : तेरा हजार कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

मतदानाबाबतची ही उदासीनता खूपच दुर्दैवी अन् घातक म्हणावी लागेल. कारण आपल्या एका मताने एक चांगला उमेदवार निवडून येऊ शकतो, अयोग्य उमेदवार पडूही शकतो. आपल्या मताची किंमत अमूल्य आहे, याची जाण मतदारांनी ठेवायला हवी. राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला असून, त्याचा वापर करून एका मताची ताकद मतदार राजाने दाखवून द्यायला हवी.

राज्यातील दोन मोठ्या पक्षांत उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक चुरशीची झाली आहे. पक्ष फुटीनंतर खरा पक्ष कोणता, हे जनतेच्या कौलातून स्पष्ट होणार असल्याने सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Right to Vote
Maharashtra Election 2024 : पश्चिम विदर्भात अटीतटीच्या लढती

ज्यांचे संख्याबळ अधिक त्यांचाच मुख्यमंत्री असा उघड उघड संदेश प्रचारादरम्यान देण्यात आल्याने सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निवडून येण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. निवडणूक प्रचारसभा आणि जाहीरनाम्यांमधून सर्वच पक्षांनी मतदार राजावर आश्‍वासनांचा पाऊस पाडलेला आहे. रेवड्या वाटण्याच्या नादात शेतकरी असो की सर्वसामान्य नागरिक, यांच्या मूळ समस्या मात्र प्रचारात दुर्लक्षित राहिल्या आहेत.

भलतेच मुद्दे चर्चेत आणून सर्वसामान्य मतदारांचे ध्यान मूळ समस्यांपासून भटकविण्याचे कामदेखील झाले आहे. परंतु सुजाण नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता विकासकामांतून सर्वसामान्यांचे जीवनमान सुसह्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींची निवड करायला हवी. शेतकऱ्यांना तर आतापर्यंत सर्वच राजकीय पक्ष गृहीत धरत आले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा दबावगट दिसून आला.

राज्य विधानसभा निवडणुकीत तो अधिक ठळकपणे दिसायला हवा. असे झाले तरच शेतकऱ्यांच्या समस्या सर्वच जण गांभीर्याने घेतील. आपापल्या मतदार संघात उभ्या असलेल्या उमेदवारांची सर्व माहिती मतदारांना असतेच. या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची सविस्तर माहिती मतदारांना करून देण्यासाठी निवडणूक आयोगाने उचललेल्या पावलाचे स्वागतच करायला हवे.

निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, कामाचा अनुभव, मालमत्ता आणि कर्ज तसेच गुन्हेगारी पार्श्‍वभूमी अशी सर्व माहिती केवायसी ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. हे ॲप डाउनलोड करून जागरूक मतदारांनी माहितीच्या आधारेच मतदान करून उमेदवार निवडा, असे आवाहनही केले आहे.

निवडणूक आयोग सर्व तयारीनिशी राज्यात मतदान घ्यायला सज्ज आहे. अशावेळी अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा टक्का या निवडणुकीत चांगलाच वाढेल, ही काळजी घ्यायला हवी. लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थाने आपण साजरा करूया, चला मतदान करूया...!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com