Fuel Farming : चला करूया, इंधनाची शेती

Bio CNG Production : देशात ६०० दशलक्ष टनांहून अधिक शेतातील पिकांचे टाकाऊ अवशेष असून त्यापासून बायो सीएनजी तयार करता येऊ शकतो.
Bio CNG
Bio CNGAgrowon
Published on
Updated on

Production of Agriculture Bio CNG : शेतातील टाकाऊ पदार्थांपासून इथेनॉल, बायो सीएनजी गॅस निर्मितीबाबत भारत देशात मागील अनेक वर्षांपासून बोलले जात असले, तरी प्रत्यक्षात असे प्रकल्प (काही अपवाद वगळता) साकारताना मात्र दिसत नाही. त्यामुळे भाताच्या तुसापासून ते उसाच्या चिपाडांपर्यंतचे शेतातील सर्व टाकाऊ पदार्थ नष्ट केल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही.

यासाठी शेतकऱ्यांचा बराच वेळ आणि पैसाही खर्च होतो. भाताचे तूस, गव्हाचे काड, सोयाबीनचे कुटार, कापसाच्या पऱ्हाट्या, उसाचे चिपाड, केळीचा बुंधा, धान्य-फळे-फुलांचे अवशेष, स्वयंपाकघर तसेच फळे-भाजीपाला मार्केटमधील टाकाऊ पदार्थ एवढेच नव्हे, तर अनेक प्रकारचे गवत वापरून बायो सीएनजी निर्मिती करता येऊ शकते.

त्यामुळे केळीच्या बुंध्यापासून बायो सीएनजी तयार करण्याचे प्रयत्न केळी उत्पादक शेतकऱ्यांनी करण्याची गरज असल्याचे मत नॅचरल उद्योग समूहाचे प्रमुख बी. बी. ठोंबरे यांनी नुकतेच कंदर जि. सोलापूर येथे व्यक्त केले. सध्या देशाला लागणाऱ्या ८० टक्के इंधनाची आपण आयात करतो. भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेचा विचार करता इंधनाची गरज वाढतच जाणार आहे.

यावर देशाचे मोठे परकीय चलन खर्च होत आहे. कोळसा जाळून तयार होणारी वीज आणि जीवाश्म इंधन जाळून त्यावर धावणाऱ्या गाड्यांनी प्र दूषण वाढत आहे. प्रदूषणाचे गंभीर दुष्परिणाम आपण भोगत आहोत. शिवाय जीवाश्म इंधनाचे बाहेर देशातील मर्यादित साठे पाहता त्यावर आपल्याला फार काळ विसंबून राहून चालणार नाही.

Bio CNG
CNG Biogas : केळीच्या बुंध्यापासून सीएनजी गॅस तयार करा

बायो सीएनजी हा पर्यावरणपूरक, शाश्‍वत, अक्षय इंधनाचा उत्तम पर्याय आहे. आपल्याच देशातील शेतातील टाकाऊ पदार्थांपासून बायो सीएनजी बनवून आपण इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होऊ शकतो. देशात ६०० दशलक्ष टनांहून अधिक शेतातील पिकांचे टाकाऊ अवशेष असून, त्यापासून बायो सीएनजी तयार करता येऊ शकतो.

असे झाल्यास बायो सीएनजीची आपली आयातही मोठ्या प्रमाणात घटू शकते. बायो सीएनजी निर्मिती कमी खर्चात होते. हा वायू साठवून ठेवण्यास तसेच वापरण्यासही सोपा आहे. पेट्रोल तसेच डिझेलवरील वाहनांच्या तुलनेत सीएनजीवरील वाहनांचे सरासरी ‘मायलेज’ चांगलेच आहे. बायो सीएनजी करताना बायो फर्टिलायझर्स (जैव खते) तसेच ब्रिकेट्स पॅलेट्स उप-उत्पादनांच्या स्वरूपात मिळत असून, त्यांचा उपयोग अनुक्रमे शेतात खत म्हणून तसेच ऊर्जेसाठी केला जाऊ शकतो.

Bio CNG
Fossil Fuel : जीवाश्म इंधनासंदर्भात ऐतिहासिक करार

शेतातील टाकाऊ कच्चा माल ते बायो सीएनजीची निर्मिती ही शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. ही सर्व प्रक्रिया समजून घेऊन प्रकल्पात गुंतवणूक केली तर विभागनिहाय शेतीमाल उत्पादनानुसार बायो सीएनजीचे प्रकल्प उभे राहू शकतात. दोन आणि पाच एकर क्षेत्रात अनुक्रमे अडीच आणि पाच टन प्रतिदिन क्षमतेचे बायो सीएनजी प्रकल्प उभे राहू शकतात.

अडीच टन प्रतिदिन बायो सीएनजीसाठी ११ ते १२ कोटी, तर पाच टन क्षमतेच्या प्रकल्पासाठी २० ते २५ कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. बायो सीएनजी प्रकल्पात १५ ते २० टक्के नफा मिळून चार ते पाच वर्षांत केलेली गुंतवणूक वसूल होते, असे यातील जाणकार सांगतात. बायो सीएनजीचा एकदा उभारलेला प्रकल्प ४० वर्षांपर्यंत चालतो.

अशा प्रकल्पांकरिता केंद्र-राज्य सरकारचे अनुदानही मिळते, शिवाय काही बॅंका यासाठी कर्ज पण देतात. अशावेळी यासाठीच्या आवश्यक ते परवानग्या घेऊन शेतकऱ्यांचे गट, उत्पादक कंपन्या, साखर कारखाने किंवा वैयक्तिक पातळीवर खासगी उद्योजकही असे प्रकल्प आपापल्या भागात उभारू शकतात.

प्रकल्प उभारताना यातील आर्थिक तसेच तांत्रिक सर्व बाबींच्या जोखीमीची खात्री करून सर्व पातळ्यांवरील जोखीम लक्षात घ्यायला हवी. असे झाल्यास शेतातील सर्व पिके शेतकऱ्यांना किफायतशीर ठरतील, इंधनात देश आत्मनिर्भर होऊ शकतो, देशात वास्तवात इंधनाची शेती अन् शेतकरी ऊर्जादाता होऊ शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com