Monsoon Rain : आस पावसाची अन् पेरणीचीही

Kharif Sowing : मृग नक्षत्र संपत आले तरी राज्याच्या बऱ्याच भागात पाऊस नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसाच्या हुलकावणीने दुबार पेरणीचे संकट ओढवतेय की काय, याची चिंता लागली आहे.
Farmer
FarmerAgrowon
Published on
Updated on

Kharif Season Sowing : मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात प्रगती केली आहे. परंतु सर्वदूर असा मॉन्सून यावर्षी नाही. त्यामुळे राज्यात सध्या काही भागांत कमी-जास्त पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. कुठे हलकासा, कुठे जोरदार, तर कुठे पाऊस ओसरल्याचे दिसत आहे. हवामान खाते बदलत्या हवामान व पावसाचा अंदाज वेळोवेळी देत आहे. या सर्व अचूक गोष्टींचा कानोसा घेत शेतकरीबंधू पावसाची आणि पेरणीची आस बाळगून खरीप लागवडीच्या तयारीत गुंतलेले आहेत.

पूर्व मोसमी पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात ‘कुऱ्या चालल्या रानात... सुरू झालिया पेरण...’ असे म्हणता येईल. पण कुठे पावसाचा इशारा तर कुठे १४ जूनपासून पुढील पाच दिवस म्हणजेच, १९ जूनपर्यंत पावसाचा जोर काहीसा कमी राहील असा अंदाज आहे. अरबी समुद्रावरून राज्याच्या पश्चिम किनाऱ्यावर मोसमी वारे येत आहे. त्याशिवाय इतर कोणतीही हवामान विषयक प्रणाली सध्या सक्रिय नाही. त्यामुळे पावसाचा जोर कमीच आहे. त्यामुळे पेरणीच्या काळातच शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Farmer
Monsoon Rain Update : जालना, परभणी आणि हिंगोलीत दमदार पाऊस; जायकवाडीने मिटवली मराठवाड्याची चिंता

मृग नक्षत्रातील पेरणीची आशा सगळ्याच शेतकऱ्यांना असते. मृग नक्षत्राचे आठ-दहा दिवस आता सरले आहेत. मृग नक्षत्र संपायच्या आत राहिलेल्या दिवसांत पेरणी झाल्यास अनेक पिकांचा उतारा चांगला राहील. काही शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार सिंचनाद्वारे हिंमत करून कापूस लागवड केलेली आहे. उगवणही झालेली आहे. अशा शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. पाण्याची सोय नसलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी केली सध्याच्या पावसाच्या हुलकावणीने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे.

बागायती कापूस, हळदीची पेरणी सिंचनाच्या सुविधेमुळे प्रगती पथावर आहे. परंतु सोयाबीन-तूर-मूग-उडीद-मका- भुईमूग अशा जिरायती पिकांची पेरणी मृग नक्षत्रात झाल्यावर शेतकऱ्यांना चांगले वाटते. सर्वत्र पाऊस बरसला की, सगळ्यांची पेरणी साधते. अशातच आता पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी काही ठिकाणाहून निघालेली आहे आणि काही ठिकाणाहून निघण्याच्या तयारीत आहे. शेतकरीबंधू या वारीमध्ये दरवर्षी सहभागी होतात. पेरणी करून निश्चितपणे वारीला जाता येते.

त्यामुळे आता पावसाने लवकर पडावे, अशी मनोमन आशा वारीला जाणाऱ्या शेतकऱ्यांची आहे. पांडुरंगाच्या कंबरेएवढा भवसागर आहे, हा विठ्ठलाचा संदेश शेतकरी मानतो; जीवनाच्याही या संसारसागरात तरून जाण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणी आणि पाऊस सारखाच आहे. ‘भाकरीचा चंद्र’ शेतकऱ्यांनी जगाला दिला. पण स्वतःची भाकरी फिरवण्याची त्याची आशा पाऊसदडीच्या लहरीपणामुळे अनेकदा करपली जाते. कधी-कधी बरकतीची दुरडी त्याच्या हाती लागते.

Farmer
Monsoon Rain : दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट; माॅन्सूनची वाटचाल गेल्या तीन दिवसांपासून थांबली

पेरणी सुरू होताच बी-बियाणे, औषधे आणि खतांची खरेदी करताना शेतकऱ्यांची लुबाडणूक अनेक ठिकाणी झाली. आता दुबार पेरणीची गरज काही शेतकऱ्यांना पडली तर कृषी विभागाने भरारी पथकामार्फत त्यावर आळा घालायला हवा. गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेने सतर्क राहून बियाणे आणि खतातील भेसळ रोखली पाहिजे. हे काम चोखपणे झाल्यास शेतकऱ्यांना चांगल्या बियाण्यांची उपलब्धता होऊन पिकांचा उतारा मनाजोगता काढता येतो. शेतकरी मशागत करून पिकांचा उतारा काढतीलच.

पण मशागतीत अव्वल असणारे शेतकरी पाण्यावाचून पराधीन आहेत. हे वास्तव बुजवायचे असेल तर, झाडांमुळे पडणारा पाऊस लक्षात घेऊन झाडे जगवावी लागतील. जागोजागी आणखी पाणी मुरवावे लागेल. जैवविविधता जपावी लागेल. आता या सर्व गोष्टी कागदावर नकोत, याचीच पेरणी काळजात करून पाऊस पेरायला आपण शिकूया. पाण्यावाचून काहीच नाही. पश्‍चातापापेक्षा अनुभवाची शिकवण उजवी असते. निसर्गाचा डाव आपण समजून घेतला तर आपलेच भले होईल. शेतकऱ्यांना पिकांचे ‘हिरवे स्वप्न’ साकार करता येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com