Paddy Production : प्रगत तंत्राने वाढवूया भात उत्पादकता

Paddy Farming : हवामान बदलाच्या काळात जगभर भाताचे उत्पादन घटत असताना मावळ परिसरात उत्पादन वाढत असेल, तर ही चांगली बाब म्हणावी लागेल.
Paddy Production
Paddy ProductionAgrowon
Published on
Updated on

Increase Rice Productivity : राज्यात मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी खरिपातील पिकांचे नुकसान केले आहे, तर काही ठिकाणी हा पाऊस पिकांना लाभदायक ठरतोय. पश्‍चिम घाटांतील विविध मावळ खोऱ्यांमध्ये दर्जेदार भात पिकविला जातो. येथील शेतकरी इंद्रायणीसह भाताच्या स्थानिक जातींचाच वापर अधिक करतात. सध्याच्या पावसामुळे मावळ परिसरातील शेतकरी आनंदीत आहे.

त्याचे कारण म्हणजे भाताची रोपे चांगली जोपासल्यानंतर आता पुनर्लागवडीस अगदी साजेसा पाऊस पडतोय. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या दमदार पावसामुळे यंदा भाताला फुटवे चांगले येतील, त्यापुढेही निसर्गाची अशीच साथ आणि शेतकऱ्यांचे व्यवस्थापन योग्य राहिले, तर यंदा मावळ भागातील भात उत्पादकता वाढू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

भात उत्पादकही याला दुजोरा देत असून, काही शेतकरी तर लागवड क्षेत्र वाढवीत आहेत. हवामान बदलाच्या काळात जगभर भाताचे उत्पादन घटत असताना मावळ परिसरात उत्पादन वाढत असेल, तर ही चांगली बाब म्हणावी लागेल. जगात बहुतांश देश भात लागवड करतात. जगातील एकूण तृणधान्यांखालील क्षेत्रापैकी जवळपास २५ टक्के क्षेत्र एकट्या भात पिकाने व्यापले आहे.

जगभरातील लोकांचे मुख्य अन्न भात असून, ६५ ते ७० टक्के लोकांच्या दररोजच्या जेवणात भात असतोच. भात उत्पादनात चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाताची जागतिक सरासरी उत्पादकता ४.७ टन प्रतिहेक्टर असताना भारतात प्रतिहेक्टरी सरासरी २.८ टन उत्पादन मिळते. आपल्या राज्याची भाताची उत्पादकता तर जेमतेम दोन टनच आहे. यावरून आपले राज्य आणि देशातही भात उत्पादकता वाढीस मोठा वाव आहे.

Paddy Production
Paddy Replantation : सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड पूर्ण

भात उत्पादक देशांत ‘पॅडी ॲण्ड पुवर्टी गोज टुगेदर’ अशी भात उत्पादक अनेक देशांत म्हण प्रचलित आहे. भाताचे कमी लागवड क्षेत्र, वाढता उत्पादन खर्च, कमी उत्पादकता आणि मिळणारा कमी दर यामुळे जगभरातील बहुतांश भात उत्पादक दारिद्र्यातच जीवन जगत आहेत. आपल्या देशात तर भात उत्पादकांची परिस्थिती फारच बिकट आहे.

आपल्या राज्यात भाताची लागवड प्रामुख्याने कोकण तसेच पूर्व विदर्भात केली जाते. शिवाय सह्याद्रीचा कोणताही घाट चढून वर आले, की घाटाकडील तालुक्‍यांत उसानंतरचे दुसरे मुख्य पीक भातच आहे. या सर्व भागांत चिखलणी करून भात रोपे लावली जातात. दोन-अडीच दशकांपूर्वी मराठवाडा, विदर्भातील कमी पावसाच्या भागातही खरिपात पेरभात घेतला जात होता, ते प्रमाण आता कमी झाले आहे.

Paddy Production
Paddy Production : बंपर भात उत्पादनाची अपेक्षा

आपल्याला भाताची उत्पादकता वाढवायची असेल तर अधिक उत्पादनक्षम जातींची आवश्यकता आहे. जनुकीय सुधारित वाणांमुळे उत्पादकता वाढीबरोबर गुणवत्तेतही वाढ करता येऊ शकते, त्यावर विचार झाला पाहिजे. भाताचे पीक उत्पादकांना किफायती ठरण्यासाठी लागवड खर्च कमी करावा लागेल.

भात लागवडीमध्ये चार सूत्री, रोहू पद्धत, ड्रम सीडर याच्या पलीकडे आपण जाताना दिसत नाही. मागील काही वर्षांपासून एसआरटी पद्धत विकसित झाली आहे. या पद्धतीत चिखलणी, पुनर्लागवड ही कामे करावी लागत नाहीत, तर भात खाचरात एकदाच कायमस्वरूपी गादीवाफे करून त्यावर बियाणे टोकन करावयाचे आहे.

आता तर विनामशागत भात पीक करण्याचे तंत्र विकसित झाले आहे. दक्षिणेकडील राज्यात कमी पाणी, कमी खर्चाचे ‘एसआरआय’ अर्थात ‘सिस्टिम ऑफ राइस इंटेन्सिफिकेशन’ तंत्राचा प्रसार झपाट्याने होतोय. अशा प्रगत लागवड तंत्रांचा अवलंब वाढला पाहिजेत. भाताच्या ‘एमएसपी’तही वाढ करावी लागेल.

भात आणि मासे एकमेकांना पूरक आहेत. भाताच्या खाचरातील पाण्यामध्ये मासे वाढू शकतात. जपान, चीन, इंडोनेशिया, कंबोडिया इत्यादी देशांमध्ये भातशेती खाचरातील पाण्यात मस्त्यपालन केले जाते. यामुळे देखील भात उत्पादनात वाढ होऊन मत्स्योत्पादनातून अतिरिक्त उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. भात शेतीत मत्स्यपालन तंत्राचा वापर राज्यात वाढायला हवा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com