Paddy Production : बंपर भात उत्पादनाची अपेक्षा

Paddy Farming : पावसाचा जोर किंचित ओसरल्यामुळे भात खाचरांमध्ये शेतकरी राजा सहकुटुंब रोप पुनर्लागवडीसाठी उतरला आहे.
Paddy Production
Paddy ProductionAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भाताची उत्पादकता वाढणार असून यंदा बंपर उत्पादनाची अपेक्षा आहे. पावसाचा जोर किंचित ओसरल्यामुळे भात खाचरांमध्ये शेतकरी राजा सहकुटुंब रोप पुनर्लागवडीसाठी उतरला आहे.

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, रखडलेली पुनर्लागवड आता काही दिवसांत १० लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी राज्यात ३४.७१ लाख टन भाताचे उत्पादन घेतले होते. राज्यात गेल्या खरिपात १५.२९ लाख हेक्टरवर भाताचा पेरा झाला होता. चांगल्या पावसामुळे चालू खरिपात पेरा वाढणार आहे.

Paddy Production
Paddy Replantation : सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड पूर्ण

गेल्या खरिपात प्रतिहेक्टरी उत्पादकता २२७० किलो मिळाली होती. परंतु, यंदा उत्पादकता २३८४ किलोपर्यंत अपेक्षित आहे. त्यामुळे एकूण उत्पादनदेखील ३६.४८ लाख टनाच्या पुढे जाऊ शकते. अर्थात, निसर्गाने शेवटपर्यंत साथ देत कापणी निर्विघ्न पार पडल्यास यंदा भाताचे बंपर उत्पादन शक्य आहे, असे कृषी खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

देशात लौकिक असलेल्या वडगाव मावळ येथील भात संशोधन केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र काशिद यांनी सांगितले की, भात उत्पादनात आघाडीवर असलेल्या पश्चिम पट्ट्यात १० ते २० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस होतो आहे. त्यामुळे खोळंबलेल्या पुनर्लागणीची कामे आता वेगाने पुढे सरकत आहेत.

Paddy Production
Paddy Farming : पाणी साचल्‍याने भातशेती कुजली

दमदार पावसामुळे यंदा फुटवे चांगले येतील. वेळेत लागवड आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असलेल्या भातशेतीसाठी यापुढे पुरेसा पाऊस मिळत गेल्यास उत्पादकता वाढीला वाव राहील. विशेषतः पोटरीत पीक असताना किंवा दाणे चिकात भरण्याच्या स्थितीत निसर्गाने साथ दिल्यास यंदा भाताची गुणवत्तादेखील चांगली राहू शकते.

पश्चिम घाटातील विविध मावळ खोऱ्यांमध्ये दर्जेदार भात पिकवला जातो. रोज सुरू असलेल्या पावसामुळे मावळातील भात उत्पादक शेतकरीदेखील आनंदित आहेत. दोन दिवस जोराचा पाऊस येतो व पुन्हा थांबतो. त्यामुळे मधल्या काळात पुनर्लागवडीची कामे पूर्ण करता येतात. त्यानंतर पुन्हा चांगला पाऊस होतो. अशी स्थिती कधी नव्हे ती दिसून येत असल्याचे वडगाव मावळ येथील भात उत्पादक शेतकरी अविनाश शिंदे यांनी सांगितले.

यंदा मी तीनऐवजी चार एकरवर भात लागवड करतो आहे. इंद्रायणी वाणाचे उत्पादन मला यंदा चांगले मिळेल, अशी अपेक्षा आहे.
अविनाश शिंदे, भात उत्पादक शेतकरी, वडगाव मावळ

उत्तर महाराष्ट्रात भात पट्ट्यात मजूर टंचाई

उत्तर महाराष्ट्रात अकोले, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा भागातील भात उत्पादक पट्ट्यातदेखील पुनर्लागणी वेगात सुरू आहेत. कळसूबाई पर्वतरांगेत प्रयोगशील भातशेती करणारे काशिनाथ चेंडू खोले यांनी सांगितले की, यंदा मी सहा एकरवर देशी तसेच इंद्रायणी भाताची लागवड करतो आहे. चांगल्या पावसामुळे गावेपाड्यांमधील बहुतेक भात उत्पादक शेतकरी आता रानात असून ते लागवडीच्या कामात व्यस्त आहेत. जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना मजुरांची टंचाई जाणवत असून बहुतेक ठिकाणी शेतकरीच मुलाबाळांसह एकमेकांच्या शेतात लागवडीची कामे करीत मजूर टंचाईवर मात करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com