Jalna News : राज्यातील कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भातील ५ हजारांहून अधिक शेतकरी भात पिकात, तर १ हजारांवर शेतकरी कापूस, सोयाबीन, मका, तूर इत्यादी पिकांमध्ये एसआरटी तंत्र शेतकरी अवलंबत असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी केले.
खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे आयोजित कृषी विज्ञान मंडळाच्या ३२० व्या मासिक चर्चासत्रात प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्वस्त भगवानराव काळे तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मृद्शास्त्रज्ञ डॉ.पपीता गौरखेडे व कृषी विज्ञान केंद्र खरपुडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने हे उपस्थित होते.
डॉ. मोटे म्हणाले, की केवळ भात पिकामध्ये सगुणा राइस तंत्र अर्थात एसआरटी तंत्राचा वापर शेतकरी करत होते. मात्र कापूस, सोयाबीन, मका, तूर अशा अन्य पिकांमध्ये हे तंत्रज्ञान फायदेशीर असून, त्याच्या प्रसारासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत, अर्थात पोकराने विशेष पुढाकार घेतला.
या तंत्रज्ञानात मोठे पाऊस झाले किंवा पावसात खंड पडला, तरी पिकाला फारसा फटका बसत नाही. जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. उत्पादनामध्ये २०-२५ टक्के वाढ झालेली असते. जमिनीची जलसंधारण क्षमता वाढली. एकरी उत्पादन खर्चामध्ये ४५ ते ५० टक्क्यांची बचत होते, असे ते म्हणाले
डॉ. पपीता गौरखेडे म्हणाल्या, की उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होते. जमिनीवर क्षार तसेच राहतात आणि जमिनी क्षारयुक्त बनतात. या जमिनी सुधारण्याच्या उद्देशाने सामूहिक उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. काळ्या आणि गाळयुक्त माती असलेल्या बागायती क्षेत्रांमध्ये विरघळणारे क्षार आणि अदलाबदल करण्यायोग्य सोडियम पातळीत वाढ होत आहे.
त्यामुळे या जमिनी क्षारपड झाल्या आहेत. नदी आणि कालव्याच्या सिंचन क्षेत्रातील क्षारयुक्त आणि गाळयुक्त जमिनींची भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म बदलत असतात. या जमिनीचे गुणधर्म वाढवण्यासाठी, एकात्मिक उपचारात्मक व्यवस्थापनपद्धतींना प्राधान्य द्यावे. कृषिभूषण काळे यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. सोनुने यांनी केले. आभार प्रदर्शन राहुल चौधरी यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.