Uses of Agriculture Fertilizers : देशात यंदा सर्वाधिक १०८ टक्के रासायनिक खतांचा वापर महाराष्ट्रात झाला आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे. राज्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी केल्यास त्यातून बचत होणारा ५० टक्के निधी कृषी विकासासाठी संबंधित राज्यांना दिला जाईल, असेही घोषित करण्यात आले आहे.
राज्यात रासायनिक खतांचा संतुलित प्रमाणबद्ध वापर झाला पाहिजेत, यात दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याची जोड कृषी विकास निधीसाठी घालणे, हे उचित वाटत नाही. मागील वर्षी जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत असल्याने रासायनिक खते पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनीच सेंद्रिय खतांचा पुरवठा करावा, असेही केंद्र सरकारने सुचविले होते.
याची अंमलबजावणी कितपत झाली, त्यातून साध्य काय झाले, याबाबत मात्र काहीही स्पष्ट नाही. रासायनिक खतांवर दरवर्षी वाढत जाणारे अनुदान केंद्र सरकारला कमी करायचे आहे. त्यातून असे निर्णय घेतले जात आहेत. रासायनिक खतांचा पुरवठा, विक्री, वापर याबाबत राज्यात प्रचंड गोंधळ आहे. हंगामात गरजेनुसार खतांचा पुरवठा होत नाही.
रासायनिक खतांमध्ये बनावटपणा, भेसळीचे प्रकार वाढत आहेत. खतांच्या लिंकींगचे प्रकारही घडतात. बहुतांश शेतकरी पीकनिहाय शिफारशीनुसार नव्हे तर कृषी सेवा केंद्र चालकांच्या सल्ल्याने खते खरेदी करतात. काही शेतकरी चुकीच्या पद्धतीने पिकांना खते देतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी वापरलेल्या खतांपैकी ३० ते ४० टक्के खतांचाच योग्य विनियोग होऊन बाकीचे खत वाया जाते.
शेतकऱ्यांनी पिकांना दिलेली ५० टक्केहून अधिक रासायनिक खते वाया जात असतील तर केवळ वापर कमी करून नाही, तर योग्य वेळेत, शिफारस केलेली खते, योग्य मात्रेत, योग्य पद्धतीने पिकांना दिली गेली पाहिजेत, यावर काम व्हायला हवे. रासायनिक खतांचा केवळ वापर कमी करून शेतकरी चुकीच्या पद्धतीने खते देत असतील, तर त्यातून साध्य काही होणार नाही, उलट शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे.
शेतकऱ्यांना हंगामनिहाय पुरेशा प्रमाणात खतांचा पुरवठा झाला पाहिजे. खतांच्या वितरण आणि विक्री व्यवस्थेतही सुधारणा व्हायला हवी. यासाठी पॉस मशीनद्वारे खतांच्या विक्रीची प्रणाली देशात आली. परंतु त्यातही अनेक त्रुटी आहेत, तर काही कृषी सेवा केंद्र चालक पॉस मशीनचा वापर करीत नाहीत. अशावेळी पॉसचा वापर न करणारे शोधून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत.
रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि खते देण्याच्या योग्य पद्धतीबाबत शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रबोधन झाले पाहिजेत. शेतकऱ्यांनी सुद्धा माती परीक्षण करूनच त्यानुसार खतांचा वापर करायला हवा. केवळ रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनी खराब होत आहेत, असाही प्रचार केला जातो.
परंतु रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापराबरोबर पाण्याच्या अतिवापराने जमिनी खराब होत आहेत. हे लक्षात घेऊन रासायनिक खते तसेच पाण्याचा योग्य वापर झाला पाहिजेत. रासायनिक खतांच्या कार्यक्षम वापरासाठी विद्राव्य खते, नॅनो खते यांचाही वापर शेतकऱ्यांनी करायला हवा. जमिनीचा पोत चांगला राखण्यासाठी रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय, जैविक तसेच हिरवळीची खतांचा वापरही झाला पाहिजेत.
याचबरोबर शेतातील काडी कचरा, गवत न जाळता मुलस्थानी पिकांच्या अवशेषाचे विघटन केल्यास सेंद्रिय कर्ब वाढू शकते. असे झाल्यास शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा वापर कमी होईल, त्यांचा खर्च वाचून उत्पादन वाढ होईल. केंद्र सरकारचा अनुदानावर होणारा खर्चही काही प्रमाणात कमी होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.