Mango GI : गुंता हापूस ‘जीआय’चा!

Mango Production : प्रत्येक भागाच्या भौगोलिक स्थानावरून आणि तेथील माती-हवामानानुसार उत्पादित शेतीमालास वेगळी चव, गंध, रंग, आकार येत असेल, तर हे त्यांचे वेगळेपण असून त्या भागांसाठी स्वतंत्र ‘जीआय’ मिळायला हवा.
Mango
Mango Agrowon

GI Update : हापूस आंबा भौगोलिक मानांकन, अर्थात ‘जीआय’बाबतचा वाद काही मिटताना दिसत नाही. अस्सल हापूस कोणाचा? याबाबतचा गुंता सुटण्याऐवजी तो अधिकच जटिल होत आहे. सुमारे सात वर्षांपूर्वी देवगड व रत्नागिरी या भागांतील समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ट्यपूर्ण हवामान, माती त्यातून या हापूस आंब्याची विशिष्ट चव, स्वाद आदी बाबींची कागदोपत्री, तसेच शास्त्रीय पुराव्यानिशी खात्री करून या दोन्ही हापूसवर स्वतंत्र जीआयची मोहर लावण्यात आली होती.

त्या वेळी कोकणातील सर्व हापूस एकच, अशी भूमिका असणाऱ्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने परिसरातील एका आंबा उत्पादक संघाच्या माध्यमातून देवगड व रत्नागिरीच्या स्वतंत्र जीआयवर आक्षेप नोंदविला.

त्यानुसार केंद्र सरकारच्या जिऑलॉजिकल इंडिकेशन रजिस्ट्री विभागाने कोकण कृषी विद्यापीठासह वेंगुर्ला, देवगड व केळशी (रत्नागिरी) या आंबा उत्पादक संस्थांच्या नावे हापूसला जीआय मानांकन दिले आहे.

या निर्णयामुळे कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर व रायगड या पाचही जिल्ह्यांतील हापूसला दर्जाच्या बाबतीत एकाच पंक्तीत आणून बसविण्यात आले. हा निर्णय देवगड व रत्नागिरी जिल्ह्यांतील आंबा उत्पादक संघांना मान्य नसतानाच बलसाड, धारवाड आणि जुन्नर हापूस जीआय मानांकनासाठी देखील आता अर्ज दाखल झाले आहेत.

हापूस हा शब्दप्रयोग केवळ कोकणातील आंब्यालाच करता येईल, असा दावा कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्री संस्था करीत आहे, तर कोकणाशिवाय इतर भागांत हापूसचे उत्पादन होत असेल, तर त्या भागाच्या नावे जीआय घेता येतो, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.

Mango
Mango Market Rate : पारोळा बाजारपेठेतून गावरानी आंबा गायब

जीआयच्या बाबतीत असा पेच हापूस आंब्याबरोबर बासमती तांदळात पण निर्माण झालेला आहे. कारण ही दोन्ही पिके त्यांच्या मूळ स्थानाबरोबर इतरत्रही कमी-अधिक गुणवत्तेत येतात. हापूसचे उत्पादन राज्यातील विविध भागांत तर शेजारील कर्नाटक, गुजरातमध्ये होते. बासमती तांदूळ पण देशभरात विविध भागांत घेतला जातो.

प्रत्येक भागाच्या भौगोलिक स्थानावरून आणि तेथील माती-हवामानानुसार शेती उत्पादनांना वेगळी चव, गंध, रंग, आकार येत असेल तर त्या भागांसाठी स्वतंत्र जीआय मिळायला हवा. हापूसच्या बाबतीत कोकण, जुन्नर, कर्नाटक आणि गुजरातचा हापूस असे जीआय मिळाल्यास कोणत्याच प्रकारावर अन्याय होणार नाही.

बाजारात विविध ब्रॅण्डचे हापूस आंबे असले, तरी नेमका कोणता आंबा घ्यायचा हे ग्राहक ठरवतील आणि प्रत्येक ब्रॅण्डच्या दर्जानुसार दरही मिळेल. जीआयचा मुख्य उद्देश बाजारातील भेसळीवर आळा घालण्याबरोबर क्वालिटी टॅगद्वारे संबंधित शेतीमालास अधिक दर मिळवून देणे हा आहे.

त्यामुळे विभागनिहाय तीन-चार प्रकारच्या हापूसला जीआय मिळाला तर त्यांचे उत्पादक आपापल्या ब्रॅण्डच्या नावाने बाजारात आंबे विकतील. त्यामुळेच जीआयसाठी राज्याच्या इतर भागातून आलेल्या हापूसच्या प्रस्तावांवर गांभीर्याने विचार झाला पाहिजेत.

Mango
Miyazaki Mango : एका किलोची किंमत ३ लाख रुपये ; भारतात कुठे पिकतोय जगातला सर्वात महाग मियाझाकी आंबा

विशेष म्हणजे स्वतंत्र जीआयसाठीची तरतूद असताना असे करण्यास शासनाच्या संबंधित संस्थेला यात काही तांत्रिक अडचणही येणार नाही. त्यामुळे कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्री सहकारी संस्थेने हापूसवर केवळ आपलाच हक्क असा दावा करू नये.

हापूस असो की इतर कुठलाही जीआय शेतीमाल, त्यांच्या उत्पादकांनी आपल्या बागांची जीआय अंतर्गत नोंदणी करायला हवी. शेतीमाल उत्पादक संघ, संस्थांनी सुद्धा आपापल्या भागातील अधिकाधिक शेतकऱ्यांची जीआयअंतर्गत नोंदणी होईल, हे पाहावे. असे झाले तरच उत्पादक आपल्या वेगळ्या बॅण्डने शेतीमालाची विक्री देशांतर्गतच नाही तर विदेशातही करू शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com