Mango Market : पारोळा येथील बाजारात सध्या गावरानी आंब्याची आवकच होत नसल्याने गावरानी आंबे ग्राहकांना मिळणे दुरापास्त झाले आहे. अवकाळी पाऊस, गारपीठ व वादळामुळे गावरानी आंब्यांचे उत्पादनच झाले नाही.
ज्या काही गावांमध्ये गावरानी आंबा आला, तो त्या गावासह आजूबाजूच्या परिसरात हातोहात विकला गेला. परिणामी, येथील बाजारात सध्या गावरानी आंबा गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
उन्हाळा सुरू झाला, की लहानांपासून मोठ्यांपर्यंत आंबे व आमरसाचे वेध लागतात. उन्हाळ्यात जेवणात आमरस हवाच. आंब्याच्या या मोसमात गावरानी आंब्यांनाही चांगली मागणी असते. तालुक्यातील अनेक गावांमधून गावरानी आंबा शेतकरी विक्रीसाठी आणायचे.
यंदा मात्र उत्पादनच हाती न आल्याने गावरानी आंब्यांची चव ग्राहकांना अद्यापही मिळू शकलेली नाही. काही गावांमधील झाडांना सुरवातीला चांगला बहर दिसून आला. त्यामुळे गावरानी आंब्यांचे चांगले उत्पादन होईल, असे चित्र दिसत होते.
मात्र, मध्येच अवकाळी पाऊस झाला. त्यात काही दिवस वादळासह पावसाने हजेरी लावल्यामुळे गावरानी आंब्यांच्या झाडांवरील कैऱ्या गळून पडल्या. परिणामी, गावरानी आंबा पाहिजे त्या प्रमाणात हाती लागला नाही. अशाही परिस्थितीत जे काही आंबे मिळाले ते शेतकऱ्यांच्या घरीच खाल्ले गेले.
विविध जातीचे आंबे
सध्या बाजारात लाल पट्टा, बदाम, चरकुलस, लंगडा, दशेरी, गुजराथी, काळी बदाम, केशर आदी जातीच्या आंब्यांची चलती आहे. हा आंबा ग्राहकांना ५० रुपयांपासून ते १२० रुपयांपर्यंत किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय कोकणातील हापूस आंबाही विक्रीला आलेला आहे.
आंब्याचे दर (किलो)
लाल पट्टा .......... ६० ते ७०
बदाम ................ ५० ते ८०
चरकुलस .......... ६० ते ७०
केशर ................ ८० ते १२०
दशेरी ................ ८० ते १००
बंगीनापल्ली ...... १०० ते १२०
लंगडा ................ ८० ते १००
पायरी ................. ८० ते १२०
नीलम ................. ५० ते ८०
कर्नाटक हापूस ... २०० ते ३००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.