
Farmers Fraud: आपल्या राज्यात धुमाकूळ घातलेल्या अनधिकृत एचटीबीटीच्या गुजरात कनेक्शनबाबत मागील काही वर्षांपासून चर्चा आहे. परंतु याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. त्यामुळे महाराष्ट्रात अनधिकृत एचटीबीटी खालील क्षेत्र ३० ते ४० टक्क्यांवर पोहोचले असल्याचे यातील जाणकार सांगतात. अनधिकृत एचटीबीटीने एवढे क्षेत्र व्यापल्यावर त्याचा फटका अधिकृत बीटी बियाणे उत्पादक कंपन्या तसेच विक्रेत्यांना बसत असल्यामुळे आता त्यांनी याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
परंतु अजूनही याबाबत शासन-प्रशासन गंभीर दिसत नाही. अनधिकृत किंवा चुकीच्या बाबींना वेळीच आवर घातला नाही तर ते आपले पाळेमुळे पसरायला सुरुवात करतात. बनावट निविष्ठांबाबत त्याचा प्रत्यय येत आहे. एचटीबीटी पाठोपाठ गुजरातमधील बनावट कीडनाशके राज्यातील खानदेश, विदर्भातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याची धक्कादायक माहिती कृषी सेवा केंद्र चालकांनीच दिली आहे.
नामांकित कंपन्यांच्या उत्पादनांप्रमाणे हुबेहूब पॅकिंग, आणि तुलनेने स्वस्तात ही बनावट कीडनाशके मिळत असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. प्रश्न केवळ आर्थिक फसवणुकीचाच नाही तर बनावट कीडनाशकांनी माती-पाणी-हवा प्रदूषण वाढत असून, यामुळे संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात येत आहे. आज सुमारे आठ वर्षांपूर्वी बनावट कीडनाशकांची फवारणी करताना राज्यात ५० हून अधिक शेतकरी-शेतमजुरांना जीव गमवावा लागला होता. त्यापासून आपण काहीही धडा घेतलेला दिसत नाही.
विकासाचे गुजरात मॉडेल घेऊन नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये केंद्रात प्रथम सत्तेत आले, ते आजतागायत पंतप्रधानपदी असले, तरी त्यांचे हे विकासाचे मॉडेल देशपातळीवर काही चालले नाही. आता तर मागील काही वर्षांपासून अवैध निविष्ठांचे गुजरात मॉडेल देशभर गाजत आहे. गुजरातमधून येणाऱ्या अवैध बियाणे, खते, कीडनाशकांनी खानदेशातील ४० टक्के बाजार गेल्या वर्षीच व्यापला होता, आता खानदेश, विदर्भामार्फत संपूर्ण राज्यात तो पसरत आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध निविष्ठांचा कारभार राजकीय वरदहस्ताशिवाय शक्य नाही, हे सांगण्यासाठी तर कोण्या ज्योतिषाची गरज नक्कीच नाही. आपले व्यापारी, उत्पादकांचे हित जरूर जपायला हवे. परंतु तत्पूर्वी ते नैतिकतेने उद्योग व्यापार करीत आहेत का, हे तर पाहणे गुजरात सरकारचे काम आहे. अवैध निविष्ठांची गुजरातमध्ये पोसल्या जात असलेली वाळवी महाराष्ट्रासह उद्या देशाला पोखरून टाकेल.
त्यामुळे ही वाळवी कायमची नष्ट करायची असेल कर मुळावरच घाव घातला पाहिजे. अर्थात एचटीबीटी असो, की बनावट कीडनाशके जिथे निर्मिती होते, तिथेच ते थांबविली पाहिजे. याकरिता महाराष्ट्र तसेच गुजरात सरकारने एकत्रित काम करायला हवे. अवैध निविष्ठा निर्मिती केंद्रांवर धाडी टाकून ती उध्वस्त करायला हवीत. निविष्ठांचा अवैध व्यापार थांबवायचा असेल तर दोन्ही राज्यांतील पोलिस प्रशासन आणि कृषी विभागांत समन्वय वाढवावा लागेल.
लोकसभा निवडणुकीच्या काळात सीमावर्ती भागात मद्य, गुटखा, अमली पदार्थांची अवैध तस्करी वाढू नये म्हणून महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात काही चेकपोस्ट उभारले होते. असे चेकपोस्ट आता अवैध निविष्ठांच्या तपासणीसाठी उभारायला हवेत. आपल्या राज्यातील काही व्यापारी, विक्रेते आणि अधिकारी यांच्या मिलीभगत शिवाय अवैध निविष्ठांचा काळाबाजार फोफावणार नाही. अशावेळी निविष्ठा गुणनियंत्रण विभागाने अशा महाभागांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करायला हवी. त्याशिवाय अवैध निविष्ठांच्या घातक वाळवीचा बंदोबस्त होणार नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.