Agriculture Research : जनुकीय संपादन : क्रांतीकारी संशोधन

Article by Vijay Sukalkar : सुरक्षित, शाश्वत अन् कार्यक्षम अशा जनुकीय संपादन तंत्राचा आता उशिराने का होईना, देशात वापर होत असल्यास त्याचे स्वागतच करायला पाहिजे.
Genome Editing Technology
Genome Editing TechnologyAgrowon

Genome Editing Technology : हवामान बदलाचे मोठे आव्हान या देशातील शेती क्षेत्रापुढे आहे. या देशात संशोधित सरळ तसेच संकरित वाणं हवामान बदलास पूरक ठरताना दिसत नाहीत. त्यानुसार आता कृषी संशोधनाची दिशा निश्चित केली असून येत्या काळात कापसासह तब्बल २३ पिकांमध्ये जनुकीय संपादन (जीनोम एडिटींग) हे तंत्रज्ञान वापरले जाणार असल्याचे ‘आयसीएआर’चे उपमहासंचालक डॉ. तिलकराज शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

त्याकरिता ३२० कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. खरे तर अमेरिकेसह इतरही अनेक देशांत जनुकीय संपादन हे तंत्रज्ञान वापरून हवामान बदलास पूरक पिकांच्या काही जाती विकसित करण्यात आल्या असताना आपल्याकडे मात्र याच्या वापरास थोडा उशीरच झाला, असे म्हणावे लागेल. हवामान बदलाचे सर्वाधिक चटके या देशातील शेतकऱ्यांना बसत आहेत.

घटते शेती क्षेत्र, आटत चाललेले जलस्रोत, घातक रोग-किडींचा वाढता प्रादुर्भाव, बदलत्या वातावरणातील वाढत्या नैसर्गिक आपत्ती, त्यातून होत असलेले शेतीचे नुकसान आणि घटत चाललेले शेतीमाल उत्पादन या सर्वांच्या परिणामस्वरूप भविष्यात अन्नसुरक्षेचा धोका स्पष्ट दिसतो. अशावेळी प्रगत देशांनी जनुकीय बदल (जीएम) तसेच जनुकीय संपादन (जीनोम एडिटींग) च्या माध्यमातून हवामान बदलास पूरक वाणं संशोधित केली आहेत.

आपल्याकडे जीएम तंत्रज्ञान वापरून खाद्यपिकांची वाण विकसित करण्यास विरोध होतोय. त्यामुळे त्यास परवानगी मिळत नाही. अशावेळी सुरक्षित, शाश्वत आणि कार्यक्षम अशा जनुकीय संपादन तंत्राचा आता उशिराने का होईना वापर होत असल्यास त्याचे स्वागतच करायला पाहिजे.

Genome Editing Technology
Genome Editing : ‘जनुकीय संपादन’ तंत्रज्ञान २३ पिकांत वापरणार

शेती आता ग्लोबल झाली आहे. या देशातील शेतीमालाचे भाव जागतिक बाजारपेठ ठरवत आहे. अशावेळी जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर तंत्रज्ञान वापरात आपल्याला मागे राहून चालणार नाही. जनुकीय संपादन हे या शतकातील क्रांतीकारी संशोधन मानले जाते. या तंत्रज्ञानाने शास्त्रज्ञांना कल्पकतेने पिकामधील ‘डीएनए’मध्ये अचूक बदल करता येतो. त्यामुळे वनस्पतीच्या जिनोम मधील अवगुण वगळून त्या ठिकाणी असणाऱ्या गुणांचे एकत्रीकरण करता येते.

सध्या पिकांमध्ये अनेक असाध्य रोग आणि किडींचा प्रादुर्भाव पाहावयास मिळतो. तसेच हवामान बदलामुळे पिकांची आनुवंशिक क्षमता कमी होते आहे. जनुकीय संपादनाने अशा प्रकारची दुर्बलता निर्माण करणारे जनुकच काढून टाकता येतात आणि पिकामध्ये भरपूर प्रमाणात पोषणमूल्य वाढविता येते. एवढेच नव्हे तर हवामान बदलास पूरक विविध ताण सहनशील वाणंही या तंत्राने विकसित करता येतात, जी आज काळाची गरज आहे.

Genome Editing Technology
Fruit Market : रमजान निमित्त फळांच्या मागणी, दरातही वाढ

जनुकीय बदल आणि जनुकीय संपादन हे दोन्ही तंत्रज्ञान सारखे वाटत असले तरी त्यात खूप फरक आहे. जीएमला विरोध करणारे मुख्यतः त्यापासून निर्माण होणाऱ्या पिकांचा मानव व पर्यावरण सुरक्षेबद्दल साशंक असतात. या उलट जनुकीय संपादनामध्ये नवीन जनुकांचा वापर न करता वाईट जनुके बाजूला करता येतात.

त्यामुळे पिकांच्या नैसर्गिक संरचनेमध्ये काहीच बदल होत नाही. नैसर्गिक संरचनेमध्ये बदल होत नसल्यामुळे अमेरिकेमध्ये या तंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या पिकांना नियंत्रक आणि नियामक अटीतून मुक्त केले आहे. भारत सरकारने देखील या देशातील शास्त्रज्ञांच्या विनंतीवरून वर्षभरापूर्वी जनुकीय संपादनासाठीची मार्गदर्शक तत्त्वे मोठ्या प्रमाणात शिथिल केली आहेत.

आता भारतामधील अनेक सक्षम कृषी संशोधन संस्थांनी जनुकीय संपादनाच्या संशोधनावर मोठ्या प्रमाणात काम करून नगदीपिके, अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया, फळे-भाजीपाला आदी पिकांमध्ये अधिक उत्पादनक्षम, पोषणमूल्ययुक्त, कीड-रोगप्रतिकारक, आरोग्यवर्धक आणि मुख्य म्हणजे हवामान बदलास पूरक वाणांच्या संशोधनावर भर द्यायला हवा. केंद्र-राज्य सरकारने जनुकीय संपादन तंत्रज्ञान वापरास अद्ययावत सेवासुविधा तसेच निधीचा पुरवठा अशा संशोधन संस्थांना करायला पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com