Agriculture Tillage : उन्हाळी मशागतीकडून निरंतर मशागतीकडे

Article by Vijay Sukalkar : भरपूर मशागत केलेल्या शेतीपेक्षा शून्य मशागतीची शेती जास्त चांगली पिकते, हा राज्यातीलही काही शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
Zero Tillage
Zero TillageAgrowon

Zero Tillage Farming : काल नवचैतन्य, आनंद आणि समृद्धीची गुढी उभारून गुढीपाडवा हा सण सर्वत्र साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यापासून उन्हाळी मशागतीलाही प्रारंभ होतो. खरीप आणि रब्बी पिकेही निघालेली असतात. जमीन नांगरून येथून पुढे दीड-दोन महिने चांगली तापू दिली म्हणजे अशा शेतात तण तसेच रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी होतो. जमीन पीक पेरणीला सोयीची ठरते आणि उत्पादनही चांगले मिळते. असे फायदे उन्हाळी मशागतीचे सांगितले जातात.

पूर्वी उन्हाळी मशागतीची कामे बैलचलित यंत्राने केली जात होती. आता जवळपास ८० टक्क्यांहून अधिक उन्हाळी मशागत ही ट्रॅक्टरचलित यंत्राने होत आहे. बहुतांश शेतकऱ्यांना ट्रॅक्टरद्वारे मशागत ही भाडेतत्त्वावर करावी लागते. इंधनाचे दर वाढल्याने ट्रॅक्टरद्वारे करण्यात येत असलेली मशागत खूप महागली आहे.

Zero Tillage
Zero Tillage Farming : अमेरिकेतील कृषी शास्त्रज्ञांनी केली भोर येथील शेतीची पाहणी

सर्वसामान्य शेतकऱ्यांना ही मशागत परवडेनाशी झाली आहे. त्यातच ट्रॅक्टरच्या वजनाचा अतिरिक्त दाब पडून मातीचे घनीकरण होत आहे. घनीकरणामुळे मातीमध्ये हवा-पाणी जाण्यासाठीची छिद्रे बुजत आहेत. त्यामुळे पिकांच्या मुळांची वाढ कमी होऊन पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत आहे.

खोल मशागतीने मातीची धूप वाढत आहे. धूप वाढल्याने अनेक देशांना धुळीच्या वादळांना सामोरे जावे लागत आहे. जमिनीचे घनीकरण, मातीची धूप, त्यातील कर्बाचे कमी होणारे प्रमाण हे सर्व टाळायचे असेल तर शून्य मशागत तंत्राचा वापर वाढला पाहिजे. भरपूर मशागत केलेल्या शेतीपेक्षा शून्य मशागतीची शेती जास्त चांगली पिकते, हा राज्यातीलही काही शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

जमिनीची उत्तम मशागत झाली पाहिजे, पण ती कोणाकडून? बैलचलित ट्रॅक्‍टरचलित यंत्राने नव्हे तर ती जमिनीतच उपलब्ध असलेल्या सूक्ष्मजीवांकडून झाली पाहिजे. सर्वांत चांगली मशागत सूक्ष्मजीवांकडून होत असते. यालाच जैविक मशागत असेही म्हणतात. जमिनीत मागील पिकाचे अवशेष तसेच ठेवून तणनाशक मारल्यास ते कुजत असताना मशागतीचे काम सूक्ष्मजीवांकडून होत राहते.

कोणत्याही अवजाराने पेरणीपूर्वी आपण तीन-चार वेळा मशागत करीत असलो, तरी शून्य मशागत तंत्रात सूक्ष्मजीव निरंतर जमिनीची मशागत करीत असतात. अर्थात, याला शून्य मशागतीऐवजी निरंतर मशागत म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. शून्य मशागत शेतीवर जगभर संशोधन सुरू आहे.

Zero Tillage
Zero Tillage Technique : शून्य मशागत तंत्राने फळबाग यशस्वी केलेले शिक्षक

अमेरिका, ब्राझीलसह इतरही अनेक देशांतील शेती बहुतांश शून्य मशागतीवरच केली जाते. आपल्याकडे मात्र शून्य मशागत शेती अजून फारशी प्रचलित झाली नाही. भारतात उत्तरेकडील काही राज्यांत भात, गहू ही पिके शून्य मशागतीवर अनेक शेतकरी घेत आहेत. महाराष्ट्रातही भातापासून ते उसापर्यंत अनेक पिकांत शून्य मशागत तंत्राचा अवलंब वाढत आहे.

शेतात बियाणे पेरता यावे, पिकाला पाणी देण्यासाठी सऱ्या, वाफे करता यावेत, तण तसेच रोग-किडींचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता शेतकरी नांगरणी करतात. नांगरट न करता ही तिन्ही उद्दिष्टे आपण साध्य करू शकलो तर नांगरणीची काहीही आवश्यकता नाही. आता पेरणीऐवजी टोकन पद्धतीने लागवड तंत्राचा प्रसार होतोय.

उन्हाळ्यात कडक झालेली जमीन पावसाच्या एक-दोन पाण्याने मऊ होते. अशा जमिनीत कोणत्याही पिकाची नांगरट न करता टोकन करता येते. खरिपातील बहुतांश पिकांना पाणी देण्याची गरज नाही. शिवाय ठिबक, तुषार सिंचनाचा वापर करताना सरी, वरंबे अशा रचनेची गरज नाही.

सरी, वरंब्याची रचना करण्यासाठी दरवर्षी नाही तर तीन वर्षांत एकदा मशागत करायला हरकत नाही. तण नियंत्रणासाठी तणनाशके उपलब्ध आहेत, त्यांचा समजून उमजून वापर केला तर तण नियंत्रणात राहते. कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी खोल नांगरटीशिवाय एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीत इतर अनेक प्रभावी उपाय आहेत, त्यांचा वापर शेतकऱ्यांनी करायला हवा. कमी खर्च आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या शून्य मशागत शेतीचा अवलंब आपल्याकडे वाढायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com