Cereal Crop : पौष्टिक तृणधान्य क्रांतीसाठी...

पौष्टिक तृणधान्यांचे आहार आणि आरोग्याबाबतचे महत्व शेतकरी तसेच ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आगामी वर्षांत आराखड्यांच्या माध्यमातून झाले पाहिजेत.
Cereals seed
Cereals seedAgrowon

आ गामी २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य (Cereal Crop) वर्ष म्हणून जगभर साजरे केले जाणार आहे. पौष्टिक तृणधान्ये पिकांची उत्पादकता (Cereal Productivity), उत्पादनवाढीबरोबर त्यांचे अधिकाधिक मूल्यवर्धन होऊन प्रत्यक्ष आहारात वापर वाढविणे, हा हे वर्ष साजरा करण्यामागचा हेतू आहे. त्या अनुषंगिक वर्षभर प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार असून, याबाबतचे कृती आराखडे तयार करण्याचे आदेश कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी दिले आहेत.

Cereals seed
Onion Cultivation : धुळ्यातील कांदा लागवड कमीच

जिल्हा तसेच राज्यस्तरीय कार्यशाळांचे वर्षभर चालणारे उपक्रमदेखील ठरविले जाणार आहेत. पौष्टिक तृणधान्य उत्पादनांत आघाडीवरचे महाराष्ट्र राज्य वर्षभर चालणाऱ्या विविध उपक्रमांत देखील अग्रेसर असावे हा नियोजनबद्ध पद्धतीने आराखडे तयार करण्याचा उद्देश आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, कोदो, कुटकी ही आपली पारंपरिक तृणधान्ये आहेत.

हरितक्रांतीनंतर अन्नसुरक्षेच्या दृष्टिकोनातून भात आणि गहू या पिकांना अधिक महत्त्व प्राप्त झाले. यात पौष्टिक तृणधान्ये मागे पडली. त्यामुळे आता आपण अन्नधान्यात स्वयंपूर्ण झालो असलो, तरी पोषणमूल्ययुक्त आरोग्यदायी आहाराच्या दृष्टीने पिछाडीवर जात आहोत. या बदलामुळे आपले मुख्य अन्न ग्लुटेनमुक्त ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीची जागा ग्लुटेनयुक्त गव्हाच्या चपातीने घेतली आहे. ज्वारी, बाजरी नाही तर चारा नाही, चारा नाही तर जनावरे नाहीत आणि जनावरे नाहीत तर शेतीला शेणखत नाही. अर्थात, पीकपद्धतीतील बदलाच्या या फेऱ्यात मानवी आणि मातीचे आरोग्यही बिघडत चालले आहे.

Cereals seed
Sugar Price : साखरेच्या दरावर परिणाम होणार का ? | ॲग्रोवन

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य उत्पादनवाढीसाठी विशेष अभियान देशभर चालविले जात आहे. या अभियानातून राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई या चार पिकांवर गेल्या सहा वर्षांपासून उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु त्यालाही अपेक्षित यश येताना दिसत नाही. रब्बी ज्वारी लागवडीचा हंगाम जवळपास संपला असताना या वर्षी देखील क्षेत्रात कमालीची घट दिसत आहे.

तसेच बाजरीचे पण आहे. उर्वरित नाचणी, वरई, कोदो, कुटकी या पिकांची लागवड तर दुर्गम आदिवासी बहूल भागापुरतीच मर्यादित आहे. पौष्टिक तृणधान्य पिकांत जीवनसत्वे व खनिजांचे प्रमाण मुबलक असते. या तृणधान्यांचा ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ कमी असल्याने ती पचनाला उत्तम ठरतात. तंतुमय पदार्थ, ॲण्टिऑक्सिडंट जास्त आहेत. नाचणीमध्ये तर कोणत्याही तृणधान्यापेक्षा तिप्पट कॅल्शिअम आहे. अधिक लोह व जस्तयुक्त बाजरीची वाणं पण आता विकसित करण्यात आली आहेत. यांत रोग प्रतिकारक्षमताही अफाट आहे.

Cereals seed
Farmer Life : अॅग्रोवनचा प्रतिनिधीचा एक दिवस शेतकऱ्यांसोबत

या तृणधान्यांमुळे ॲनिमिया रोखता येतो. महिला व मुलांमधील कुपोषण थांबवता येते. या पिकांना ‘क्लायमेट स्मार्ट क्रॉप्स’ असेही म्हणतात. कारण ती बदलत्या हवामानाला योग्य पद्धतीने जुळवून घेतात. हलक्या जमिनीत आणि कमी पाण्यात ती घेता येतात. शेतकऱ्यांना जास्त उत्पादनही देऊ शकतात.

पौष्टिक तृणधान्यांच्या या सर्व बाबी शेतकरी तसेच ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आगामी वर्षांत आराखड्यांच्या माध्यमातून झाले पाहिजेत. पौष्टिक तृणधान्यांना बाजारात चांगले दर मिळाले तर ती किफायतशीर ठरून अधिकाधिक शेतकरी लागवडीकडे वळतील, हेही लक्षात घेतले पाहिजे. ज्वारीसह इतरही पौष्टिक तृणधान्यांचे अनेक मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात. हे बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या मनावर ठसवावे लागेल.

त्याबाबतची प्रात्यक्षिके, प्रशिक्षणे कार्यक्रमांचे आयोजन देखील आगामी वर्षांत मोठ्या प्रमाणात झाले पाहिजेत. प्रशिक्षणार्थी महिलांकडून प्रक्रिया उद्योग सुरू होण्यासाठी अर्थसाह्य, अनुदानांच्या योजनाही गतिमान करायला हव्यात. असे झाले तरच पौष्टिक तृणधान्यांत क्रांती घडेल आणि आंतराष्‍ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष खऱ्या अर्थाने साजरेदेखील होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com