टीम ॲग्रोवन
सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगेतून एक उपरांग विंझरच्या दिशेने उतरते. याच रांगेत एक दीड तास उंच चालून गेल्यानंतर मालू कचरे आपल्या दुभत्या जनावरांच्या गोठ्यात पोचतात. स्वतः मालू कचरे व त्याची पत्नी सौ.प्रियंका कचरे दोघेही जनावरांबरोबर गोठ्यात झोपतात.
पहाटे चार वाजता ः
दोघेही जण १५ लिटरच्या दोन किटल्यांमध्ये दूध गोळा करतात. त्यानंतर दोघेही डोक्यावर किटल्या घेतात. तीन-चार किलोमीटर पायी चालत डोक्यावर भल्या मोठ्या किटल्यांचे ओझे सांभाळत गावातील हानाजी भोसले यांच्या दूध डेअरीवर दूध आणले जाते.
सकाळी आठ वाजता ः
डेअरीत दूध घालून थकलेले मालू व प्रियंका पुन्हा वस्तीवर येतात आणि किटल्या धुण्याचे कामे करतात. एकवेळ देव्हाऱ्यातील देव धुतले जाणार नाहीत; मात्र किटल्या काळजीपूर्वक व अतिस्वच्छ धुतल्या जातात. कारण, त्यामुळे सारे दूध नासण्याची भीती दोघांना असते. या दूध उत्पादक दांपत्याची अकरावीत शिकणारी रंजना सकाळपासूनच आईबाबांची वाट बघत असते.
सकाळी ९ वाजता ः
दोन किलोमीटरची पुन्हा पायपीट करून मालू आणि प्रियंका डोंगरावरील गोठ्यात येतात. हातात विळे घेऊन रानातल्या गवताळ भागात येतात. गवतातील साप,विंचू,काटेकुटे, दरी याचाा विचार न करता दोघे जण भराभर गवत कापू लागतात. कापलेल्या गवताच्या भराभर पेंढ्या बांधल्या जातात. दोघेही या पेंढ्यांचे भारे डोक्यावर टाकतात आणि डोंगरधारेतून गोठ्याकडे आणतात.
दुपारी १२ वाजता ः
रानातल्या माश्या जनावरांना खूप त्रास देतात. दुभती असल्याने तसेच लंपी स्कीन रोगाची भीती असल्यामुळे जनावरे धुवावी लागतात. डोंगरातील घळीतून वाहणाऱ्या ओढ्यावर त्यासाठी मालूने एक डोह तयार केला आहे. तेथे जनावरे धुतली जातात. म्हशी भरदुपारी आनंदाने डुंबतात. म्हशी धुतल्यानंतर गोठ्यात येताच प्रियंका त्यांना कीटकनाशकाची पावडर चोळते.
दुपारी २ वाजता ः
दुभती जनावरे बांधून ठेवली जातात व इतर जनावरे रानात मुक्त चरण्यासाठी सोडून दिली जातात. प्रियंका गोठ्यातील एका बाजूला असलेली चूल पेटवते व त्यावर भाजीभाकरी तयार करते. दोघेही जेवतात आणि पुन्हा रोजच्या जगण्यातील समस्या आणि उपायांवर चर्चा होते.
दुपारी ३ वाजता ः
जंगलात सोडलेली जनावरे पुन्हा वळवून आणण्यासाठी मालू जनावरांचा माग काढत रानात निघून जातो. प्रियंका पुन्हा गोठा साफ करू लागते.
दुपारी चार वाजता ः
डोंगरधारेतील जंगलात फिरून मालू सारी जनावरे शोधतो. पाण्यावर नेतो. त्यांना पाणी पाजतो आणि काहींना धुतो. जनावरे गोठ्यात आल्यानंतर छोटी पाडसं, कालवडी,खोंड उड्या मारू लागतात. गायी म्हशी आपआपल्या मुलांना मायेने चाटू लागतात. आता मालू आणि प्रियंका पुन्हा धारा काढू लागतात.
संध्याकाळी सहा वाजता ः
जनावरांच्या धारा काढून पुन्हा दुधाच्या किटल्या तयार ठेवल्या जातात. दोघे जण पुन्हा गोठ्यातील आणि आजुबाजुची आवरासावर करतात.
रात्री दहा वाजता ः
डेअरीतून दूध पोहचवून आल्यानंतर प्रियंकाला पुन्हा घरकाम करावे लागते. घरातील सुखदुःखाच्या गप्पा मध्येच संपवून आता मालू आणि प्रियंका पुन्हा डोंगराकडे जायला निघतात. डोक्यावर दहा किलोचे पशुखाद्या आणि रिकाम्या किटल्या असतात. प्रियंका आणि मालू आता भयाण अंधारात पुन्हा डोंगरधार चढू लागतात.
दूध उत्पादनासाठी डोंगराभोवती चोवीस तास जखडून पडलेल्या या कष्टकरी बळीराजासोबतचा माझा एक दिवस अशा प्रकारे संपला.