Cotton Farming : कापसाची करुण कहाणी

Cotton Market : मागील दीडएक दशकांपासून कापसाच्या बाबतीत काहीच चांगले घडताना दिसत नाही. उत्पादकांपासून ते निर्यातदारापर्यंत सर्वांसाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल.
Cotton
CottonAgrowon

Cotton Production : कापूस उत्पादन आणि निर्यातीत एकेकाळी आघाडीवर असलेला भारत देश आज या दोन्ही पातळ्यांवर पिछाडीवर ढकलला गेला आहे. कापसाला पर्यायी दुसरे नगदी पीक उपलब्ध होत नसल्याने ही शेती तोट्याची ठरत असली, तरी नाइलाजाने देशातील बहुतांश शेतकऱ्यांना कापसाची लागवड करावीच लागते. त्यामुळे दरवर्षी देशात कापसाचे क्षेत्र १२५ ते १३० लाख हेक्टरवर असे टिकून असते.

सर्वाधिक लागवड क्षेत्र असलेल्या आपल्या देशात मागील तीन वर्षांपासून कापसाचे उत्पादन सातत्याने घटत आहे. दशकभरापूर्वी ४०० लाख गाठींवर आपले कापूस उत्पादन गेले होते. या वर्षी मात्र ३०० लाख गाठींचेच कापूस उत्पादन अपेक्षित आहे. आपली कापूस उत्पादकता इतर अनेक देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

चीन आपल्या तुलनेत जेमतेम २५ टक्के क्षेत्रावर (३३ लाख हेक्टर) लागवड करतो. परंतु त्यांचे कापूस उत्पादन आपल्यापेक्षा अधिक (३५४ लाख गाठी) आहे. कापूस उत्पादकतेत सर्वांत पिछाडीवर (४५० किलो रुई प्रतिहेक्टर) भारत देश असून, शेजारील पाकिस्तानची उत्पादकता (७०० किलो रुई प्रतिहेक्ट) आपल्यापेक्षा अधिक आहे. कापूस निर्यातीत जगभर ओळख असलेल्या आपल्या देशातून मागील दोन हंगामांत मिळून केवळ ५० लाख गाठींची निर्यात झाली.

या वर्षी तर देशांतर्गत गरजेइतकेच जेमतेम होणार असल्याने कापूस निर्यातीचा प्रश्‍नच उद्‍भवत नाही. आपला प्रमुख कापूस आयातदार बांगला देश आता पाकिस्तानसह इतर देशांतून आयात करीत आहे.

देशांतर्गत बाजारातून कापसाचा पुरवठा होत नसल्याने काही सूत गिरण्या बंद आहेत. ज्या चालू आहेत, त्याही पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने कापड उद्योग ठप्प आहे. एकंदरीतच काय तर उत्पादक, प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार अशा सर्वांसाठीच ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल.

Cotton
Cotton Production : भारत कापूस उत्पादनात पडतोय पिछाडीवर

मागील दीडएक दशकापासून कापसाच्या बाबतीत काहीही चांगले घडताना दिसत नाही. कापसात बीटी वाणांचे आगमन झाल्यानंतर चार, पाच वर्षे हिरव्या बोंड अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात राहून उत्पादकता थोडीफार वाढली. मात्र त्यानंतर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कापसावर सुरू झाला. पुढे याचे रूपांतर उद्रेकात झाले. रसशोषक किडींचा प्रादुर्भावही वाढत गेला. ‘लाल्या’ विकृतीही वाढली.

त्यामुळे कीडनाशके फवारणीवरील खर्च वाढून उत्पादन घटत आहे. आपल्याकडे घेतले जाणारे कापसाचे ९० टक्के क्षेत्र हे जिरायती आहे. आणि जिरायती कापसाची उत्पादकता खूपच कमी आहे. मागील दोन वर्षांपासून कापसाला दरही कमीच मिळतो. दराच्या अपेक्षेने कापूस साठवून ठेवला तरीही उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नाही.

Cotton
Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

उलट घरात साठविलेल्या कापसामुळे पुरळ येऊन खाज सुटण्यासह अनेक त्वचा विकारांना शेतकरी कुटुंबांतील सदस्यांना सामोरे जावे लागत आहे. देशातील शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसाची उत्पादकता, विक्री व्यवस्था, दर, प्रक्रिया आणि निर्यात अशा सर्वच पातळ्यांवर व्यापक काम झाले पाहिजेत.

सध्याच्या आपल्या कापूस उत्पादकतेत तीन ते चार पटीने वाढ होऊ शकते. त्यासाठी मात्र अतिप्रगत तंत्रज्ञानातून अधिक उत्पादनक्षम जाती विकसित कराव्या लागतील. कापसाचे लागवड आणि व्यवस्थापन तंत्रातही व्यापक बदल आवश्यक आहेत. कापसाचे बहुतांश क्षेत्र सिंचनाखाली आणावे लागणार आहे. कापूस शेतीचे लागवड ते वेचणीपर्यंत यांत्रिकीकरण झाले, तर उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादकता वाढू शकते.

कापसाच्या हमीभावही वाढवावे लागतील. कापूस खरेदी अधिक सुलभ करावी लागेल. असे झाल्यास कापसाची शेती उत्पादकांना किफायतशीर ठरले. त्यानंतर कापसाचे सूत ते कापड निर्मिती उद्योगातील सर्व अडचणी दूर करून त्यांना त्यांना काही सवलतीही द्याव्या लागतील. कापूस, कापड निर्यातीच्या संधी शोधून निर्यात वाढवावी लागेल. असे झाले तरच पांढऱ्या सोन्याची झळाळी जगभर पोहोचून उत्पादकही आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com