Nobel Prize 2023 : नारी श्रमशक्तीचा सर्वोच्च सन्मान

Claudia Goldin : हावर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन या वर्षीच्या स्वेरिगेस रिक्सबँक अर्थातच अर्थशास्त्रातील नोबल पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. गोल्डिन यांचे संशोधन अर्थशास्त्रातील नारीशक्तीच्या कार्याची कबुली देणारे पहिले संशोधन म्हणावे लागेल.
Nobel Prize 2023
Nobel Prize 2023Agrowon

Nobel economics prize : अलीकडे स्टॉकहोममधील रॉयल स्वीडिश  ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या नोबेल पारितोषिक समितीने यंदाच्या आर्थिक विज्ञानातील स्वेरिगेस रिक्स बँक अर्थातच अर्थशास्त्रातील सर्वांत प्रतिष्ठेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा केली आहे. महिलांच्या श्रम बाजाराच्या परिणामांबद्दलची समज पुढे नेण्यासाठी हावर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्यांनी आपल्या संशोधनातून श्रम बाजारपेठेतील वेतनातील असमानता, स्त्री व पुरुष वेतन - उत्पन्न दरी आणि त्याची कारणमीमांसा मांडली आहे.

Nobel Prize 2023
Parliament Session : महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर, 'नारी शक्ती वंदन कायदा'

श्रम अर्थशास्त्रात मोलाची भर

१९४६ मध्ये न्यू यॉर्क शहरात जन्मलेल्या क्लॉडिया गोल्डिन यांना अमेरिकन अर्थव्यवस्थेतेतील महिलांच्या भूमिकेच्या क्षेत्रातील अग्रगण्य संशोधक, शिक्षिका म्हणून ओळखले जाते. सध्या त्या हावर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्रोफेसर आहेत. त्यांनी १९८९ ते २०१७ या कालावधीत ‘नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च’च्या ‘डेव्हलपमेंट ऑफ द अमेरिकन इकॉनॉमी प्रोग्रॅम’च्या संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी रिअर अँड फॅमिली, अ सेंच्युरी ऑफ वूमन, द लाँग जर्नी टूवर्ड इक्विटी ही पुस्तके लिहिली आहेत. तर ‘अंडरस्टँडिंग द जेंडर गॅप : अॅन इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ अमेरिकन वूमन’ हे १९९० चे पुस्तक २०० वर्षांच्या इतिहासातील वेतन असमानतेचे प्रभावशाली परीक्षण आहे. त्यामध्ये त्यांनी महिलांची श्रम शक्ती, कमाईतील स्त्री-पुरुष अंतर, स्त्रियांचा आर्थिक विकासातील सहभाग, उत्पन्न असमानता, तंत्रज्ञानातील बदल, शिक्षण आणि इमिग्रेशन यांसह त्याचा रोजगारावरील परिणाम आणि आर्थिक विषमता अशा विविध विषयांचा समग्र अभ्यास केला आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात देखील स्त्रियांच्या रोजगारातील सहभागाचा आलेख हा ऊर्ध्वगामी नसून ‘यू’ या इंग्रजी अक्षराच्या आकाराचा आहे. हे त्यांनी आपल्या अभ्यासातून दाखवून दिले आहे. अर्थात, श्रमाच्या अर्थशास्त्रात त्यांनी मोलाची सैद्धांतिक व उपयोजित स्वरूपाची भर टाकली आहे.

Nobel Prize 2023
दुर्गा खानावळीने जपलीय ८३ वर्षांची परंपरा

स्त्री - पुरुष कमाई तफावत

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शेती आणि औद्योगिक समाजात बदल झाल्यामुळे विवाहित महिलांचा व्यवसायातील सहभाग कमी झाला. परंतु नंतर विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सेवा क्षेत्र वाढल्यानंतर महिलांचा सहभागही वाढला. घर आणि कुटुंबासाठी असलेल्या महिलांच्या जबाबदाऱ्या आणि बदलते सामाजिक नियम यामुळे श्रम बाजारात महिलांचा सहभाग परिणामकारक ठरला, असे निरीक्षण गोल्डिन नोंदवितात. विसाव्या शतकात स्त्रियांमध्ये शिकण्याचं प्रमाण वाढत गेलं. त्यामुळे उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आता पुरुषांपेक्षाही स्त्रिया अधिक शिकलेल्या आहेत. विसाव्या शतकात जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये आधुनिकीकरण, आर्थिक वाढ आणि शिक्षित व नोकरदार महिलांचे वाढते प्रमाण असूनही, महिला आणि पुरुष यांच्यातील कमाईत फारच तफावत आहे. स्त्रिया रोजगार मिळवत असतील तरीदेखील त्यांना मिळणारे उत्पन्न हे पुरुषांपेक्षा कमीच असते, हे गोल्डिन यांच्या संशोधनातून अधोरेखित होते. गोल्डिन यांच्या मते, करिअर घडविणारे शैक्षणिक निर्णय तरुण वयात घेतले जातात. परंतु त्यांचे निर्णय जर आधीच्या पिढीवर आधारित असतील, तर स्त्रियांचा विकास लोप पावतो. म्हणजेच, मूल जन्माला आल्यानंतर आई जर कामावर परतली नसेल, तर तसाच निर्णय तिच्या पुढच्या पिढीतील महिलांकडून (म्हणजे त्यांच्या मुलींकडूनही) घेतला जाऊ शकतो, परिणामी, स्त्रिया दीर्घकालीन करिअर ठरवू शकत नाहीत. हा त्यांच्या विश्‍लेषणाचा मुख्य निष्कर्ष आहे.

Nobel Prize 2023
Village Development : महिला सरपंचानो, सक्षम व्हा!

भारतासाठी गांभीर्य

गोल्डिन यांचे संशोधन प्रामुख्याने अमेरिकेमधील आकडेवारीवर आधारित असले, तरी ते जगभरातील देशांसाठी, विशेषतः आपल्या देशासाठी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या २०२२ च्या ‘ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स’नुसार भारत १४६ देशांच्या क्रमवारीत १२७ व्या क्रमांकावर आहे आणि जागतिक सरासरीपेक्षा खूपच खाली आहे. भारताचा १९.२३ टक्के महिला श्रमशक्ती सहभाग दर हा जी-२० देशांमध्येच नाही, तर जगात सर्वांत कमी आहे. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार, २००४ पासून त्यामध्ये घसरण होतेय. देशातील महिला श्रमशक्ती कृषीकडून बांधकाम, उत्पादन आणि सेवा श्रेत्राकडे परावर्तित होत असली, तरी गेल्या दोन दशकांमध्ये भारतातील महिला श्रमशक्तीचा एकंदरीतच सहभाग घसरला आहे.
भारतासारख्या पुराणमतवादी पुरुषकेंद्री कामगार बाजारपेठेत, कमी गुणवत्तेच्या कामाच्या पर्यायांसह, विविध कौटुंबिक जबाबदाऱ्या अनेक महिलांना पगाराची नोकरी सोडून देण्यास भाग पाडतात. भारतातील किमान १७.१९ दशलक्ष स्त्रिया बिनपगारी घरगुती कामात गुंतलेल्या आहेत. विशेषतः अनौपचारिक क्षेत्रातील (कृषी क्षेत्र) स्त्री कामगारांमध्ये अत्यंत गरीब मनमानी वेतन आणि अपुरी सामाजिक सुरक्षा असल्याचे कटूसत्य आहे. या ठिकाणी प्रकर्षाने गोल्डिनचे अंतर्दृष्टीपूर्ण संशोधन अनुदानित चाइल्डकेअर, कामाच्या ठिकाणी लिंगभेद दूर करणे, कामाच्या ठिकाणी लवचिकतेतून स्त्री-पुरुष वेतन असमानता कमी करण्यासाठी, श्रमिक बाजारातील परिस्थितीमध्ये समानता आणण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोनाबाबत गांभीर्याने विचार करायला लावणारे ठरते.

नारीशक्तीचा लेखाजोखा

क्लॉडिया गोल्डिन यांचे हे सर्वस्पर्शी संशोधन अर्थशास्त्रातील नारीशक्तीच्या कार्याची कबुली देणारे पहिले संशोधन आहे. स्त्री - पुरुष वेतन तफावतीच्या ऐतिहासिक प्रवृत्तीसह त्यात योगदान देणाऱ्या घटकांचे सखोल विवेचन करते. नोबेल पारितोषिक समितीने गोल्डिनच्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की बदलाला वेळ लागतो, कारण संपूर्ण करिअरवर परिणाम करणाऱ्या निवडी अपेक्षांवर आधारित असतात जे नंतर चुकीच्या ठरू शकतात, याखेरीज त्यांच्या संशोधनाची अंतर्दृष्टी अमेरिकेच्या सीमेबाहेर जगभरात पोहोचली आहे. इतर अनेक देशांमध्ये तत्सम नमुने पाहण्यात आले आहेत. एकंदरीत त्यांचे संशोधन श्रमिक बाजारपेठेतील महिलांची भूमिका समजून घेणे समाजासाठी का महत्त्वाचे आहे, हे सांगून आम्हाला काल, आज आणि उद्याच्या श्रमिक बाजारांबद्दल दिशादर्शक ठरते. त्यांच्या संशोधनाला लक्षणीय व्यावहारिक महत्त्व असून ते भूतकाळाच्या दृष्टिकोनातून वर्तमानाचा अर्थ लावते.

डाॅ. नितीन बाबर

(लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com