
Parbhani News : शेतकऱ्यांधील नैराश्याची कारणे शोधून त्या आधारे शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) थांबविण्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सर्व गावांतील शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक सुरक्षितेबाबत पाहणी केली जात आहे.
घरी जाऊन प्रत्येक शेतकरी कुटुंबाची तपशीलवार माहितीचे अर्ज भरून घेतले जात आहेत. त्यासाठी गावनिहाय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्यातील सर्व 848 गावांतील शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक सुरक्षितेबाबतची पाहणी केली जात आहे. या कामासाठी गावनिहाय तलाठी, ग्रामसेवक, कृषिसहायक, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष कुटुंबाची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक शेतकरी कुटुंबाचा एक स्वतंत्र तपासणी फॉर्म भरून घेण्यात येत आहेत. याकामांवर मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी हे पर्यवेक्षक आहेत.
शेतकऱ्यांची माहितीचे फॉर्म बळीराजा ॲप मध्ये अपलोड करण्यात येणार आहेत. या पाहणीद्वारे शेतकऱ्यांचे शिक्षण, मुख्य व्यवसाय, ७-१२ वरील बोजा, कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांची शैक्षणिक स्थिती, विवाह योग्य मुलींची संख्या, त्यांच्या विवाहासाठीच्या आर्थिक अडचणी, कर्ज किंवा इतर कारणांमुळे होणारे कौटुंबिक कलह, व्यसनाचे प्रकार, गंभीर दुर्धर आजाराचा प्रकार, बेरोजगारांची संख्या, नैसर्गिक संकटांमुळे निर्माण झालेल्या अडचणी, घरातील सुविधा, स्वतःचे घर, वीजजोडणी, नळजोडणी, स्वच्छतागृह या सुविधांची माहिती संकलित केली जात आहे.
सद्य स्थितीतील बँकनिहाय घेतलेले कर्ज, कर्जाचा प्रकार, परतफेड, थकबाकी, नवीन कर्ज आदी तपशील आहे. शेतजमीन विषयक माहितीमध्ये एकूण जमिनी, कोरडवाहू, बागायती, हंगामी बागायती यासह मागील एका वर्षातील पिके व उत्पादन याचा समावेश आहे.
कृषी योजनांचा लाभ,पशुधन विषयक, स्थलांतर विषयक बाबीं, शेतकऱ्यांना शेती, पूरक व्यवसाय आदीतून मिळणारे याचा तपशील आहे.
सामाजिक सहभाग विषयक माहितीमध्ये कुटुंबातील व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, असेल तर त्यातून मिळणाऱ्या लाभाची माहिती, शेतकरी गटाचे सदस्य, धार्मिक कार्याची आवड याबाबत माहिती भरून घेतली जात आहेत.
कल्याणकारी योजनांच्या लाभविषयक माहितीमध्ये दारिद्रेरेषेखालील पिवळे रेशन कार्ड,नरेगा जॉब कार्ड, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, जनधन योजना, संजय गांधी निराधार योजना आदींसह आरोग्य पोषण व शिक्षण विषयक माहितीचे संकलन आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.