
Water Management: तापमानाचा पारा जसजसा वाढत आहे, तसतशी ग्रामीण-शहरी भागांतून पिण्यासाठी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. रब्बी, उन्हाळी तसेच बहुवार्षिक पिकेही अधिक पाण्याची मागणी करीत आहेत. त्याच वेळी विहिरी बोअरवेल मात्र कोरडे पडत आहेत. धरणांतील पाणीपातळीही घटत असल्याने कालवा सिंचनही अडचणीचे ठरत आहे. पुढे उन्हाळा तीव्र होत जाईल आणि पिण्यासाठी आणि पिकांसाठी देखील पाण्याची गरज वाढतच जाणार आहे.
अशा एकंदरीत वातावरणात राज्यातील जलसाक्षरता उपक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी यशदा येथे जलनायक, जलयोद्धा, जलप्रेमी, जलदूत, जलसेवक व जलकर्मी प्रशिक्षकांची कार्यशाळा नुकतीच पार पडली. त्यात राज्यभर जलसाक्षरता चळवळीचा लोकजागर करण्यात येऊन सर्व गावे जल स्वयंपूर्ण करण्याचा निर्धारही करण्यात आला आहे. खरे तर पाण्याच्या प्रश्नाने उग्र रूप धारण केल्याशिवाय जल संवर्धन, बचत आणि वापर याबाबतचा विचार कुणालाही शिवत नाही. असे असताना जलसाक्षरता केंद्राद्वारे वेळीच दखल घेऊन जलसाक्षरतेबाबत प्रशिक्षण, प्रबोधन होत आहे, त्याचे स्वागतच करायला हवे.
सिंचन हा ग्रामीण विकासाचा पाया आहे. पाणी नसेल तर शाश्वत शेती उत्पादन होत नाही. हे लक्षात घेऊन महाराष्ट्रात शक्य अशा बहुतांश ठिकाणी धरणे बांधण्यात आली. धरणांमुळे सगळीकडे विपुल पाणी होईल, असे सांगितले गेले. परंतु तसे घडले नाही. मुळात धरणांत प्रचंड गाळ साचल्याने पाणी साठा कमी होतो. साचलेले पाणी बाष्पीभवन तसेच कालवा, चाऱ्यांद्वारे निचरा होऊन वायाच अधिक जाते. त्यातून उपलब्ध पाण्याचे देखील पिकांसाठी नीट नियोजन होत नाही.
त्यामुळे धरणांच्या पाण्यातून सिंचनाचा अपेक्षित टक्का वाढला नाही. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठीची स्थितीसुद्धा यापेक्षा वेगळी नाही. पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरविणे हे सरकारचे कर्तव्य तर प्रत्येक नागरिकाचा तो हक्क आहे. बरे यासाठी देखील सरकारने प्रयत्न केले नाही, असे नाही. परंतु सरकारचे सर्व उपाय कुचकामी ठरून पिण्यासाठी पाण्याची समस्या मात्र कायम आहे. मागील सत्तर वर्षांत महिलेच्या डोक्यावरची पाण्याची घागर उतरविण्यासाठी घरोघरी नळाची योजना आली.
परंतु आज नळयोजना झालेल्या बहुतांश गावात टॅंकरने पाणी पुरवावे लागते. महिलांना डोक्यावर घागर घेऊन पाण्यासाठी वणवण भटकंती करावीच लागते. सिंचन तसेच पिण्यासाठी पाण्याची आजची ही दुरवस्था शाश्वत पाणी स्रोत शोध, संवर्धनात आपण कमी पडल्याने झाली आहे. परंतु यातूनही काही धडा न घेता, पाणीटंचाई दूर करण्यासाठी नदीजोड, वॉटर ग्रीडसारखे महाकाय प्रकल्पच राबविण्याचाच शासन विचार करीत असेल तर आपले जल दुर्भिक्ष कधीच दूर होणार नाही.
त्यामुळे पाणीटंचाई दूर करायची असेल तर राज्य, विभाग, जिल्हा हा केंद्रबिंदू न ठेवता गाव ठेवायला हवा. पाऊस हा पाण्याचा एकमेव स्रोत आहे. पावसाचे पाणी पूर्वी गावपातळीवर विहिरी, बारव, तलाव, सरोवर, नद्या-नाले अशा पारंपरिक जलस्रोतांमध्ये सुरक्षित साठविले जाई. आज ही जलस्रोत आपण नष्ट केली आहेत. त्यामुळे गावपरिसरातील ही पारंपरिक जलस्रोत पुनरुज्जीवित करायला हवेत.
ज्या गावात पारंपरिक एकही स्रोत नाही, तिथे गावाला वर्षभर पुरेल एवढे जलकुंड करून त्यात पाणी साठवून ठेवावे. शेती सिंचनासाठी धरणे, कालवे, नदीजोड, वॉटर ग्रीडऐवजी शेत तिथे विहीर अथवा शेततळे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवावी. पाणी पिण्यासाठी असो की शेतीसाठी त्याचा वापर काटकसरीनेच हवा. पाण्याचा एक थेंबही वाया जाणार नाही, असे उपलब्ध पाण्याचे नियोजन व्हायला हवे. अशा प्रकारची जल साक्षरता झाल्याशिवाय गावे जल स्वयंपूर्ण होणार नाहीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.