Soil Temperature : जमिनीच्या तापमानाचा व्हावा सखोल अभ्यास

Study of Soil Temperature : जमिनीच्या वाढत्या तापमानाचे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेता भारतीय हवामानशास्त्र तसेच कृषी या दोन्ही विभागांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यापेक्षा एकत्र येऊन काम करायला पाहिजे.
Soil Temperature
Soil TemperatureAgrowon

Agriculture Land Temperature Management : शतकातील सर्वाधिक तापमानाची नोंद देशात नुकतीच झाली आहे. दिल्लीतील पारा ५२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. हवामान विभागासह केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाला ही बाब आश्‍चर्यकारक वाटल्याने याबाबत आम्ही पडताळणी करू, असे त्यांनी सांगितले आहे. स्थानिक वातावरणाचा हा परिणाम असला तरी देशाच्या अनेक भागांत तापमानाच्या पाऱ्याने पन्नाशी गाठली आहे.

आता तरी वाढते तापमान हा हवामान बदलाचाच परिणाम असल्याचे सर्वांना मान्य करावे लागेल. वातावरणातील (हवेतील) तापमान ५० अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना जमिनीच्या तापमान कुठवर पोहोचले असेल, याबाबत मात्र अजून तरी कोणालाही चिंता वाटत नाही, असेच दिसते. उन्हाळ्याच्या दिवसांत हवेतील तापमानापेक्षा जमिनीचे तापमान हे पाच अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते.

जमिनीचे तापमान तसेच त्यातील आर्द्रता हे दोन्ही घटक पिकांची वाढ आणि उत्पादकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशावेळी जमिनीच्या तापमानाच्या नोंदी आवश्यक असून, त्याचा पिकांवर नेमका काय परिणाम होतो, याचा देखील सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे.

मात्र नेमक्या अशावेळी कृषी आणि हवामानशास्त्र या दोन्ही विभागाला जमिनीच्या वाढत्या तापमानाबाबत काहीही गांभीर्य दिसत नाही. भारतीय हवामानशास्त्र विभाग तर जमिनीचे तापमान हा आमच्या अखत्यारीतला विषयच नाही म्हणून अंग झटकत आहे, तर कृषी विद्यापीठांसह, कृषी विभागाकडेही जमिनीच्या तापमानाच्या नोंदीची काहीही सोय दिसत नाही.

Soil Temperature
Soil Fertility : जमीन सुपीकतेसाठी हिरवळीची पिके फायदेशीर

वनस्पतींमध्ये विविध चयापचयाच्या क्रिया तसेच प्रकाश संश्‍लेषण, श्‍वसनाची क्रिया सातत्याने सुरू असते. या क्रिया वनस्पतीमधील विकरे नियंत्रित करत असतात. परंतु ज्या वेळी तापमानात मोठी वाढ होते, त्या वेळी वनस्पतीमधील विकरांचे विघटन होऊन प्रकाश संश्‍लेषण, अन्ननिर्मिती प्रक्रिया मंदावते. हवेतील तापमान ५० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले की वनस्पतींची वाढ खुंटते, त्याचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर दिसू लागतो.

एवढेच नव्हे तर जमिनीचे तापमान कमी झाल्यास जमिनीतून पाणी व पाण्याबरोबर अन्नद्रव्य यांचे शोषण मुळांद्वारे होण्यात अडचण निर्माण होते. परिणामी, पिकांची वाढ आणि उत्पादकता घटते. जमिनीच्या वाढत्या तापमानाने मातीतील उपयुक्त जिवाणूंवरही परिणाम होऊन एकूणच सेंद्रिय पदार्थ विघटनाचे कार्य बिघडते.

Soil Temperature
Soil Fertility : जमीन सुपीकतेसाठी हिरवळीची पिके फायदेशीर

जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाल्यास मातीची सुपीकता घटते. जमिनीच्या वाढत्या तापमानाचे हे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेता भारतीय हवामानशास्त्र तसेच कृषी या दोन्ही विभागांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यापेक्षा एकत्र येऊन यावर काम करायला पाहिजे. हवेतील तापमानाच्या नोंदींबरोबर ठिकठिकाणी आता जमिनीच्या तापमानाच्या नोंदीदेखील हवामानशास्त्र विभागाने घ्यायला हव्यात.

या सर्व नोंदी त्यांनी सातत्याने कृषी विभागाला कळवायला हव्यात. कृषी विभागाने या नोंदींचा अभ्यास करून त्याचा विभागनिहाय पिकांवर काय परिणाम होतो, हे पाहायला हवे. एवढेच नव्हे तर त्यांनी जमिनीच्या वाढत्या तापमानानुसार पीकनिहाय व्यवस्थापनाचे धडे शेतकऱ्यांना द्यायला हवेत. जमिनीच्या तापमानाच्या नोंदीपासून ते त्यानुसार पीक सल्ला या कामांकरिता कृषी तसेच हवामानशास्त्र विभागाला कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे यांची मदत होऊ शकते.

शेतकऱ्यांनी सुद्धा जमिनीच्या वाढत्या तापमानात पीकनिहाय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करायला हवा. या देशातील शेतीपुढे हवामान बदलाचे आव्हान फार मोठे आहे. अशा आव्हानात्मक काळात शेती, हवामानशास्त्रासह सर्व संबंधित विभागांनी जबाबदारीपासून दूर पळण्याऐवजी आपण बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी काय योगदान देऊ शकतो, हे पाहायला हवे. एवढेच नाही तर आपापल्या क्षमतेनुसार शेती वाचविण्यासाठी प्रत्यक्ष कृतीत उतरायला हवे. असे झाले तरच हवामान बदलाचे आव्हान आपण पेलू, अन्यथा नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com