Soil Fertility
Soil FertilityAgrowon

Soil Fertility : जमीन सुपीकतेसाठी हिरवळीची पिके फायदेशीर

Green Crops : हिरवळीचे पीक भिन्न हवामान आणि जमिनीत चांगले वाढणारे असावे. पीक लवकर वाढणारे, एक ते दीड महिन्यात येणारे असावे. पाला भरपूर, हिरवागार असावा. मुळे जमिनीत खोलवर जाणारी व खोड कोवळे, लुसलुशीत असावे.

डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. आनंद गोरे, डॉ. मदन पेंडके

भाग १

Green Crops are beneficial for Soil Fertility : जमिनीचा पोत टिकविण्यासाठी हिरवळीच्या खताला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. हिरवळीचे पीक फुलोऱ्यामध्ये येण्यापूर्वी जमिनीत गाडल्यास त्यापासून मुख्य अन्नद्रव्ये व सेंद्रिय घटकांचा पुरवठा होतो.

हिरवळीचे खत जमिनीत अन्नद्रव्य पुरवठ्याबरोबर भौतिक व रासायनिक गुणधर्म सुधारण्यास मदत करते. हिरवळीच्या खतासाठी धैंचा, नाग, बोरू, शेवरी, बरसीम, सुबाभूळ, गिरिपुष्प, चवळी, मूग या पिकांची लागवड करावी.

नियोजन

हिरवळीचे पीक भिन्न हवामान आणि जमिनीत चांगले वाढणारे असावे.

पीक लवकर वाढणारे, एक ते दीड महिन्यात येणारे असावे.

प्रतिकूल परिस्थितीत उदा. दुष्काळात कमी किंवा जास्त तापमानात तग धरणारे हवे.

मुळांवर गाठी तयार करण्याची किंवा नत्र स्थिर करण्याची क्षमता असावी. पाला भरपूर, हिरवागार असावा.

जमिनीत खोलवर जाणारी मुळे व खोड कोवळे, लुसलुशीत असावे. जमिनीत गाडल्यास झपाट्याने कुजावे.

प्रकार

शेतात लागवड करण्यायोग्य हिरवळीचे खत ः ज्या शेतात हिरवळीचे खत गाडावयाचे आहे तेथे हिरवळीचे पीक सलग शेतात पेरले जाते. हे पीक फुलोरा येण्यापूर्वी नांगरणी करून जमिनीत गाडले जाते किंवा मुख्य पिकांसोबत आंतरपिके म्हणून याची वाढ करून ती जमिनीत मिसळली जातात. उदा. बोरू (ताग), धैंचा, शेंगवर्गीय वनस्पती, मूग, चवळी, मटकी, शेवरी, लसूणघास, बरसीम या पिकांचा समावेश होतो.

हिरवळीचे पीक घेऊन पालापाचोळ्यापासून खत : या पद्धतीमध्ये वनस्पतीच्या हिरव्या फांद्या व पाने लुसलुशीत कोवळी असतात. अशा झाडांची लागवड बांधावर करून किंवा परिसरातील जंगलातून फांद्या, पाने गोळा करून शेतात नांगरणीवेळी गाडतात. उदा. गिरिपुष्प, शेवरी, करंज, सुबाभूळ.

Soil Fertility
Agriculture Soil Health : जमीन सुपीकतेसाठी उपाययोजना

फायदे

हिरवळीच्या खतामधील सेंद्रिय द्रव्यांमुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंना अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. त्यांची कार्यशक्ती जोमाने वाढते. जमिनीतील पोषक द्रव्ये रासायनिक क्रियेने विरघळून पिकांना योग्य परिस्थितीत मिळतात.

लवकर कुजणारी हिरवळीची खते वापरल्यामुळे एकूण नत्र, उपलब्ध स्फुरदाचे प्रमाण आणि ॲझोटोबॅक्टर जिवाणूंचे प्रमाण वाढते.

जमिनीत टिकून राहणाऱ्या कणांचे प्रमाण वाढते.

जमिनीची जलधारणा क्षमता वाढते. पावसामुळे होणारी जमिनीची धूप कमी होते.

सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीतून पाण्याचा निचरा लवकर होतो. हलक्या जमिनीत देखील सेंद्रिय पदार्थांमुळे पाणीधारण करण्याची क्षमता वाढते.

द्विदल वर्गातील हिरवळीची पिके ही हवेतील नत्र शोषून घेतात. हे नत्र जमिनीत साठते. ते पुढील पिकांना उपलब्ध होते.

हिरवळीचे पीक गाडण्यामुळे जमिनीतील क्षार कमी होतात. जमिनीत असेंद्रिय स्फुरदाचे सेंद्रिय स्फुरदात रूपांतर करतात. जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढवितात.

हिरवळीच्या पिकांच्या दाट वाढीमुळे तणांचे नियंत्रण होते.

निवड आणि लागवड

पिकांची निवड : मातीत आर्द्रता, खतासाठी लागणारा वेळ हे लक्षात घेऊन शेंगवर्गीय पिकांची निवड करावी.

पेरणीची वेळ : मृगाचा पहिला पाऊस पडल्यावर हिरवळीच्या पिकांची पेरणी करावी. मात्र ही वेळ प्रदेशनिहाय वेगळी असू शकते. पुरेशा आर्द्रतेमध्ये बियांची उगवण चांगली होते.

जमिनीमध्ये गाडण्याची वेळ : सर्वसाधारणपणे पीक फुलोऱ्यात आल्यावर गाडावीत. यासाठी पेरणीनंतर साधारणपणे ६ ते ८ आठवडे लागतात.

हिरवळीची पिके गाडल्यानंतर मुख्य पिकांच्या पेरणीतील कालावधी : शेतात गाडलेल्या पिकांना कुजवण्यासाठी किती वेळ लागतो, यावर मुख्य पिकांची पेरणी करण्याचे नियोजन करावे. जाडसर, रसाळ देठ आणि पाने कुजवण्याला कमी वेळ लागतो. मातीचा पोत व आर्द्रता महत्त्वाची आहे. हलक्या मातीमध्ये योग्य आद्रता असताना हिरवळीचे पीक गाडल्यानंतर ७ ते १२ दिवसांनी पेरणी करावी.

Soil Fertility
Soil Fertility : जमीन सुपीकतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

अन्नद्रव्यांची उपलब्धता

पिकांच्या भरघोस वाढीसाठी लागणारे मुख्य अन्न घटक व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये हिरवळीच्या पिकांच्या कुजण्यातून उपलब्ध होतात. ही प्रक्रिया मातीच्या रासायनिक, भौतिक, जैविक पातळीवर अवलंबून असते.

पाणी आणि पाण्यात विद्राव्य अंश : पाण्यात विरघळणारे अंश लवकर कुजले जातात. त्यातील अन्न घटक त्वरित जमिनीत उपलब्ध होतात, ही क्रिया मुख्य पिकांच्या वाढीच्या पहिल्या टप्यात होते. त्यात नत्राचे प्रमाण जास्त असते.

पाण्यात न विरघळणारे अंश : यामध्ये मुख्यत: सेल्युलीन किंवा हेमी सेल्युलोज येतात. यांना कुजण्यास १० ते १६ आठवड्यांचा कालावधी लागतो.

प्रतिकारक अंश : प्रतिकारक अंश लवकर कुजत नाही. उदा. लिग्नीन.

गुणधर्म

प्रति हेक्टर सुमारे ५० ते १७५ किलो नत्र उपलब्ध होते. जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढतो.

मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढते. उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते.

मातीची भौतिक स्थिती सुधारते. अन्य मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत होते.

मर्यादा

लागवडीसाठी क्षेत्र, कालावधी व पाण्याची उपलब्धता आवश्यक असते. बियाणे खर्च वाढतो.

आंतरपीक म्हणून घेताना मुख्य पिकांशी स्पर्धा करू शकतात.

कार्यशक्ती

सर्वसाधारणपणे १ टन हिरवळीचे किंवा शेंगवर्गीय पिकापासून बनलेले खत हे २.८ ते ३ टन शेणखत किंवा ४.५ ते ४.७ किलो नत्र किंवा १० किलो युरियाच्या बरोबर असते. म्हणजेच २४ ते ३० किलो नत्राचा पुरवठा करण्यासाठी ६ टन हिरवळीचे खत प्रति हेक्टरी वापरावे लागते.

डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६

(सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com