Cotton crop sowing : प्रतिकूल हवामान आणि भात पिकाच्या तुलनेत कमी उत्पन्न मिळाल्याने पंजाबमधील शेतकऱ्यांनी कापूस लागवडीकडे पाठ फिरवली. यंदाच्या खरीप हंगामामध्ये कापसाच्या लागवडी खालील क्षेत्रात ४२ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे यंदा ३ लाख हेक्टरावर लागवड करण्याचे उद्दिष्ट राज्याला गाठता आले नाही.
पंजाबमध्ये ३१ मे पर्यंत (पेरणीचा हंगाम संपला), सुमारे १ लाख ७५ हजार हेक्टरवर (लक्ष्याच्या ५८ टक्के) पिकाची लागवड झाली.
पंजाबमध्ये कापूस पिकाची फाजिल्का, भटिंडा, मानसा आणि मुक्तसर जिल्ह्यात प्रामुख्याने लागवड केली जाते. प्रतिकूल हवामान आणि धान पिकांपेक्षा मिळत असलेल्या कमी उत्पन्नामुळे शेतकरी कापूस लागवड करण्यास उत्साही दिसत नाही. गतवर्षी ४ लाख हेक्टरच्या उद्दिष्टाच्या तुलनेत २ लाख ४८ हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. यंदा त्यामध्ये आणखी घट झाली असून फक्त १ लाख ७५ हजार हेक्टरवरच लागवड झाली आहे.
कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “सुरुवातीला कापूस लागवडीसाठी २० मे ही शेवटची तारीख ठरवण्यात आली होती. नंतर ती ३१ मे पर्यंत वाढवण्यात आली. यावर्षी सुमारे १ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीखाली आहे. फाजिल्का हा एकमेव जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे.”
फाजिल्काचे मुख्य कृषी अधिकारी जानगीर सिंग म्हणाले, राज्यात कापूस पिकाखाली आणलेल्या क्षेत्रापैकी अर्ध्याहून अधिक क्षेत्र फाजिल्का जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात दीड लाख हेक्टरच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ९० हजार ८५० हेक्टरवर कापूस पिकाची लागवड झाली आहे.
ते म्हणाले, यंदा कापूस बियाण्यांवर 33 टक्के अनुदानामुळे आम्हाला मदत झाली. कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध झाल्याने हवामान खराब झाले असले तरी जिल्ह्यात कापूस पिकाखाली जास्तीत जास्त क्षेत्र आणले.
गेल्या वर्षी कापसाला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळाला असला तरी पांढरी माशी आणि गुलाबी बोंडअळीच्या हल्ल्यामुळे लागवड केली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
कापूस उत्पादक गुरदीप सिंग म्हणाले, बहुसंख्य शेतकऱ्यांना नुकसान नियंत्रणाच्या नवीनतम पद्धती माहीत नाहीत. हवामान प्रतिकूल असल्याने काही शेतकऱ्यांनी पुन्हा पीक घेतले नाही.उत्पादन खर्च अनेक पटींने वाढला आहे.
मुक्तसरचे मुख्य कृषी अधिकारी गुरप्रीत सिंग म्हणाले, पाऊस आणि कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात पिकाची निवड केली. गतवर्षी कापसाचे प्रति एकर सरासरी उत्पन्न ४ ते ६ क्विंटल प्रतिक्विंटल राहिले. त्याला ७ हजार ५०० ते ८ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. पण भाताचे उत्पन्न प्रति एकर ३० क्विंटलपर्यंत पोहोचले. त्याचा हमीभाव प्रति क्विंटल २ हजार ६० रुपये होता. त्यामुळे यंदा शेतकरी भात पिकाकडे वळाले आहेत. त्याचा परिणाम म्हणून मुक्तसर जिल्ह्यात ५० हजार हेक्टरच्या उद्दिष्टापैकी केवळ २० हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली असल्याचे गुरप्रीत सिंग यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.