Cotton Farming In Jalgaon : खानदेशात यंदा साडेआठ लाख हेक्टरवर कापसाची लागवड होईल. यात सर्वाधिक साडेपाच लाख हेक्टरवर एकट्या जळगाव जिल्ह्यात कापूस लागवड होऊ शकते. खरिपासंबंधी पूर्वमशागतीला वेग आला असून, शेतकरीराजा तयारीत व्यस्त आहे.
धुळ्यात अडीच लाख व नंदुरबारात सुमारे सव्वालाख हेक्टरवर कापूस लागवड होईल, असे संकेत आहेत. खानदेशात एकूण खरिपाखालील अपेक्षित क्षेत्र सुमारे १४ लाख हेक्टर एवढे आहे. यात जळगाव जिल्ह्यात खरिपाखालील एकूण क्षेत्र सुमारे पावणेआठ लाख हेक्टर एवढे असणार आहे.
धुळ्यात चार लाख आणि नंदुरबारात सुमारे पावणेतीन लाख हेक्टरवर खरीप असेल. सध्या विविध भागांत शेतात नांगरटी सुरू झाली आहे. यंदा खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र सात लाख ७० हजार ८७८ हेक्टर आहे.
त्यातील पाच लाख ५० हजार हेक्टरवर कपाशीचा पेरा होणार आहे. कृषी विभागाने अद्याप बीटीचे बियाणे उपलब्ध करून न दिल्याने शेतकरी इतर राज्यांत जाऊन बियाणे मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांनी खरिपासाठी लागणारे बियाणे, खतांसाठी बँकांकडे कर्ज मागणी सुरू केली आहे. काही शेतकऱ्यांनी जुने कर्ज फेडून नवीन कर्ज घेण्याची तयारी सुरू केली आहे.
बियाणे १ जूननंतरच
नगदी पीक म्हणून कापसाकडे बघितले जाते. शेतकऱ्यांनी यंदाही कापसावरच भर दिला आहे. यामुळे बीटी बियाणे केव्हा उपलब्ध होतील, याची शेतकरी वाट पाहत आहेत. महाराष्ट्रात १ जूननंतरच बीटी बियाण्यांची विक्री करावे, असे आदेश आहेत.
यामुळे काही शेतकरी मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक राज्यात जाऊन बीटी बियाणे उपलब्ध होते का, याबाबत चाचपणी करीत आहेत. बागायतदार शेतकरी मेमध्ये कापूस लावतात.
मात्र, कोरडवाहू शेतकऱ्याला बियाण्याची वाट पाहावी लागत आहे. कापूस पेरण्यासाठी २७ लाख ५० हजार बीटी बियाण्यांच्या पाकिटांची मागणी कृषी विभागाने केली आहे.
यंदाचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र असे
पिके - पेरणी क्षेत्र (हेक्टर)
कापूस - पाच लाख ५० हजार
ज्वारी - १९ हजार ३००
मका - ९८ हजार ५००
इतर - तृणधान्य दोन हजार
तूर - नऊ हजार ४००
मूग- नऊ हजार
उडीद - ११ हजार ५००
भुईमूग- दोन हजार
तीळ - एक हजार
सूर्यफूल- ५००
सोयाबीन- २० हजार
एकूण खरीप - सात लाख ६३ हजार २००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.